चेन्नई: चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतविजेत्या एटीकेला 3-2 असे चकविले. जेजे लालपेखलुआ याला अखेर फॉर्म गवसला आणि त्याने दोन गोल नोंदवित यजमान संघाला गुणतक्त्यात आघाडी मिळवून दिली. एक मिनिट बाकी असताना एटीकेने बरोबरी साधली होती, पण अखेरच्या मिनिटाला जेजेने याने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल केला. चेन्नईयीनचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय आहे. सर्वाधिक नऊ गुणांसह त्यांनी आघाडी घेतली. दोन वेळच्या विजेत्या एटीकेची निराशा कायम राहिली. चार सामन्यांत अवघ्या दोन गुणांसह हा संघ तळात अखेरच्या दहाव्या स्थानावर आहे. चेन्नईयीनची मदार जेजेवर होती. त्याने पूर्वार्धात काही वेळा चांगले प्रयत्न केले, पण त्याला फिनीशिंग करता आले नव्हते. उत्तरार्धात अखेर त्याला फॉर्म सापडला. 65व्या मिनिटाला चेन्नईयीनला कॉर्नर मिळाला. डाव्या बाजूने हा कॉर्नर मिळाला. त्यावर जेमी गॅव्हीलन याने किक मारल्यानंतर चेंडूला आखूड टप्पा मिळाला होता. त्यावर हेन्रीक सेरेनो याने हेडींगचा प्रयत्न केला. चेंडू जेजेकडे येताच त्याने लक्ष्य साधले. त्यावेळी एटीकेच्या रॉबी किन आणि देबजीत मुजुमदार यांना वेळीच हालचाली करता आल्या नाहीत. त्यांच्या ढिलाईमुळे जेजेला संधी मिळाली. जेजे हा आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा भारतीय फुटबॉलपटू आहे. त्याने एकूण 14वा गोल नोंदविला. यंदाचा हा त्याचा पहिलाच गोल आहे. आधीच्या तीन सामन्यांत त्याला केवळ दोन वेळा प्रयत्न करता आले होते. एटीकेचे प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांनी उत्तरार्धात किनला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरविले होते. तो मोसमात प्रथमच खेळत होता. बिपीन सिंग याला माघारी बोलावून किनला संधी देण्यात आली. पिछाडीनंतर एटीकेने निकराने प्रयत्न सुरु केले. पूर्वार्धात कसून प्रयत्न केलेल्या झीक्यूइन्हाने एटीकेला तारले. त्याने चेन्नईयीनच्या इनीगो कॅल्डेरॉन याच्या पायामधून चेंडू मारला. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याला चपळाई दाखविता आली नाही. 80व्या मिनिटाला झीक्यूइन्हा यानेच नियाझी कुक्वी याच्यासाठी चांगली संधी निर्माण केली होती, पण तेव्हा करणजीतने ठामपणे उभे राहात चेंडू अडविला. 84व्या मिनिटाला ग्रेगरी नेल्सन याने रेने मिहेलीच याला पास दिला. मिहेलीचने जेरी लालरीनझुला याला हलकेच पास दिला. लेफ्ट-बॅक जेरीने इनिगोच्या दिशेने चेंडू मारला. इनीगोने मारलेला चेंडू टॉम थॉर्पच्या कोपराला लागून नेटच्या दिशेने गेला. त्यामुळे एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार चकला. एक मिनीट बाकी असताना एटीकेने बरोबरी साधली. किनने कुक्वीला पास दिला. कुक्वीने मारलेला चेंडू करणजीतने अडविला, पण रिबाऊंडवर कुक्वीने संधी साधली. त्यानंतर खचून न जाता चेन्नईयीनने प्रतिआक्रमण रचले. इनीगोने मारलेला चेंडू देबजीतने हाताने अडविला, पण हा चेंडू जेजे याच्या पायापाशी गेला. मग जेजे याने उरलेले काम फत्ते केले. या गोलनंतर नेहरू स्टेडियमवरील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. जेजे याचा हा आयएसएल कारकिर्दीमधील एकूण 15वा गोल ठरला. पुर्वार्धात सुरवात बरी झाली होती. पाचव्या मिनिटाला झीक्यूइन्हा याने तीन प्रतिस्पर्ध्यांना चकवित एटीकेकडून पहिली चाल रचली. त्याने बिपीन सिंग याच्या पायापाशी पास दिला. बिपीनने उजवीकडे वळत चेंडू मारला, पण तो थोडक्यात बाहेर गेला. 13व्या मिनिटाला प्रबीर दास याने उजव्या बाजूने चाल रचत धुर्तपणे बिपीनला पास दिला. बिपीनने त्याच्या मार्करला चकवित झीक्यूइन्हा याला चांगली संधी मिळवून दिली, पण झीक्यूइन्हा याने स्वैर फटका मारला. त्यामुळे चेंडू बराच बाहेर गेला. त्यावेळी एटीकेच्या बचाव फळीवर दडपण आले होते. जेजेने 21व्या मिनिटाला त्याने डाव्या बाजूने आगेकूच केली, पण टॉम थॉर्पने त्याला रोखले. टॉमने डावा पाय मध्ये घालत चेंडू ताब्यात मिळविला. असे काही अपवाद सोडल्यास पहिल्या सत्रात काही घडले नाही. खेळाची गती मात्र संथच राहिली. निकाल चेन्नईयीन एफसी: 3 (जेजे लालपेखलुआ 65, 90, इनीगो कॅल्डेरॉन 84) विजयी विरुद्ध एटीके: 2 (झीक्यूइन्हा 77, नियाझी कुक्वी 89)]]>