जगातील सर्वात मोठी, प्रतिष्ठेची व महागडी इंडियन प्रीमियर लीग आपल्या दहाव्या वर्षात उद्यापासून पदार्पण करीत आहे. प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती हा क्रीडारसिकांच्या चर्चेचा विषय असेल. नुकताच भारताचा मोठा घरेलू सत्र संपला आणि भारताने १३ कसोटी सामन्यांमधील तब्बल १० सामने जिंकत संघाच्या इतिहासात मोठा पराक्रम केला. संप्टेंबर ते मार्च या ६-७ महिन्यांच्या कालावधीत एवढे कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय संघाची दमछाक तर झालीच शिवाय काही खेळाडूंना दुखापतही झाली. भारतासोबत जगभरातील इतरही क्रिकेट शौकिनांचा मनोरंजनाचा बार आता दुप्पट होईल म्हणजे बुधवारपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने. ललित मोदी नामक एका क्रिकेट शौकीन अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही स्पर्धा आता आपल्या दहाव्या पर्वाचे आयोजन करण्यास सज्ज झाली आहे. मागचे नऊ वर्ष आंबट-गोड अनुभवणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने केवळ बोर्डालाच नव्हे तर क्रिकेटपटूनाही मालामाल करून ठेवले आहे. एके काळी पैश्यांची मारामार असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला आज जे सुगीचे दिवस आले आहेत त्यात इंडियन प्रीमियर लीगचाही खूप मोठा हात आहे असं म्हणण्यात काही वायफळ ठरणार नाही. ललित मोदी, एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला, निरंजन शहा यांसारख्या दिग्गज मंडळींच्या पुढाकाराने साकारलेल्या या लीगने आजवर केवळ भारतालाच नाही तर जगातील इतर संघांनाही चांगले-चांगले खेळाडू दिले. तर वेस्ट इंडिजच्या टी-२० स्पेशालीस्ट खेळाडूंना तर आय. पी. एलनेच पोसले असेही म्हणता येईल. २००८ साली सुरु झालेल्या आय. पी. एल. या ‘ब्रान्ड’ ने आज जगभरात आपला दबदबा निर्माण केला आहे. यंदाचे पर्व हे आय. पी. एलचे १० वे पर्व आहे आणि या दहा वर्षात आय. पी. एलने बऱ्याच गोष्ठी पहिल्या आहेत. २०१३ च्या पर्वातील स्पॉट-फीक्सिंग व बेटिंग प्रकरणाने या बड्या ‘ब्रान्ड’ला गालबोट लावले. श्रीसंथ, अजित चंडीला, अंकित चव्हाण यांसारखे खेळाडूच नव्हे तर गुरुनाथ मय्यपन यासारख्या संघ मालकानेही यात सहभाग नोंदवून आय. पी. एल. ला अजूनही खालच्या पातळीवर नेवून ठेवले. परंतु बोर्डाने या ‘ब्रान्ड’ ची लाज राखत अजूनही पुढे आणून ठेवले आहे. यंदाच्या सत्रात भारताबरोबर इतर देशांतील खेळाडूंनाही दुखापतीने सावरले आहे. के. एल. राहुल, रवीचंद्रन अश्विन, मुरली विजय बरोबर विराट कोहली, उमेश यादव, रवींद्र जडेजा तसेच क्विन्तन डी कॉक, आंद्रे रसेल यांसारख्या बड्या खेळाडूंनाही पूर्ण व काही अंशी मुकावे लागेल. कोहली-अश्विन सारख्या ‘मोठ्या’ खेळाडूंना बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची निराशा तर होईलच पण बोर्ड याची कसर भरण्यास काहीच कमी ठेवणार नाही हेही खर. उद्यापासून होणाऱ्या या क्रिकेटच्या महाकुंभात पुढील ४५ दिवसांत क्रिकेट शौकिनांना भरपूर मनोरंजन पाहायला मिळेल हे नक्कीच.]]>