सलग तीन सामने जिंकलेल्या मुंबईचा सामना एटीकेने राखला गोलशून्य बरोबरीत. इंडियन सुपर लीगच्या ३८व्या सामन्यात यजमान मुंबईला गोलशून्य बरोबरीत राखण्यात पाहुण्या अटलाटिको दि कोलकाताला यश आलं. विजयाची हॅट -ट्रिक साधलेलया मुंबई सिटी एफसीला मिळालेल्या संधी साधता आल्या नाही आणि चौकार मारण्याची ऐतिहासिक संधी त्यांना गमवावी लागली. दिल्ली डायनामोज (२-०), चेन्नयान एफसी (१-०) व नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी (१-०) यांनी पराभूत करून विजयाची हॅट-ट्रिक साधलेल्या व प्रमुख खेळाडूंचा बहरात आलेला फॉर्म यांनी आत्मविश्वास दुणावलेल्या मुंबई सिटी एफसीने आज येथे झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी अटलाटिको दि कोलकाताला चांगलीच टक्कर दिली. तिकडे मागील तीन सामन्यांत दोन विजय मिळवलेल्या कोलकातानेही मुंबईला जशास तसे उत्तर दिले. मुंबईसाठी मागच्या सर्वोत्तम कामगिरी केलेला बलवंत सिंग आज मुंबईशी विरुद्ध बाजूने दोन हात करण्यास सज्ज होता. अगोदरच दोन्ही संघांत पूर्वीपासून ठसन असल्याने तोही एक चांगला मुकाबला अंधेरीच्या मुंबई फुटबॉल अरेनावर पाहावयास मिळाला. दोन्ही संघांतील खेळाडू प्रत्येक क्षणास एकमेकांवर हावी होताना दिसत होते. दुसऱ्या मिनिटाला मुंबईच्या सेहनाज सिंगने साधारणतः ३० यार्डापासून गोल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू गोलपोस्टपासून खूपच दूर राहिला. लगेच नवव्या मिनिटाला एटीकेचा स्पॅनिश कर्णधार मॅन्युयल लंझारोटेने एटीकेसाठी प्रयत्न केला पण तोही असफल ठरला. सामान्यांच्या अगदी सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमकतेवर भर देत सामन्यात रंगत आणली. पहिल्या हाफचा विचार केला तर मुंबईला बऱ्याच संध्या भेटल्या पण एकही संधी गोलमध्ये रूपांतर करता आली नाही. मुंबईसाठी तब्बल चार वेळेस गोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण एटीकेच्या बचाव फळीला भेदण्यात त्यांना काही यश आलं नाही. तर एटीकेचा विचार केला असता त्यांनाही काहीश्या सामान संधी भेटल्या. एटीकेने दोन वेळेस चेंडूला गोलपोस्टमध्ये धाडण्याचा प्रयत्ने केला पण मुंबईच्या बचाव फळीने येथे आपली सर्वोत्तम कामगिरी पेश करीत एकदाही गोल करू दिला नाही. यात मुंबईचा कर्णधार व गोलकिपर अमरिंदर सिंगने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मुंबईने चेंडूवर ताबा मिळवण्यात २०३ वेळेस यश प्राप्त केले तर दुसरीकडे एटीके हा आकडा १३६ इतका होता. मुंबईसाठी हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्याची आयतीच संधी होती. पण कोलकाताच्या खेळाडूंनी मुंबईचे हे स्वप्न काही पूर्ण होऊ दिलं नाही. पूर्वार्धात काहीसा सावध खेळल्या मुंबईने मात्र उत्तरार्धात आपली आक्रमकता चांगलीच दाखवली. ५२व्या मिनिटाला राफेल बास्तोसने मुंबईसाठी अप्रतिम प्रयत्न केला. त्याने किक केलेला चेंडू गोलपोस्टच्या थोडा वरून गेला अन्यथा इथे मुंबईला गोल करून सामन्यात आघाडी घेण्याची चांगलीच संधी होती. तिकडे एटीकेही दुसऱ्या हाफमध्ये चांगलीच आक्रमक होताना दिसली. त्यांच्या बचाव फळीने सुरेख नमुना पेश करीत मुंबईचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले. सामना जसा जसा आपल्या अंतिम टप्प्यात येत होता तसतसा दोन्ही संघांच्या खेळाडूंना हुरूप येताना दिसत होता. चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी जमेल तो प्रयत्न खेळाडू करीत होते. ८२व्या मिनिटाला तर मुंबईने मॅन्युयल लंझारोटेच्या चुकीवर पेनल्टीची मागणी केली पण पंचांनी ती फेटाळली. मुंबईने उत्तरार्धात दोन वेळेस गोलवर टार्गेट केला पण त्यांना दोन्ही वेळेस अपयश आलं. मिळालेल्या अतिरिक्त चार मिनिटांच्या वेळेतही नाट्यमय घडामोडी झाल्या पण गोल मात्र कोणत्याच संघाला करता आला नाही. शेवटी सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. मुंबईने जर हा सामना जिंकला असता तर त्यांना इंडियन सुपर लीगच्या इतिहासात सलग चार सामने जिंकण्याची किमया साधता आली असती.]]>