दिल्ली, दिनांक 14 डिसेंबर 2016: केरळा ब्लास्टर्सने पेनल्टी शूटआऊटवर दिल्ली डायनॅमोजला 3-0 अशा फरकाने नमवून हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सामना बुधवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. विजेतेपदासाठी येत्या रविवारी (दिनांक 18 डिसेंबर) केरळाची लढत कोची येथे ऍटलेटिको द कोलकता संघाशी होईल. सामन्यातील अधिकांश वेळ दहा खेळाडूंसह खेळलेल्या झुंजार दिल्ली डायनॅमोजने उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात निर्धारित वेळेत केरळा ब्लास्टर्सवर 2-1 असे वर्चस्व राखले होते, त्यामुळे दोन सामन्यानंतर गोलसरासरी 2-2 अशी समान झाली. अंतिम फेरीतील जागा पक्की करण्यासाठी दोन्ही संघांत जादा वेळेतील खेळ झाला. तेव्हाही गोल होऊ शकला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. कोचीत पहिल्या टप्प्यातील लढतीत केरळा ब्लास्टर्सने 1-0 असा विजय मिळविला होता. निर्धारित आणि जादा वेळीतील मिळून 120 मिनिटांच्या खेळात गोलसरासरी 2-2 अशी बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये दिल्लीला माघार घ्यावी लागली. त्यांचा कर्णधार फ्लोरेंट मलुडा व ब्रुनो पेलिसारी यांनी क्रॉसबारवरून फटके मारले, तर एमरसन मौरा याचा फटका गोलरक्षक संदीप नंदीने अडविला. केरळा ब्लास्टर्सच्या जोसू कुरैस, केव्हर्न बेलफोर्ट व महंमद रफीक यांनी अचूक फटके मारले, तर अंतोनिओ जर्मनचा फटका दिल्लीचा गोलरक्षक अंतोनिओ सांताना याने अडविला. सामन्याच्या 28व्या मिनिटाला मिलन सिंगला थेट रेड कार्ड मिळल्यानंतर दिल्लीचा एक खेळाडू कमी झाला, तरीही यजमान संघाने नमते घेतले नाही. पूर्वार्धात सहा मिनिटांच्या “स्टॉपेज टाईम’ खेळात त्यांनी 2-1 अशी आघाडीही घेतली. मार्सेलो लैते परेरा (मार्सेलिन्हो) याने 21व्या मिनिटाला यंदाच्या स्पर्धेतील वैयक्तिक दहावा गोल नोंदविला, त्यामुळे दिल्लीला आघाडी मिळाली. लगेच 24व्या मिनिटाला डकेन्स नॅझॉन याने केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. “स्टॉपेज टाईम’मध्ये रुबेन रोखा याच्या गोलमुळे दिल्लीपाशी विश्रांतीला आघाडी जमा झाली. उत्तरार्धात केरळाचा बचावपटू संदीप झिंगान याच्या दक्षतेमुळे केरळा ब्लास्टर्सवरील संकट टळले. 78व्या मिनिटाला त्याने गोलरेषेवरून फ्लोरेंट मलुडाचा हेडर विफल ठरविला नसता, तर कदाचित निर्धारित वेळेतच दिल्लीची अंतिम फेरी पक्की झाली असती. सामन्यातील 62 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही दिल्लीने कौतुकास्पद झुंज दिली. यजमान संघाच्या उत्तरार्धात संधी हुकल्यामुळे पूर्वार्धातील आघाडी वाढविता आली नाही. जादा वेळेतील खेळाच्या पहिल्या अर्धात मार्सेलो लैते परेरा याचा फटका क्रॉसबारवरून गेला, नंतर 99व्या मिनिटास मलुडाचा फटका गोलरक्षक संदीप नंदीने रोखून दिल्लीला वरचढ होऊ दिले नाही. नंतर 103व्या मिनिटास मार्सेलोचा हेडर कमजोर ठरला. पूर्वार्धातील वीस मिनिटांतील खेळानंतर सामन्यात रंगत आली. केरळा ब्लास्टर्सच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारलेल्या मार्सेलोने केरळाचा गोलरक्षक संदीप नंदी याच्या चुकीचा लाभ उठविला. मार्कोस तेबार याने दूरवरून दिलेल्या चेंडूवर रिचर्ड गादझे याने चढाई केली. यावेळी केरळाच्या दिदियर कादिओ याने फटका रोखण्याचा प्रयत्न केला, तर गोलरक्षक नंदीने आपली जागा सोडली. त्याचवेळी चेंडू मार्सेलो याच्यापाशी केला व त्याने चेंडूला योग्य जागा दाखविण्यात चूक केली नाही. आघाडी घेतल्याचा यजमानांचा आनंद फक्त तीन मिनिटेच टिकला. जोसू कुरैस याने डाव्या बाजूने चेंडू पुरविल्यानंतर नॅझॉनने चेंडू नियंत्रित केला. त्याचा फटका रोखण्यासाठी अंतोनिओ सांताना हा झेपावला, परंतु त्यापूर्वी चेंडूने गोलजाळीत जागा मिळविली. केरळाने बरोबरी साधल्यानंतर चार मिनिटांनी दिल्लीच्या मिलन सिंगला रेड कार्ड दाखवून रेफरींना बाहेर काढले. मेहताब हुसेनबरोबरच्या चढाओढीत मिलनने केरळाच्या खेळाडूस लाथाडले, त्याची शिक्षा त्याला मिळाली. केरळाच्या कादिओ याने 34व्या मिनिटास आणखी एका गोलसाठी प्रयत्न केला, परंतु गोलरक्षक सांताना दक्ष राहिला. विश्रांतीच्या चार मिनिटे अगोदर गोलरक्षक संदीप नंदीच्या चपळाईमुळे दिल्लीची संधी हुकली. रिचर्ड गादझेच्या ताकदवान फटक्यावर संदीपने डाव्या बाजूने झेपावत चेंडू अडविला. पूर्वार्ध संपण्यास काही क्षण बाकी असताना दिल्लीने अखेर बरोबरी साधली. मार्कोस तेबारच्या फ्रीकिक फटक्यावर रुबेन रोखा याच्या हेडर भेदक ठरला. केरळाच्या दिदियर कादिओ याने चेंडू हेडरने दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडूला रोखू शकला नाही.]]>