वॉटसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने जिंकला तिसऱ्यांदा आयपीएलचा खिताब मुंबई: दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलच्या रणांगणात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई येथील वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत विजयाचा आगाज केला आणि रविवारी (२७ मे) सनरायसर्स हैद्राबादला चारीमुंड्या चीत करीत पुन्हा एकदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दोन वर्षांनी पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचा योग्यरीत्या फायदा घेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने गमावलेले नावलौकिक पुन्हा एकदा मिळवीत आपल्या तमाम क्रिकेटवेड्या रसिकांना मोठं गिफ्ट दिलं. कावेरी प्रकल्पातून झालेल्या वादाचा फटका बसल्यानंतर पुणे येथे घरचे सामने खेळले गेल्यानंतरही धोनीच्या चेन्नईने झकास कामगिरी करीत आयपीएलमध्ये आपणच सुपरकिंग्स आहोत हे सिद्ध करून दाखवलं. क्वालिफायर १ मध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले होते. त्या वेळेस चेन्नई सुपर किंग्सने अटीतटीच्या लढतीत सनरायसर्सवर शेवटच्या षटकात २ गडी व पाच चेंडू राखत विजय मिळवला होता. हैद्राबादला इथे संधी होती ती बदला घ्यायची. धोनीने नाणेफेक जिंकत विलियम्सनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि दुसऱ्याच षटकात श्रीवस्त गोस्वामीला (५ चेंडू ५ धावा) धावबाद करीत पहिला धक्का दिला. मग मदार आली ती शिखर धवन व कर्णधार केन विलियम्सन यांच्यावर. धोनीने आपले गोलंदाज अदलाबदली करीत योग्य रीतीने वापरात हैद्राबादच्या अनुभवी जोडीला सुरुवातीला काहीसे जखडून ठेवले. लुंगी एनगिडीने चौथे षटक निर्धाव टाकत धावसंख्येवर रोख लावला. पण या जोडीने पाचव्या षटकात १३ व सहाव्या षटकात १२ धावा कुटत पावरप्लेअखेरीस धावसंख्या एक बाद ४२ वर आणून ठेवली. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सत्रात गुणतालिकेत अग्रस्थानी राहिलेल्या सनरायसर्सने दुसऱ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ५१ धावांची संयमी भागीदारी रचित डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नवव्या षटकात रवींद्र जडेजाने शिखर धवनचा (२५ चेंडू २६ धावा) त्रिफळा उडवीत चेन्नईला दुसरे यश मिळवून दिले. हैद्राबादला चेन्नईच्या चतुर गोलंदाजांचा सामना करण्यासाठी गरज होती ती आक्रमक खेळीची. धवनच्या बाद होण्याने विलियम्सनने चौथ्या क्रमांकावर आलेल्या शाकिब-अल-हसनच्या साथीने धावगती वाढवण्यावर भर दिला. ११ व्या षटकात जडेजाला १७ तर पुढच्याच षटकात ब्रावोला ११ धावा खेचत १२ व्या षटकात संघाला शंभरी गाठून दिली. पण विलियम्सनला ही भागीदारी पुढे नेता आली नाही. १३ व्या षटकात कर्ण शर्माने ऑफ-साईडला फेकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो धोनीकरवी यष्टीचित झाला आणि संघाला तिसरा हादरा बसला. त्याने ३६ चेंडूंचा सामना करीत ५ चौकार व २ षटकार खेचत ४७ धावांचं योगदान दिलं. हैद्राबादला आता गरज होती ती छोट्या छोट्या भागीदारीची. शाकिब-अल-हसन (१५ चेंडू २३ धावा) बाद झाल्यानंतर युसूफ पठाणने सूत्रे आपल्या हाती घेतली. जवळपास आठ-साढे आठच्या सरासरीने जाणाऱ्या हैद्राबादला इथे गरज होती ती मोठे फटके मारून एका समाधानकारक धावसंख्येवर पोचण्याची. १६ व्या षटकात शाकिब तंबूत परतल्यानंतर कार्लोस ब्रेथवेटला सहाव्या क्रमांकावर पाठवण्याऐवजी विलियम्सनने दीपक हुडाला पाठवले. पण हुडा आपली छाप सोडण्यास