आयपीएल २०२५ मध्ये घराच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळताना मुंबई इंडियन्सने आपला फेव्हरेट प्रतिस्पर्धी कोलकाता नाईट रायडर्सचा एकहाती पराभव करीत पहिल्या विजयाची नोंद केली.
मुंबई (प्रतिनिधी): गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सवर नेहमीच वर्चस्व गाजवलेल्या मुंबई इंडियन्सने आज मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवत यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये अखेर गुणांचं खातं उघडलं. ३४ सामन्यांत तब्बल २३, तर वानखेडेवर निर्विवाद वर्चस्व (११ सामन्यांत नऊ विजय) असणाऱ्या मुंबई इंडियन्सने आज केकेआरचा सुपडा पार करीत एक मोठा विजय संपादित केला. आयपीएल मधील आपला पहिलाच सामना खेळणारा अश्वनी कुमार सामन्याचा खरा मानकरी ठरला.
मुंबई इंडियन्स सामन्यागणिक नवख्या खेळाडूंना संधी देते. हे खेळाडूही काही तरी चांगली स्टोरी घेऊन संघात आलेले असतात. संघात मिळालेल्या संधीचे सोने करीत हे खेळाडू मुंबई इंडियन्सचे नाव मोठे करतात. आजही अशीच नवी कहाणी अश्वनी कुमारने हाऊसफुल वानखेडेच्या प्रेक्षकांसमोर पेश केली. पहिल्या दोन षटकांत दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर अश्वनीने आपल्या अचूक व भेदक गोलंदाजीच्या जोरावर केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला.
कर्णधार अजिंक्य राहाणे (११), रिंकू सिंग (१७), आतापर्यंतच्या सर्व १८ आयपीएल सत्रांत खेळलेला मनीष पांडे (१९) आणि विस्फोटक आंद्रे रसेल (५) अश्या भक्कम मधली फळीचे कंबरडे मोडून काढीत केकेआरला ११६ धावांत गारद करण्यात मोलाचा वाटा उचलला. मुंबई इंडियन्सने केकेआरला १२० धावांच्या आत आयपीएल इतिहासात तब्बल सहाव्यांदा बाद केले. मुख्य म्हणजे केकेआर एकूण १० वेळेस इतक्या कमी धावसंख्येवर बाद झालाय.
आणखी मजेची बाब म्हणजे अश्वनीचे एक षटक शिल्लक असतानाही मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने ट्रेंट बोल्ट व नंतर मिचेल सॅन्टेनर यांच्याकरवी गोलंदाजी करीत कोलकाताचा डाव आटोपला. कदाचित अश्वनीने सोडलेले दोन सोपे झेल त्याला महागात पडले. एकूणच, मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट्स घेत संघाच्या विजयात हातभार लावला.
मागील चार-पाच सत्रांत सुमार कामगिरी केलेल्या मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवून आत्मविश्वास संपादन करणे गरजेचे होते. पहिले दोन सामने हरल्यानंतर आज हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स काहीशी लयमध्ये आलेली दिसली. ११७ धावांचे माफक आव्हान पार करण्यास उतरलेल्या मुंबईने अगदी सहजतेने लीलया पार केली. केवळ दोन गडी गमावत मुंबईने १३व्या षटकातच आव्हान पार केले.
सहाव्या षटकात पन्नाशी व १२व्या षटकात शंभरी गाठलेल्या मुंबईसाठी सलामीवीर रायन रीकलटने चार चौकार व पाच षटकारांसह ४१ चेंडूंत नाबाद ६२ धावांची अप्रतिम खेळी करीत मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. रोहित शर्मा (१३) पुन्हा एकदा स्वस्तात परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने नऊ चेंडूंत तीन चौकार व दोन षटकार खेचत नाबाद २७ धावांची छोटीशी पण उपयुक्त खेळी केली.