हातातून निसटलेला सामना ड्वेन ब्रावोच्या अफलातून कामगिरीने जिंकत चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला एक गडी व एक चेंडू राखत केले चारीमुंड्या चित जिंकण्यासाठी १८ चेंडू, ४७ धावा आठ गडी बाद. अशी बिकट परिस्थिती असतानाही चेन्नईने ‘ब्रावो’ कामगिरी करीत मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सत्राच्या पहिल्याच सामन्यात पराजित करीत दोन वर्षांच्या बंदीनंतर आपले बिगुल बजावले. दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन झालेल्या चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. एरव्ही आयपीएलमध्ये मधल्या फळीत खेळणारा रोहित शर्मा आज इव्हीन लुईसला घेऊन सलामीस उतरला. लुईसचा हा आयपीएल मधला पहिला सामना होता. चेन्नईने दिपक चहरला चेंडू सोपावत डावाची सुरुवात केली. अगदी पहिल्याच चेंडूपासून चहरने रोहितला जखडून ठेवले. तर दुसरीकडे लुईस आपल्या पदार्पणाच्या सामन्यात चहरच्या इनस्विंगचा शिकार ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तो पायचीत बाद होत आयपीएलमधला पहिला डीआरएसचा बळी ठरला. पुढच्याच षटकात रोहित शर्मा एक मोठा फटका मारण्याच्या नादात बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या अंबाती रायडूकडे झेल देत तंबूत परतला. त्याने १८ चेंडूंत एक चौकार व एक षटकार खेचत १५ धावा केल्या. चौथ्या षटकात दोन बाद २० अशी अवस्था असताना मुंबई इंडियन्सच्या मदतीस आले ते युवा ईशान किशन व सूर्यकुमार यादव. या दोघांनी सुरुवातीस खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी थोडा काळ संयम दाखवला आणि मग सेट झाल्यानंतर आपल्या रंगात आले. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात सूर्यकुमारने चहरला एक चौकार व एक षटकार खेचत आलेला दबाव काहीसा कमी करण्याचा प्रयत्न केला. मग आठव्या षटकात ईशान किशनने जडेजाला दोन चौकार ठोकत आपणही सेट झाल्याचं दाखवून दिलं. या दोन युवा फलंदाजांनी संयम व जागरूकता दाखवत भागीदारी रचण्यावर भर दिला. ईशान किशनने ११ व्या षटकात ताहिरला दोन चौकार व एक षटकार तर सूर्यकुमारने पुढच्याच षटकात ब्रावोला सलग तीन चौकार ठोकत रंगत वाढवली. दोघेही सेट झालेत असे दिसत असताना सूर्यकुमार यादव एक मोठा फटका मारण्याच्या नादात शेन वॉटसनच्या गोलंदाजीवर डीप स्केअर लेगला हरभजनकरवी झेलबाद झाला. त्याने २९ चेंडूंत १ षटकार व सहा चौकारांच्या साहाय्याने ४३ धावा केल्या. दरम्यान, सूर्यकुमार यादव व ईशान किशन या जोडीने चौथ्या गड्यासाठी ५२ चेंडूंत ७८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादव व किशन पाठोपाठ बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आली ती पांड्या ब्रदर्सवर. कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत मुंबई इंडियन्सला एका समानधकारक म्हणता येईल अशा धावसंख्येवर आणून ठेवले. यादव-किशन यांनी केलेल्या फटकेबाजीनंतर मुंबई १८० धावांचा पल्ला आरामात गाठेल असे दिसत होते परंतु ड्वेन ब्रावोने शेवटच्या षटकांत केलेली चतुर गोलंदाजी मुंबईला १६४ धावांवरच रोखू शकली. कृणाल पांड्या ४१ (२२ चेंडू, २ षटकार, ५ चौकार) व हार्दिक पंड्या २२ (२० चेंडू, २ चौकार) यांनी पाचव्या गड्यासाठी ३२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. चेन्नई सुपर किंग्सतर्फे शेन वॉटसन २९ धावांत २, दिपक चहर १४ धावांत १ व इम्रान ताहीर २३ धावांत १ बळी मिळवण्यात यशस्वी ठरले. यात विशेष भर पाडली ती ब्रावोने. ४ षटकांत त्याने केवळ २५ धावा देत मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. धावांचा पाठलाग करण्यास चेन्नईने वॉटसन-रायडू या जोडीला मैदानात उतरले तर मुंबईने मिचेल मॅकग्लेनेघनला चेंडू सोपवला. १६६ धावांचा आव्हान चेन्नई सुपर किंग्स आरामात पार पाडेल असे वाटले होते. वॉटसनने दुसऱ्या षटकात मुस्ताफिझूर रहमानला दोन चौकार खेचत चांगली सुरुवातही केली होती. तर चौथ्या षटकात हार्दिक पांड्याला त्याने एक्सट्रा कव्हरच्या वर षटकार खेचत चेन्नईच्या प्रेक्षकांना चांगलीच पर्वणी दिली. पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. हार्दिकने गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र नकलबॉल सुरेखरित्या वापरीत वॉटसनला जाळ्यात अडकवले. लॉन्गलेगला उभ्या असलेल्या लुईसकडे १६ धावा काढत तो बाद झाला. खरी कमाल चालू झाली आता. पावरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने रैनाला (४) बाद करीत चेन्नईला दुसरा धक्का दिला. मग रोहित शर्माने मयांक मार्कंडेकडे चेंडूं सोपवला आणि त्याने आपल्या कर्णधाराला नाराज न करता सलामीस आलेल्या अंबाती रायडूला (२२) धावांवर पायचीत पकडले. विशेष म्हणजे मयांकचा हा आयपीएल मधला पहिलाच सामना होता. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर धोनीही बाद होता, परंतु पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे धोनीला एकप्रकारे जीवनदान मिळाले. धोनीही अप्रत्यक्ष मिळालेल्या या जीवनदानाचा फारसा फायदा घेऊ शकला नाही आणि मयांकच्याच गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. धोनी तंबूत परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी आपली पकड आणखी मजबूत केली. रवींद्र जडेजा (१२), दिपक चहर (०) हरभजन सिंग (८) हे स्वस्तात परातल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा जणू कणाच मोडला. पण एका बाजूला उभा असलेल्या ब्रावोने एकहाती किल्ला लढवीत मुंबईला रडवले. शेवटच्या तीन षटकांत ४७ धावा असे समीकरण येऊन ठेपले होते. १८ व्या षटकात ब्रावोने मॅकग्लेनेघनला दोन षटकार व एक चौकार खेचत २० धावा कुटल्या. पुढच्या षटकात बुमरालाही तीन खणखणीत षटकार ठोकत समीकरण सहा चेंडू सात धावा असे आणले. बुमराने मात्र शेवटच्या चेंडूवर ब्रावोला बाद केले. रिटायर्ड हर्ट झालेला केदार जाधव मैदान उतरला तो सामना जिंकण्याच्या इराद्याने. मुस्ताफिझूर रहमानचे पहिले तीन चेंडू खेळून काढत चौथ्या चेंडूवर शॉर्ट फें लेगला षटकार खेचत रंगत वाढवली. मग रोहित शर्माने आपले सर्व खेळाडू ३० यार्डच्या सर्कलमध्ये आणले. पण केदारने कोणतेही दडपण न घेता कव्हर्सला चौकार खेचत हातातून निसटलेला सामना चेन्नई सुपर किंग्सला जिंकून दिला.]]>