मुंबई (९ डिसेंबर, २०१६): कालच्या ५ नाबाद २८८ धावसंख्येवरुन इंग्लंडने आज दुसऱ्या दिवशी आपला डाव चालू केला. कालच्या तिसऱ्या सत्रात खेळपट्टीवर ताग धरून बसलेल्या बेन स्टोक्सचा अडथळा आजच्या दिवसाच्या तिसऱ्याच षटकात दूर केला. बॅटचा कडा घेत चेंडू स्लिपमध्ये असलेल्या विराट कोहलीने अजून टिपला, परंतु पंचानी नाबाद दिले. कर्णधार कोहलीने लगेच रिव्हिव्यू घेत पंचांच्या या निर्णयाला आव्हान दिले आणि त्याचा निर्णय यशस्वी ठरला. अश्विनने स्टोक्सला बाद करीत डावातील पाचवा बळी टिपला. सर्वाधिक पाच बळी मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो आता कुंबळे(३५), हरभजन(२५) यांच्याबरोबर २३ वेळा अशी कामगिरी करीत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. जडेजानेही अश्विनला चांगली साथ देत वोक्सला पटेलकरवी झेलबाद करीत तंबूत धाडले. इंग्लंडचा स्पिनर आदिल राशिदही काही धाव करण्याच्या आधी जडेजाने त्याला त्रिफळाचित करीत इंग्लंडला आठवा धक्का दिला. वानखेडेची खेळपट्टी आज काहीशी वेगळीच होती. चेंडू खूपच वेगवान व वळण घेत होता. जडेजाच्या एका चेंडूवर बॉलला जीवनदान मिळाले. स्लिपमध्ये असलेल्या विराट कोहलीला बॅटचा कडा लागलेला चेंडू समाजाला नाही आणि एक जीवनदान मिळाले. दहाव्या क्रमांकावर आलेल्या बॉलने बटलरच्या साथीने इंग्लंडला धावा जमून दिल्या. बटलरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावत इंग्लंडला ३५० धावांचा टप्पा गाठून दिला. जेवणापूर्वी इंग्लंडने आठ गडी गमावत ३८५ धावा केल्या होत्या. नवव्या गड्यासाठी बॉल व बटलरने ५१ धावांची नाबाद भागीदारी केली होती. आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय फिरकी गोलंदाजांनी सकाळच्या सत्राप्रमाणे अचूक गोलंदाजी करीत इंग्लंडला अडचणीत आणले. सत्रातील तिसऱ्याच षटकात अश्विनने बॉलला बाद करीत इंग्लंडला नववा धक्का दिला. अश्विनचं या डावातील हे सहावं बळी होतं. एका डावात सहा किंवा अधिक बळी घेण्याची किमया त्याने तब्बल ११ वेळा केली आहे. बटलरने एका बाजूने किल्ला लढवण्याचा पण लावला होता. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर त्याने इंग्लंडला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. जडेजाने लगेच बटलरला बाद करीत इंग्लंडचा डाव ४०० धावांवर संपुष्टात आणला. भारताच्या डावाची सुरुवात करण्यास उतरलेल्या विजय आणि दुखापतीतून पुनरागमन झालेल्या के. एल. राहुल यांनी काहीशी संथ अशी सुरुवात केली. खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेत दोघांनीही धावफलक हलता ठेवला. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर स्थिर होताना दिसताच मोईन अलीच्या एका चेंडूवर राहुल अडखळला आणि त्रिफाळाचित झाला. राहुलच्या रूपाने भारताला १४ व्या षटकाच्या अखेरीस ३९ धावांवर पहिला धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पुजाराने विजयाच्या साहाय्याने एकेरी, दुहेरी धाव घेत चहापानापर्यंत भारताला ६२ धावा करून दिल्या. दरम्यान पुजाराने इंग्लंडविरुद्ध आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या सत्रात भारताने संयमी फलंदाजी करीत इंग्लंडच्या ४०० धावांना चोख प्रतिउत्तर दिले. पहिल्या विकेटनंतर भारताने काहीशी संयमी फलंदाजी करीत धावसंख्या हळूहळू वाढवली. ३५ व्या षटकात पुजाराने चौकार खेचत भारताला १०० धावांचा पल्ला गाठून दिला. सलामी फलंदाज मुरली विजयने आपले अर्धशतक झळकावत आपला हरवलेला फॉर्म परत आणला. दुसरीकडे पुजारानेही विजयला चांगली साथ देत भारताचा धावफलक हालत ठेवला. दोघांनीही दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी रचली आणि भारताला भक्कम स्थितीत आणून ठेवले. दोघांमधे ही सातव्यांदा १०० धावांची भागीदारी आहे. दिवस अखेरीस भारताने १ बाद १४६ धाव जमावल्या. भारत अजूनही इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४०० धावांच्या २५४ धावांनी पिछाडीवर आहे.]]>