चार महिन्यांच्या लीगविषयी खेळाडू आणि प्रशिक्षक आनंदी केवळ दोन महिने आणि तीन दिवसांच्या कालावधीत मुख्य प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी मुंबई सिटी एफसीचे दैव पालटले. सातत्याचा अभाव तसेच ढिसाळ बचाव हीच या संघाची ओळख बनली होती, पण याच संघाने गुणतक्त्यात आघाडी घेतली. तब्बल नऊ सामन्यांमध्ये त्यांनी एकही गोल न स्विकारता क्लीनशीट राखली. साठ दिवसांच्या घरातील कालावधीत कोस्टारीकाचे गुईमाराएस असे समुळ परिवर्तन घडवू शकत असतील तर त्यांना तसेच इतर मुख्य प्रशिक्षकांना चार महिन्यांच्या कालावधीत आपल्या कल्पना आणखी सफाईदार पद्धतीने राबविता येतील आणि हिरो इंडिन सुपर लिगमध्ये आपल्या संघांकडून परिणामकारक कामगिरी करून घेता येईल. गुईमाराएस यांनी सांगितले की, यंदाच्या मोसमात खेळाडूंचे तंदुरुस्तीच्या आघाडीवरील सावरणे आणि सुसज्ज होणे तसेच पूर्वतयारी यांसाठी पुरेसा वेळ मिळेल. आम्ही वेगवेगळ्या शैलींचा प्रयोगही करून पाहू शकू. जास्त कालावधीच्या लीगमुळे प्रत्येक प्रशिक्षकाला आपल्या कल्पना राबविण्यास आणि खेळाडूंना जाणू घेण्यास जास्त वेळ मिळेल. गुईमाराएस हे फेरनियुक्ती झालेले एकमेव मुख्य प्रशिक्षक आहेत. पदार्पण करणाऱ्या बेंगळुरू एफसीचे अल्बर्ट रोका हे गेल्या मोसमात हिरो आय-लीगचा भाग होते. गुईमाराएस यांनी मुंबई सिटी एफसीचा आणखी एका वर्षांचा प्रस्ताव स्विकारण्यास फार वेळ घेतला नाही. एफसी गोवाचा मध्यरक्षक ब्रुनो पिन्हैरो याने सांगितले की दिर्घ कालावधीची लीग हे मी भारतात पुन्हा येण्याचे मुख्य कारण आहे. ब्रुनो पहिल्या मोसमात गोव्याकडून खेळला. दोन वर्षांच्या खंडानंतर तो परतला आहे. पोर्तुगालच्या या फुटबॉलपटूने सांगितले की, याचा सर्वाधिक फायदा खेळाडूंना आहे. त्यांना तंदुरुस्तीच्या आघाडीवर सावरून सुसज्ज होता येईल. त्यामुळे कामगिरीतही सुधारणा होईल. चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी यासंदर्भात विस्ताराने भाष्य केले. 63 वर्षांचे ग्रेगरी म्हणाले की, मी गेल्या मोसमातील स्पर्धेचे वेळापत्रक पाहिले. एका टप्यास चेन्नईयीन सहा दिवसांत तीन सामने खेळले होते. हे केवळ भयंकर आहे. ट्रेनींग ड्रील्सबद्दल बोलायचे झाले तर मी इंग्लंडच्या तुलनेत वेगळे काही करणार नाही. तेथील क्लब 38 आठवड्यांत 46 सामने खेळतात. आठवड्याच्या मध्यास एफए आणि लिग करंडकांच्या लढती होतात. दिर्घ कालावधीच्या लीगमुळे प्रशिक्षक तसेच खेळाडूंना एकमेकांना जाणून घेण्यास पुरेसा वेळ मिळतो. इयन ह्युम हा हिरो आयएसएलशी परिचीत आहे. कालावधी कसाही असला असता तरी आपण परतलो असतो असे त्याने नमूद केले, पण त्याचवेळी त्याने महत्त्वपूर्ण निरीक्षण सुद्धा नोंदविले. पूर्वी आयएसएल ही एक स्पर्धा होती. आता ती लिग बनली आहे, असे विधान त्याने केले. जास्त कालावधीच्या लीगमुळे प्रमुख खेळाडूंना आकर्षित करण्यात अडथळा येईल असे त्याला वाटत नाही. मँचेस्टर युनायडेचा माजी खेळाडू दिमीतार बेर्बाटोव आणि वेस ब्राऊन असे दर्जेदार खेळाडू करारबद्ध झाल्यामुळे कालावधी वाढणे हे लिगच्या प्रगतीचे लक्षण असल्याचे त्याने आवर्जून सांगितले. हिरो आयएसएलचा एक वेळचा विजेता असलेला ह्युम पुढे म्हणाला की, जास्त संघ आणि जास्त कालावधीमुळे ही लिग उत्तरोत्तर स्थिरावत जाईल आणि लौकीक निर्माण करेल. सर्बियाचे रँको पोपोविच हे एफसी पुणे सिटीमध्ये अँटोनीओ हबास यांच्याकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्रे हाती घेत आहेत. आपल्या पद्धतीला भारतीय खेळाडू कसा चांगला प्रतिसाद देत आहेत आणि आकलन करीत आहेत याविषयी त्यांनी भाष्य केले. कमी कालावधीच्या लिगमुळे सुट्टीचा काळ अकारण वाढतो, असे सुद्धा त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, युरोपमध्ये आम्हाला एक किंवा दोन महिन्यांची सुट्टी मिळते. त्यामुळे येथे खेळाडू दिर्घ सुट्टीवरून परत आले हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. आताचा निर्णय हा हिरो आयएसएलच्या प्रगतीला चालना देणारा आहे. पुण्याचा विंगर किन लुईस याने सांगितले की, जास्त कालावाधीसाठी करारबद्ध होण्यात खेळाडूंचे कल्याण हा एक फार फायद्याचा मुद्दा आहे. हिरो आयएसएलच्या मिडीया डेनिमित्त सर्व प्रशिक्षकांनी संवाद साधला. आपल्याला ज्या कल्पना राबवायच्या आहेत त्याविषयी त्यांनी ठामपणे भाष्य केले. त्यासाठी वेळ लागेल हे त्यांनी नमूद केले. आधीच्या तुलनेत कालावधी दुपटीने वाढला आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यासाठी शिकण्याचा तसेच कल्पना मैदानावर राबविण्याचा मोसम अशी त्यांची आठवण राहील.]]>