मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात महाराष्ट्र डर्बीचा दुसरा सामना रविवारी मुंबई स्पोर्टस एरिनाच्या मैदानावर होईल. यात आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई सिटी एफसीला एफसी पुणे सिटीवर विजय अनिवार्य असेल. या सामन्यात आव्हान पणास लागले असल्याची जाणीव मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांच्याप्रमाणेच त्यांच्या संघातील खेळाडूंना सुद्धा आहे. मुंबई 13 सामन्यांतून 17 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. गुईमाराएस म्हणाले की, या आठवड्यात इतर संघांचे लागलेले निकाल बघता आम्हाला लिग जिंकण्याची अजूनही संधी असल्याची कल्पना आहे. खेळाडू हे लक्षात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. बाद फेरीच्या शर्यतीमधील आव्हान कायम राखण्यासाठी आम्हाला रविवारी चांगली संधी असेल. मुंबईला सामने जिंकण्याची गरज आहे, पण घरच्या मैदानावर त्यांचा फॉर्म खराब आहे. त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले. जमशेदपूरविरुद्ध 1-2, बेंगळुरूविरुद्ध 0-2, तर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 0-1 असे प्रतिकूल निकाल लागले. त्यामुळे आता घरच्या मैदानावरील कामगिरी सावरण्याची जबाबदारी ल्यूचीयन गोएन व त्याच्या खेळाडूंवर आहे. संघाच्या गेल्या काही सामन्यांतील कामगिरीबद्दल गुईमाराएस म्हणाले की, संधी मिळते तेव्हा तुम्ही फायदा उठवायला हवा. बाद फेरीच्या नजिक असलेल्या संघाविरुद्ध आमचा सामना आहे. त्यामुळे ते आमच्यावर दडपण आणतील, पण आम्ही सज्ज आहोत. आम्ही खेळ उंचावण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू. फॉर्मसाठी झगडणारा स्ट्रायकर बलवंत सिंग याच्या क्षमतेविषयी गुईमाराएस यांनी विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रत्येक खेळाडूला खराब दिवसाला सामोरे जाते, पण या लढतीत धडाकेबाज खेळ करण्यासाठी बलवंत आतूर आहे. पुणे गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. मागील सामन्यात त्यांचे मुख्य प्रशिक्षक रँको पोपोविच यांना पंचांबरोबरील वादामुळे मैदानालगत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली. यानंतरही पुण्याने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय खेचून आणला. पुण्याने 14 सामन्यांतून 25 गुण मिळविले आहेत. लिगच्या इतिहासात प्रथमच बाद फेरीची संधी त्यांना आहे, पण सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजिच यांनी संघाला गाफील न राहण्याचा इशारा दिला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आयएसएलमधील एकही सामना सोपा नाही. आम्हाला योग्य निकाल साधण्यासाठी रविवारी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. महाराष्ट्र डर्बीच्या पहिल्या सामन्यात नोव्हेंबरमध्ये पुण्याने घरच्या मैदानावर 2-1 अशी बाजी मारली होती.]]>