पुन्हा एकदा पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गमावण्याची परंपरा कायम

Noor Ahmad celebrating after wicket

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थित उतरलेल्या मुंबई इंडियन्सला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्न्सने चार गडी राखत पराभूत केले.

चेन्नई (प्रतिनिधी): आयपीएल, मुंबई इंडियन्स आणि पहिला सामना. जणू मुंबई इंडियन्सला लागलेले एक ग्रहणच. सलग १३ वर्षे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम व बलाढ्य संघ आपला पहिला सामना गमावत आला आहे. भले संघाने या कालावधीत पाच जेतेपद फटकावलेत, पण हरण्याची जणू परंपराच चालू केली आहे. आपल्या द्वंव प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्सकडून सलग चौथा सामना गमावत २०२५ सत्राचा श्रीगणेशा केला.

मुंबई इंडियन्स जरी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असला तरी मागील चार-पाच वर्षांपासून संघात काही ठीक चाललेले दिसत नाही. २०२० च्या जेतेपदानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दाखवण्यासारखे विशेष असे काही नाही. सध्याच्या शेयर मार्केटच्या ट्रेंडप्रमाणे त्यांची काहीशी घसरण दिसत आहे. कर्णधार हार्दिक पांड्या व स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले खरे पण चेन्नईच्या संघापुढे, त्याचाही चेपॉकच्या ‘यलो आर्मी’ समोर त्याचा निभाव लागला नाही. 

ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. टी-२० विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्माला भोपळाही फोडू न देता चेन्नईच्या गोलंदाजानी पहिल्या षटकापासूनच सामन्यावर आपली पकड बनवण्याची सुरुवात केली. खलील अहमदच्या भेदक माऱ्यासमोर झुकल्यानंतर चेन्नईच्या स्पिनर्सनी मुंबईच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. एकही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. नूर अहमदच्या जादुई हात चलाकीसमीर मुंबईच्या मधल्या फळीने अक्षरशः नांगी टाकली. आपल्या चार षटकांत फक्त १८ धावा देत सूर्यकुमार (२९), तिलक वर्मा (३१), रॉबिन मिन्झ (३), नमन धीर (१७) यांना एका मागोमाग एक माघारी धाडत मुंबईच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. दीपक चहरच्या २८ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १५० धावांचा पल्ला गाठला.

चेपॉकच्या खेळपट्टीवर पाठलाग करणे तितके सोपे नसते. पण मुंबई इंडियन्सच्या केवळ १५५ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचीही तारांबळ उडाली. त्यांना लक्ष गाठण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंतची वाट पाहावी लागली. ऋतुराज व रचिन रवींद्र यांच्या अर्धशतकांचा अपवाद वगळता चेन्नईच्या इतर फलंदाजांना मात्र खूप कष्ट करावे लागले. मुंबई इंडियन्सने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलेल्या विघ्नेश पुथूरने कमाल करीत चेन्नईच्या तीन फलंदाजांना बाद करीत काही काळ काटा मुंबईकडे झुकवला. त्याने ऋतुराज (५३), शिवम दुबे (९) व दीपक हुड्डा (३) यांना बाद केले. दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचा सर्वोत्तम खेळाडू रचिन रवींद्रने (६५*) एका बाजूने चेन्नई डाव सांभाळत नाबाद अर्धशतक झळकावत शेवटच्या षटकात मिड-विकेटला षटकार ठोकत चेन्नई सामना जिंकून दिला.