कोची, दिनांक 10 डिसेंबर 2016 : हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यात दुसऱ्या उपांत्य सामन्यामधील पहिल्या फेरीची लढत होत आहे. केरळाने घरच्या मैदानावर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असेल. यानंतरही केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी आधीच्या रेकॉर्डला कोणतेही महत्त्व नसेल असा इशाराच आपल्या संघाला दिला आहे. केरळाने घरच्या मैदानावर सलग पाच सामने जिंकले आहेत. येथे खेळताना त्यांना उदंड पाठिंबा मिळतो, पण या महत्त्वाच्या लढतीसाठी तयारी करताना नव्याने प्रारंभ करावा लागेल याची कॉप्पेल यांना कल्पना आहे. त्यांनी सांगितले की, भूतकाळात जे काही घडले त्यामुळे भविष्यात बरोबरी करता येत नाही. आम्हाला विजय मिळाले कारण आम्ही कसून सराव केला आणि योग्य वेळी गोल केले. पूर्वी आम्ही हे केले म्हणजे यानंतर करूच अशी खात्री देता येत नाही. विशेष म्हणजे केरळाने घरच्या मैदानावर कधीही दिल्लीला हरविलेले नाही. 2014 पासून तीन सामन्यांत एक पराभव आणि दोन बरोबरी अशी कामगिरी झाली आहे. यात यंदाच्या मोसमातील एका बरोबरीचा समावेश आहे. कॉप्पेल म्हणाले की, आम्हाला आमची क्षमता नव्याने सिद्ध करावी लागेल. ही स्पर्धा वेगळी आहे. हा काही साखळी पद्धतीची स्पर्धा नसून करंडकासाठी आहे. आम्हाला त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. पहिल्या सामन्यानंतर जे काही घडेल ते संपलेले नसेल. आम्हाला डावपेचांमध्ये थोडे बदल करावे लागतील. केरळाने घरच्या मैदानावर सलग पाच सामने जिंकून भक्कम कामगिरी केली असली तरी त्यांचे गोल नोंदविण्याचे रेकॉर्ड चिंताजनक आहे. त्यांना आतापर्यंत केवळ 13 गोल करता आले आहे. एफसी पुणे सिटीच्या साथीत हा सर्वाधिक कमी आकडा आहे. दिलासा मिळण्यासारखी एकच बाब म्हणजे केरळाला या आघाडीवर फॉर्म गवसतो आहे. पहिल्या आठ सामन्यांत त्यांना केवळ चार गोल करता आले होते. त्यानंतर गेल्या सहा सामन्यांत त्यांनी नऊ गोल केले आहेत. यात स्ट्रायकर सी. के. विनीत याने मोलाचा वाट उचलला आहे. बेंगलोर एफसीकडून दाखल झाल्यापासून त्याने पाच गोलांचा धडाका लावला आहे. यंदा आयएसएलमधील सर्वाधिक प्रभावी संघांमध्ये दिल्लीची गणना होते. त्यांचे प्रशिक्षक जियानल्यूका झॅंब्रोट्टा प्रतिस्पर्ध्यासमोरील आव्हान खडतर ठरविण्यासाठी प्रयत्नशील असतील. दिल्लीने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर तीन सामन्यांत एकही गोल पत्करलेला नाही. यापेक्षा सरस कामगिरी केवळ मुंबई सिटी एफसीची आहे. मुंबईविरुद्ध बाहेर चार सामन्यांत एकही गोल झालेला नाही. झॅंब्रोट्टा यांनी सांगितले की, आम्ही केरळाविरुद्ध खेळतो तेव्हा साधारण खडतर सामना असतो याची आम्हाला कल्पना असते. याचे मुख्य कारण म्हणजे केरळाला त्यांच्या मैदानावर भक्कम पाठिंबा मिळतो, मात्र आम्ही सांघिक खेळ करू. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. आम्ही नेहमी असेच खेळतो. आम्हाला फार चांगला सामना खेळण्याची आशा आहे. दुसऱ्या टप्यातील सामना दिल्ली घरच्या मैदानावर खेळेल. स्थानिक प्रेक्षकांसमोर अपेक्षित निकालासाठी प्रयत्न करण्याची संधी ही जमेची बाजू असल्याचे झॅंब्रोट्टा यांना वाटते. ते म्हणाले की, ही अर्थातच जमेची बाजू असेल. कारण घरच्या मैदानावर खेळताना आम्हाला मानसिक आघाडीवर फायदा होईल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कोणत्याही संघासमोर खेळाडूंच्या दुखापतींची समस्या नाही.]]>