मुंबईने 17 सामन्यांत नववा विजय मिळविला असून तीन बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. त्यांनी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीला (17 सामन्यांत 28) मागे टाकत एक क्रमांक प्रगती केली आणि तिसरे स्थान गाठले. बेंगळुरू एफसी 34 गुणांसह आघाडीवर आहे. त्यानंतर एफसी गोवा संघ 31 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एटीकेला 17 सामन्यांत सहावा पराभत पत्करावा लागला. पाच विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 21 गुण व सहावे स्थान कायम राहिले. उरलेला एक सामना जिंकला आणि इतर लढतींचे निकाल काहीही लागले तरी एटीके आगेकूच करू शकणार नाही.
मुंबईने पूर्वार्धात दोन गोल करीत पकड घेतली. 26व्या मिनिटाला प्रांजल भूमीजने आगेकूच करीत प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात मुसंडी मारली. मोडोऊने त्याच्या पासवर चेंडूवर व्यवस्थित नियंत्रण मिळवित बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने नेटच्या उजवीकडे मैदानालगत फटका मारत गोल नोंदविला. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
मोडोऊनेच 13 मिनिटांनी दुसरा वैयक्तिक व सांघिक गोल केला. सौविक चक्रवर्ती याने ही चाल रचत उडवीकडील अरनॉल्ड इसोकोला पास दिला. इसोकोने आगेकूच करीत मोडोऊला बॉक्समध्ये क्रॉस पास दिला. मोडोऊने मग परिपूर्ण फिनीशिंग केले. दुसऱ्या सत्रात मोडोऊने 60व्या मिनिटास गोल केला. पाऊलो मॅचादो याने उजवीकडून आगेकूच केल्यानंतर एटीकेचा आंद्रे बिके चपळाई दाखवू शकला नाही. त्यामुळे मोडोऊला पास मिळाला. एटीकेच्या अर्णब मोंडलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मोडोऊने शांतचित्ताने फिनिशिंग केले.
सात मिनिटांनी एटीेकेने खाते उघडताना पिछाडी कमी केली. प्रीतम कोटलने उजवीकडून रचलेल्या चालीवर आंद्रे बिकेने उडी घेत हेडिंग केले आणि मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला चकविले, पण त्यानंतर एटीकेला आणखी यश आले नाही.
एटीकेने पहिला प्रयत्न दुसऱ्याच मिनिटाला केला. एदू गार्सियाने नेटच्या दिशेने फटका मारला, पण मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याने सहज बचाव केला. सातव्या मिनिटाला पाऊलो मॅचादोने इसोकोला पास दिला. त्यातून मोडोऊला संधी मिळाली. त्याने हेडिंग केले, पण अरींदमने चेंडू सहज अडविला. दहाव्या मिनिटाला शुभाशिष बोसने जयेश राणेला पाठीमागून धक्का देत रोखले. त्यामुळे एटीकेला फ्री किक देण्यात आली, पण त्यावर विशेष काही घडले नाही.
प्रांजलने 12व्या मिनिटाला डावीकडून बॉक्समध्ये चेंडू मारला, पण तो ब्लॉक झाला. मॅटीयस मीराबाजेने चेंडूवर ताबा मिळवित प्रयत्न केला, पण एटीकेच्या अर्णब मोंडलने चेंडू ब्लॉक केला.
जयेशने 17व्या मिनिटाला उजवीकडून मुसंडी मारत गार्सियाला पास दिला. गार्सियाने बॉक्समध्ये प्रवेश केला, पण तो पास देऊ शकेल अशा स्थितीत एकही सहकारी नव्हता. त्यामुळे ही संधी वाया गेली. प्रांजलने 22व्या मिनिटाला डावीकडून बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने मोडोऊला क्रॉस पास दिला. मोडोऊने मात्र जादा ताकद लावत फटका मारला. त्याचवेळी आंद्रे बिकेने त्याला रोखले.
पाऊलो मॅचादोने 25व्या मिनिटाला डावीकडून कॉर्नर घेतला, पण अरिंदमने चेंडू अडविला. 31व्या मिनिटाला एटीकेला कॉर्नर मिळाला. गार्सियाने बॉक्समध्ये मारलेला चेंडू हेडींग करण्यासाठी आंद्रे बिके आणि गेर्सन व्हिएरा या दोघांनी उडी घेतली. यात व्हिएरा यशस्वी ठरला, पण त्याच्या प्रयत्नात अचूकता नव्हती.
]]>