अपयशी ठरला. ४ चेंडूंचा सामना करीत केवळ ३ धावा करीत एनगिडीने त्याला तंबूत धाडले. मग पठाण व ब्रेथवेट यांनी सहाव्या गड्यासाठी १८ चेंडूंत झटपट ३४ धावा करीत हैद्राबादला १७८ धावांपर्यंत मजल मारून दिली. युसूफ पठाणने २५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचत नाबाद ४५ धावा केल्या तर ब्रेथवेट ११ चेंडूंत ३ षटकारांसह २१ धावा करून डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. चेन्नईतर्फे एनगिडी, शार्दूल ठाकूर, कर्ण शर्मा, ब्रावो, जडेजा या सर्वांना प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश आलं. हैद्राबादला १७८ धावांत रोखल्यानंतर तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या खिताबावर नाव कोरण्यास चेन्नई सुपर किंग्सला गरज होती ती चांगल्या सुरुवातीची. शेन वॉटसन व फॅफ डुप्लेसिस या जोडीने सावध पवित्रा घेतल्यानंतर आलेल्या दबावामुळे डुप्लेसिस (११ चेंडूं १० धावा) चौथ्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पाच षटकानंतर चेन्नईची अवस्था होती ती एक बाद २० तीही केवळ चारच्या सरासरीने. अश्या वेळेस चेन्नईसाठी धावून आले ते वॉटसन व सुरेश रैना. मधल्या षटकांत सावध पण काहीसे आक्रमक होत या दोघांनीही मिळालेल्या कमकुवत चेंडूंना अगदी सुरेखरित्या सीमेरेषेपलीकडे धाडत चेन्नईचा धावफलक हलता ठेवला. सहाव्या षटकात संदीप शर्माला १५, सातव्या षटकात सिद्धार्थ कौलला १६ व लगेच नवव्या षटकात कौललाच १६ धावा कुटत धावसंख्या दहाव्या षटकाअखेरीस ८० पर्यंत आणली. षटक क्रमांक ५ ते १० या सहा षटकांत दहाच्या सरासरीने धावा कुटत सामन्यात रंगत आणली. अडखळत सुरुवात करणाऱ्या शेन वॉटसनने खेळपट्टीवर जम बसल्यानंतर आपले रंग दाखवण्यास सुरुवात केले. रैनासोबत दुसऱ्या गड्यासाठी ५७ चेंडूंत ११७ धावांची दमदार भागीदारी रचित सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. शाकिबच्या ११ व्या षटकात १५ धावा, ब्रेथवेटच्या १२ व्या षटकात ९ धावा कुटल्यानंतर १३ व्या षटकात वॉटसनने संदीप शर्माला तब्बल २७ धावा कुटत (१ वाईड) सामन्याचे समीकरणच बदलवून टाकले. पुढच्याच षटकात ब्रेथवेटला पुन्हा एकदा १४ धावा कुटत सामना वळवला. या षटकात मात्र रैनाला (२४ चेंडू ३२ धावा) बाद करण्यात हैद्राबादला यश आलं. रैना तंबूत परतल्यानंतर सामान्याचं गणित येऊन ठेपलं ते ३० चेंडू आणि ३३ धावा. एकीकडे सेट झालेल्या शेन वॉटसनने आणखी आक्रमक होत दमदार शतक झळकावले. ५१ व्या चेंडूत रशीद खानला एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात शतक ठोकणारा वृद्धिमान सहानंतर दुसरा फलंदाज ठरला. उरलेली कसर त्याने अंबाती रायडूला जोडीला घेत पूर्ण करीत चेन्नईला तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगचा खिताब जिंकून दिला. हैद्राबादसारख्या तगड्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेत वॉटसनने एकहाती सामन्यावर आपली पकड निर्माण केली. संदीप शर्मा (४-०-५२-१), सिद्धार्थ कौल (३-०-४३-०), शाकिब-अल-हसन (१-०-१५-०) व कार्लोस ब्रेथवेट (२.३-०-२७-१) यांना अक्षरशः झोडून काढत वॉटसन व कंपनीने चेन्नईला १७९ धावांचं लक्ष ८ गडी व ९ चेंडू राखत आरामात पार करून दिलं. संक्षिप्त धावफलक सनरायसर्स हैद्राबाद १७८/६(२०) – विलियम्सन ४७(३६), युसूफ पठाण ४५*(२५), जडेजा १-२४(२), कर्ण शर्मा १-२५(३) चेन्नई सुपरकिंग्स १८१/२(१८.३) – वॉटसन ११७*(५७), रैना ३२(२४), ब्रेथवेट १-२७(२.३), संदीप शर्मा १-५२(४) चेन्नई सुपरकिंग्स ८ गडी व ९ चेंडू राखून विजयी]]>