कोची, दिनांक 8 ऑक्टोबर 2016: येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी केरळा ब्लास्टर्सची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दिल्ली डायनॅमोजशी लढत होत आहे. गुणांचे खाते उघडण्यासाठी केरळाने कामगिरी प्रचंड सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले. केरळाला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. आधीच्या फेरीत घरच्या मैदानावर ते ऍटलेटीको डी कोलकाता संघाकडून हरले. त्याआधी त्यांनी सलामीच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीकडून हार पत्करली होती. दोन्ही वेळा एकमेव गोलने संघ हरला असला तरी सुधारणेची गरज असल्याचे कॉप्पेल यांना वाटते. ते म्हणाले की, आम्ही सगळ्या क्षेत्रात सुधारणा करू शकतो असे वाटते. मागील सामन्यात आमचा बचाव बराचसा चांगला झाला, पण आम्हाला जास्त बचावामुळे गोल पत्करावा लागला. मध्य फळी काही वेळा विस्कळित झाली. आघाडी फळीला गोल करण्याच्या बाबतीत सुधारणा करावी लागेल. आम्ही सरावाच्यावेळी या सर्व गोष्टींवर मेहनत घेत आहोत. कॉप्पेल हे बरेच अनुभवी प्रशिक्षक आहेत. मागील सामन्यात त्यांनी सहा बदल केले. बदलांचे सत्र ते कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. मॅंचेस्टर युनायटेडकडून विंगर म्हणून खेळलेले कॉप्पेल म्हणाले की, संघात आमूलाग्र बदल होतील असे नाही, पण काही बदल नक्कीच होतील. स्पर्धेचे स्वरूप आव्हानात्मक आहे. आम्हाला सांघिक तसेच वैयक्तिक कामगिरीचे मूल्यमापन करावे लागेल. त्यासाठी काही बदल होतील. आम्ही या सामन्यासाठी उत्सुक आहोत. बदलांविषयी कॉप्पेल यांनी तपशील दिला नाही. यामुळे ते जोस्यू प्रिएटो याला तात्पुरता लेफ्ट-बॅक ठेवणार की न्यूकॅसलचा माजी स्ट्रायकर मायकेल चोप्रा याला अंतिम संघातून आघाडी फळीत संधी देणार याविषयी प्रत्येक जण तर्क करीत आहे. दिल्लीचे विश्वकरंडक विजेते इटालियन प्रशिक्षक जियानल्यूका झॅंब्रोट्टा यांना विजयी संघात बदल करण्याची गरज नसल्याचे वाटते. त्यातही चेन्नईयीनवरील 3-1 अशा दणदणीत विजयामुळे हा संघ पहिल्याच सामन्यात गतविजेत्यांविरुद्ध चांगलाच वाटला. झॅंब्रोट्टा यांनी मात्र गाफील राहण्यास नकार दिला. ते म्हणाले की, हा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही चेन्नईयीनविरुद्ध जिंकलो असलो तरी हुरळून जाणे परवडणार नाही. आम्हाला पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि पुढील सामन्यांतील सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवावी लागेल. केरळा संघ झगडत असल्यामुळे झॅंब्रोट्टा यांच्या संघाचे पारडे जड राहील. यानंतरही झॅंब्रोट्टा याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांनी सांगितले की, केरळाला चांगल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दोन सामने गमवावे लागले. त्यांची स्थिती सध्या खराब आहे, पण ते घरच्या मैदानावर खेळत असतील आणि ते विजयासाठी आतुर आहेत. 60 हजार प्रेक्षकांचा पाठिंबा ही त्यांच्या फार मोठी जमेची बाजू असेल.]]>