दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमानांनी भारताचा केला ८६ धावांनी पराभव, महेंद्रसिंग धोनीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००० धावा पूर्ण. लंडन: पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर एकच्या इंग्लंड संघाकडून येथे झालेल्या सामन्यात ८६ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आली. सामान्याचं वैशिष्ट्य ठरलं ते जो रूटचं शतक आणि भारताचा माजी कर्णधार व सफल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या १०००० धावा. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार एयॉन मॉर्गनने लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सामान्याप्रमाणे दोन्ही सलामीवीरांनी संघाला आक्रमक फलंदाजी करीत चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या पावरप्लेमध्ये नाबाद ६९ धावांची भागीदारी रचल्यानंतर भारतासाठी मागच्या सामन्यातील हिरो ठरलेल्या कुलदीप यादवने रॉंग’अनने जॉनी बेरस्टोवचा त्रिफळा उडवीत भारताला पहिला बळी मिळवून दिला. १५ व्या षटकात लगेचच दुसरा सलामीवीर जेसन रॉयलाही कुलदीपने चालते करीत भारताच्या खात्यात आणखी एक गडी टिपला. खरी मजा आली ती पुढे. कर्णधार मॉर्गन व भरवशाचा फलंदाज जो रूट यांनी पुढची सूत्रे हाती घेत तिसऱ्या गड्यासाठी ९९ चेंडूंत १०३ धावांची भक्कम आघाडी रचित भारतीय गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली. कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी मॉर्गनने ५१ चेंडूंचा सामना करीत ५३ धावांचा योगदान दिलं. दरम्यान, रूटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावत इंग्लंडला एका समाधानकारक धावसंख्येकडे नेले. त्याने ११६ चेंडूंचा सामना करीत आठ चौकार व एक षटकार खेचत ११३ धावा केल्या. तळाचा फलंदाज डेव्हिड विलीने आठव्या क्रमांकावर येत तुफान फटकेबाजी करीत केवळ ३१ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह आपले पाहिलेवाहीले एकदिवसीय अर्धशतक झळकावले. या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत ३२२ धावांचा पल्ला गाठला. भारताच्या सफल जोड्यांपैकी एक रोहित – शिखर या जोडीने धावांचा पाठलाग अगदी पद्धतशीर चालू केला. सहाच्या सरासरीने धावा कुटत भारतीय डावाची एक चांगली सुरुवात केली. नवव्या षटकात मार्क वूडचा एक स्लोवर चेंडू तटवण्याच्या नादात रोहितचा लेग स्टम्प उखडला आणि इंग्लंडने विजयाकडे एक पाऊल उचलले. धवनही पुढच्याच षटकात विलीचा शिकार बनला आणि भारताच्या डावाला गळती चालू झाली. विराट कोहली (४५), सुरेश रैना (४६), धोनी (३७) या मधल्या फळीने काहीसा केविलवाणा प्रयत्न केला खरा परंतु मोठी भागीदारी रचण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला इंग्लंडच्या आव्हानापुढे नतमस्तक व्हावे लागले. तत्पूर्वी, भारताचा माही कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत १०००० धावांचा पल्ला गाठला. असा विक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. भारतासाठी १०००० धावांचा पल्ला सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व राहुल द्रविड यांनी गाठला आहे. तर जगातील तो १२ वा खेळाडू बनला आहे. यष्टीरक्षक म्हणून तो कुमार संगकारानंतर केवळ दुसराच खेळाडू बनला आहे. मुख्य म्हणजे या स्पेशल यादीत ५० हुन अधिक सरासरी राखणारा धोनी हा एकमेव फलंदाज आहे.]]>