मधल्या फळीत १६ धावांवर झालेले पाच गडी बाद व गोलंदाजांची सुमार कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पडली महाग. नऊ सामन्यांत झाला तिसरा पराभव. पुणे (दि. ५ मे): अस्तित्वाच्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरवर धोनीची चेन्नई सुपर किंग्स भारी पडली. करो व करोच अश्या लढतील विराटच्या सेनेने केली ढिसाळ फलंदाजी आणि नंतर त्याच्यात भर ती गोलंदाजांची ढिसाळ कामगिरी. याच सुमार कामगिरीमुळे कोहलीची बँगलोर टीम जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. उरलेले सर्वच सामने जिंकणे आता त्यांना भाग आहे. तर धोनीची चेन्नई फक्त चारपैकी फक्त एका विजयापासून दूर आहे जेणेकरून त्यांचा प्लेऑफ मध्ये जाण्याचा मार्ग सुकर होईल. बँगलोरची रॉयल पडझड आठपैकी केवळ तीन सामने जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. एकीकडे आजचा सामना जिंकत प्लेऑफसाठी आपले स्थान भक्कम करण्यासाठी चेन्नई तयारीत होती तर दुसरीकडे अस्तित्वासाठी विराट कोहलीची कसोटी होती. संघात बरेचशे बदल करीत कोहलीने ब्रेंडन मॅकुलमच्या जोडीला यंदाच्या आयपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या पार्थिव पटेलला धाडले. कागदावर शेर असलेल्या विराटच्या रॉयल चॅलेंजर्सला मात्र आज चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगलेच नाचवले. लुंगी एनगिडीने मॅकुलमला एका ऑफ-कटरवर चकवले आणि दुसऱ्याच षटकात बेंगलोरला पहिला धक्का दिला. मॅकुलम केवळ ५ धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही. पावरप्ले संपल्यानंतर धोनीने जडेजाला चेंडू सोपवला. जडेजाने पहिल्याच चेंडूवर कोहलीला (८ धावा, ११ चेंडू) क्लीन बोल्ड केले. या वेळेस संघाची अवस्था होती दोन बाद ४७. दोन सामने मुकल्यानंतर संघात परतलेला एबी डिव्हिलियर्सही रिवर्स स्वीप मारण्याच्या नादात पुढच्याच षटकात हरभजनच्या गोलंदाजीवर यष्टिचित झाला. या सलगच्या धक्क्यांमुळे उरलेल्या फलंदाजांनाही सावरता आले नाही. मंदीप सिंग (७) व मुरुगन अश्विन (१) हेही मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्याने रॉयल चॅलेंजर्सची फलंदाजी कोलमडली. एका बाजूने फलंदाज मैदानात येऊन हजेरी लावत होते तर दुसरीकडे पार्थिव पटेलने दुसऱ्या बाजूने चिवट फलंदाजी करीत संघाचा धावफलक हलता ठेवला. पटेलने संयमी फलंदाजी करीत आपले अर्धशतक झळकावले. पावरप्लेच्या ४७ धावांपैकी त्याच्या एकट्याच्या धाव होत्या त्या ३१. शिवाय दहा षटकांत बेंगलोरने केलेल्या ६८ धावांत त्याचा वाटा होता तो ४१ धावांचा. पटेलने आपले ११ वे आयपीएल अर्धशतक झळकावत संघाला एका बाजूने सावरले. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून देणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची गोलंदाजी आज भलतीच वेगळी दिसत होती. रवींद्र जडेजा व हरभजन सिंग या भारतीय स्पिनर्स जोडीने आठ षटकांत केवळ ४० धावा देत बँगलोरच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. यात जडेजाने तीन तर हरभजनने दोन गाडी बाद केले. आयपीएलमध्ये मध्ये पदार्पण करणारा डेव्हिड विली व लुंगी एनगिडी यांनीही केवळ सहाच्या सरासरीने धावा खर्च करीत प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. ८९ वर आठवा गडी बाद झाल्यानंतर बेंगलोरला १०० धावांचाही पल्ला गाठता येईल कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अश्या बिकट अवस्थेत टीम साऊथीने मोहम्मद सिराजला हाती घेत नवव्या गड्यासाठी २९ चेंडूंत ३८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचून दिली. याच भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर निर्धारित २० षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात १२७ धावांपर्यंत मजल मारू शकला. चेन्नईचा झंझावात सुरूच १२८ धावांचं माफक आव्हान पार करण्यास उतरलेल्या धोनीच्या सेनेने काहीशी सावध सुरुवात केली. वॉटसन (११) उमेश यादवच्या एका फुल लेन्थवर बाद होण्यापूर्वी चेन्नईला रायडूसोबत तीन षटकांत १८ धावांची सलामी भागीदारी रचून दिली. मग आलेल्या रैनाने रायडूसमावेत ४४ धावांची भागीदारी केली. रैनाने २१ चेंडूंचा सामना करीत दोन चौकार व एक षटकार खेचत २५ धावांचं योगदान दिलं. यादवच्याच गोलंदाजीवर लॉन्ग ऑन सीमारेषेवर टीम साऊथीने एक अप्रतिम झेल टिपला. बँगलोरप्रमाणेच चेन्नईचीही अवस्था काहीशी बिकटच झाली असं म्हणावं लागेल. बँगलोरच्या पावरप्ले मध्ये ४७ धावा होत्या तर चेन्नईच्या ४२. दोघांनीही एक-एक गडी गमावला होता. तिकडेच दहा षटकांनंतर बेंगलोर ६३ वर ३ तर चेन्नई ६२ वर २. बँगलोरने चेन्नईलाही चांगलेच जखडून ठेवले होते. यात मोलाचा वाट उचलला तो स्पिनर्सनी. चहलने सामन्याचे दुसरे षटक निर्धाव टाकत सुरुवातीपासूनच चेन्नईला आपल्या जाळ्यात अडकवले. धोनीचा फिनिशिंग टच रायडू (३२) व ध्रुव शौर्य (८) सलगच्या षटकांत बाद झाल्याने जबादारी आली ती कर्णधार धोनीवर. एरव्ही चौथ्या क्रमांकावर येणार धोनी आज पाचव्या क्रमांकावर आला. जिंकण्यासाठी अजूनही ४८ धावांची गरज होती. धोनीने ब्रावोसह संयमी फलंदाजी करीत बँगलोरच्या ‘प्रभावी’ स्पिनर्सचा पुरेपूर समाचार घेत १२ चेंडूं राखतात विजय मिळवून दिला. पहिल्या दोन षटकांत केवळ सात धावा दिलेल्या चहलच्या १८ व्या षटकात धोनीने तीन षटकार खेचत चेन्नईला सहा गड्यांनी विजयी केले. याच विजयाच्या बळावर चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले.]]>