सनरायझर्स हैद्राबाद व हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात तिकिटांवरून वाद?

SRH Logo

आयपीएलच्या मोफत पासवरून एचसीए व एसआएच यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. तर यामध्ये आता आयपीएल बॉडी व बीसीसीआय यांनी उडी घेतली आहे. 

हैद्राबाद (प्रतिनिधी): मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी सोमवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) आणि आयपीएल फ्रँचायझी – सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यातील सुरू असलेल्या वादाची गंभीर दखल घेतली. 

२०१६ च्या आयपीएल विजेते सनरायझर्स हैद्राबादने आरोप केला आहे की एचसीए त्यांच्या व्यवस्थापनाला त्रास देत आहे आणि उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी अतिरिक्त मोफत पासची मागणी करत आहे.

एसआरएचच्या अधिकारांच्या म्हणण्यानुसार जर बीसीसीआय व तेलंगणा सरकारने जर याची वेळीच दखल घेतली नाही तर त्यांना इतरत्र सामने स्थलांतरित करण्यावाचून पर्याय उरणार नाही. शिवाय, बीसीसीआय व तेलंगणा सरकारने यात हस्तक्षेप करून वेळीच विषय निकाली लावण्याची विनंतीही सनरायझर्सने केली असल्याचे समजत आहे. 

हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनकडून आरोपांचे खंडन

दरम्यान, हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी एचसीएवर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असोसिएशनने अशी कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तसेच, सनरायझर्सकडूनही असली कोणतीही तक्रार केलेली नाही. एचसीए अध्यक्षांनी पुढे आरोप केला की हा वाद असोसिएशनची प्रतिष्ठा आणि फ्रँचायझीशी असलेल्या संबंधांना हानी पोहोचवण्याचा एक दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहे.