मस्कट (ओमान): रविवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी येथे झालेल्या पाचव्या पुरुष आशिया हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपदावर समाधान मानावे लागले. पावसामुळे सामना होऊ न शकल्यामुळे दोन्ही संघांना विजेते घोषित करण्यात आले. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने साखळी सामन्यांत एकही सामना न गमावता पाचपैकी चार सामने जिंकत अव्वल स्थान फटकावले होते. तर उपांत्य फेरीत जपानचा ३-२ असा पराभव करीत भारताने जेतेपदावर आपली दावेदारी पक्की केली होती. गतविजेत्या भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला होता. भारताने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक ३० गोल लगावले होते. आणि मुख्य बाब म्हणजे तब्बल ११ वेगवेगळ्या खेळाडूंनी भारतासाठी हे गोल केले होते. भारताच्या आकाशदीप सिंगला सर्वोत्तम खेळाडूचा तर पी. आर. श्रीजेशला सर्वोत्कृष्ट गोलकिपरचा पुरस्कार देण्यात आला.]]>