जखमी ऋतुराजच्या जागी थाला धोनीने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सीएसकेला घरच्या मैदानावर मानहानीकारक प्रभाव स्वीकारावा लागला. स्पर्धेतील त्यांच्या आशा आता जवळपास संपत आल्या आहेत.
चेन्नई (प्रतिनिधी): चेन्नई सुपर किंग्स आणि नाट्यमय घडामोडी हे समीकरण आयपीएल रसिकांना काही नवीन नाही. स्पर्धेच्या इतिहासातील एक यशस्वी संघ मागील चार-पाच वर्षांत तर जरी दोनदा विजेता ठरला असला तरी संघातील वारंवार बदल आणि भविष्याचा विचार करता न सापडलेला कर्णधार काही त्यांचा पिच्छा सोडत नाही. यंदाही तेच रडगाणं. एक स्पर्धेच्या मध्यात ऋतुराज गायकवाड जखमी झाला आणि पुन्हा एकदा संघाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीला देण्यात. पण कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध झालेल्या सामन्यात एका मोठ्या व मानहानीकारक पराभवाची नामुष्की ओढवावी लागली.
अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात केकेआरला प्रवास जरी संमिश्र राहिला असता तरी मोठ्या सामन्यात नेतृत्व कसे करायचे ते त्याला चांगलेच माहित आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावल्यांनंतर सीएसकेला धावांची मोठी कसरत करायला लावली. पिवळ्या जर्सीमध्ये अथांग सागरासारखा चेपॉक स्टेडियम आपल्या लाडक्या थालासाठी हाऊसफुल झाला होता. परंतु कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत हाऊसफुल स्टेडियमची बत्तीच गुल केली. एक-एक धावेसाठी त्यांना कष्ट करायला लावले. डेवोन कॉन्वे (१२) व राहीन रवींद्र (४) या न्यूझीलंडच्या सलामी जोडीला पावरप्लेमध्ये गुंडाळल्यानंतर विजय शंकरने काहीशी झुंझ दिली. त्याला शिवम दुबेने थोडीशी साथ देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु कसलेल्या केकेआरच्या गोलंदाजांनी संधी साधत एक-एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
सुनील नरेनने तीन, हर्षित राणा, वरून चक्रवर्तीने प्रत्येकी दोन तर वैभव अरोरा, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गाडी बाद करीत चेन्नईला १०३ धावांत रोखले.
मुंबई इंडियन्सविरुद्ध घराच्या मैदानावर पहिला सामना जिंकून २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगचा श्रीगणेशा केलेल्या चेन्नईला त्यानंतर मात्र फक्त आणि फक्त पराभवाचा सामना करावा लागला आहे. सामन्यागणिक संघात बदल करत असल्यामुळे कदाचित त्यांना हा फटका बसला असावा.
माफक आव्हान पार करण्यास उतरलेल्या केकेआरने दमदार सुरुवात करीत आपले मनसुबे स्पष्ट केले. पहिल्या गड्यासाठी ४६ धावांची स्फोटक सलामी दिल्यानंतर पावरप्लेमध्ये ७१ धावा करून सामना एकहाती आपल्या हाती झुकावला. पाच षटकार ठोकत १८ चेंडूंत ४४ धावा करणाऱ्या सुनील नरेनला नूर अहमदने बाद केल्यानंतर राहाणेने रिंकू सिंगच्या साथीने ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केकेआरला विजयी केले.
या निकालानंतर अंकतालिकेत मोठे बदल झाले. सहापैकी तीन सामने जिंकत केकेआर तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. दुसरीकडे सहापैकी पाच सामने गमावणाऱ्या सीएसकेला मात्र नवव्या स्थानी राहावे लागले आहे. त्यांच्यासाठी आता उर्वरित सामन्यांत किमान सहा सामने जिंकण्याचे आव्हान असणार आहे.