कमी धावसंख्या असतानाही मुंबई इंडियन्सने टिच्चून गोलंदाजी करीत सामना १४ धावांनी जिंकत मोसमातील सहावा विजय नोंदवला. मिचेल मॅकक्लेघनचे पावरप्ले मधील, तीन बळी व मॉरिस-रबाडा यांची सातव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी आजच्या सामन्याची वैशिष्ठे ठरली. मागच्या पाच सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला आज वेगळीच चव चाखायला मिळाली. मलिंगाची मागच्या दोन सामन्यांत झालेली धुलाई कर्णधार रोहित शर्माने चांगलीच मनावर घेतली आणि खूप दिवसांनी मिचेल जॉनसनला संधी दिली. मुंबईची अडखळत सुरुवात यंदाच्या मोसमात जिंकलेल्या सलग पाच सामन्यांत मुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवले होते आणि यात नाणेफेकीचा कौल मुंबईसाठी फलदायी ठरला होता. मुंबईकरच असलेला झहीर खानने दिल्ली डेअरडेविल्ससाठी नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईची विस्फोटक सलामी जोडी पार्थिव पटेल व जोस बटलर आज काहीशी दबावात दिसत होती. नऊच्या सरासरीने धावा जमवलेल्या या जोडीला आय. पी. एल. मध्ये पदार्पण करणारा कागिसो रबाडाने फोडत मुंबईला पहिला धक्का दिला. यॉर्कर टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने पार्थिव पटेल (८ धावा, ११ चेंडू, १ चौकार) त्रिफाळचीत झाला. पावरप्लेच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नितीश राणा एक चोरटी धाव घेण्यास निघाला आणि जोस बटलरला धावबाद केले. चांगल्या फॉर्मात दिसत असलेल्या बटलरलाआपली विकेट गमवावी लागली. बाद होण्यापूर्वी त्याने १८ चेंडूंत २८ धाव (३ चौकार, २ षटकार) केल्या. दिल्लीचा अचूक मारा मुंबईसाठी यंदा सर्वाधिक धावा फाटकावणारा राणा व कर्णधार रोहित शर्मा आज अडखळत खेळताना दिसले. राणा-रोहित जोडीने १३ चेंडूंत केवळ ९ धावा करत मुंबईला तिसरा धक्का दिला. झहीर खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या गोलंदाजांनी आज कसून गोलंदाजी करीत मुंबईच्या आघाडीच्या गोलंदाजांना संपूर्ण डावात दबावात ठेवले. विशेष म्हणजे पहिला सामना वगळता मुंबई इंडियन्सने पाच सामन्यांत पहिली गोलंदाजी केली होती. आज प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे फलंदाज खूपच दबावात दिसत होते. कदाचित पहिल्यांदा फलंदाजी करण्याची सवय नसल्यामुळे. धावा येत नसल्यामुळे रोहित शर्माने आक्रमक होण्याच्या प्रयत केला आणि नवव्या षटकात अमित मिश्राला डीप बॅकवर्ड स्क्वेयर लेगला षटकार मारण्याच्या नादात पॅट कमिन्सकडे सोपा झेल देत बाद झाला. चार वेगवान गोलंदाजांसह खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सने ठराविक अंतरावर गडी बाद करीत मुंबईला सुरुवातीपासूनच नियंत्रणात आणले. वानखेडेच्या फांदाजीसाठी पूरक अश्या खेळपट्टीवर मुंबई १५० धावांचातरी पल्ला गाठेल का अशी एवढी चतुर गोलंदाजी दिल्ली डेअरडेविल्सने केली. पोलार्ड व पांड्या ब्रदर्सने मुंबईसाठी काहीशी फलंदाजी केली परंतु त्यांना दीडशेच्या आकडा गाठण्यात अपयश आले. १७१ ही वानखेडेच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या असताना दिल्ली डेअरडेविल्सने मुंबईला केवळ १४२ धावांत रोखले. बटलरनंतर पोलार्डने सर्वाधिक २६ धावा (२९ चेंडू, ४ चौकार) केल्या तर दिल्लीकडून अमित मिश्राने १८ धावांत २ व पॅट कमिन्सने २० धावांत २ गडी बाद केले. मॅकक्लेघन ची कमाल माफक लक्ष्य पार करण्यास उतरलेल्या दिल्लीला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. पहिल्याच षटकात चोरटी धाव घेण्याच्या नादात आदित्य तरे हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रोवर धावबाद झाला. त्याला आपले खातंही खोलता आलं नाही. संजू सॅमसनने पुढच्या दोन चेंडूंवर दोन चौकार लगावत आपण दबावात नसल्याचे दर्शविले. मॅकक्लेघनने सॅमसनला बाद करीत मुंबई पुढचा मोठा अडथळा दूर केला. चौथ्याच षटकात श्रेयस अय्यर (६ धावा, ७ चेंडू, १ चौकार) व कोरी अँडरसन (० धाव) यांना बाद करीत दिल्लीची अवस्था ४ षटकांत चार बाद २१ अशी केली. मिचेल जॉनसनने पाचवे षटक निर्धाव टाकत पावरप्लेमध्ये दिल्लीला चांगलेच नियंत्रणात ठेवले. पावरप्लेच्या शेवटच्या षटकात बुमराने रिषभ पंतला शून्यावर बाद करीत पाहुण्यांची अवस्था अखेरीस पाच बाद २३ अशी दयनीय केली. मॉरिस-रबाडाची चिवट डाव सातव्या षटकात हार्दिक पांड्याने करून नायरला बाद करीत दिल्लीचा डाव सहा बाद २४ असा केला आणि आय. पी. एल. च्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सची ५८ धावांची निच्चांक धावसंख्या गाठेल की नाही असे दिसू लागले. आघाडीचे सहा खंबे तंबूत परतल्यानंतर ख्रिस मॉरिस व रबाडा या गोलंदाजांनी सूत्रे आपल्या हाती घेत अनुभवी फलंदाजांप्रमाणे मुंबईच्या खेळाडूंना खेळून काढले. एकेरी, दुहेरी धावा घेत-घेत व मिळालेल्या खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेत डावाला आकार दिला. १९ व्या षटकात बुमराने रबाडाला बाद करीत १२ षटकांत सातव्या गड्यासाठी जमलेली ९१ धावांची भागीदारी अखेर फोडली. रबाडाने ३९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४४ धावांचं योगदान दिलं. मुंबईचा सलग सहावा विजय रबाडाला बाद केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सुटकेचा श्वास सोडला. उरलेली कसर बुमरा व शेवटचे षटक टाकलेला हार्दिक पांड्या यांनी केली. मुंबईने दिल्लीला १४ धावांनी पराभूत करीत सात सामन्यांत सहा विजय नोंदवले. विशेष म्हणजे हे सहा विजय सलग सामन्यांत आले आहेत. मुंबईने या विजयासह आपले अव्वल स्थान कायम ठेवत अंतिम चार मध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. मुंबईचा पुढील सामना सोमवारी पुण्याविरुद्ध होईल. या सामन्याच्या दिवशी सचिन तेंडुलकरचा वाढदिवसही आहे हे विशेष. संक्षिप्त धावफलक मुंबई इंडियन्स: १४२/२(२०) – बटलर २८(१८), पोलार्ड २६(२९) । मिश्रा २-१८(४), कमिन्स २-२०(४) दिल्ली डेअरडेविल्स: १२८/७(२०) – मॉरिस ४१(५२), रबाडा ४४(३९) । मॅकक्लेघन ३-२४(४), बुमरा २-२१ (४) मुंबई इंडियन्स १४ धावांनी विजयी]]>