रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमधील तिसऱ्या द्विशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा १४१ धावांनी पराभव करीत तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मोहाली: पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दारुण पराभवानंतर जेव्हा पत्रकार परिषदेत रोहित शर्माला पराभवाचे कारण विचारले तेव्हा त्याने अगदी नम्रपणे उत्तर दिले, “हा पराभव आमचे डोळे उघडणारा होता.” कदाचित हेच वाक्य त्याने अगदी मनाला लावून घेतले आणी कर्णधारपदाची नवी जबाबदारी अगदी अचूकपणे निभावत जो पराक्रम आज केला त्याला तोडच नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल तिसरे द्विशतक झळकावण्याचा मान मिळवत आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची एक अनोखी भेट दिली असे म्हटले तर चुकीचं ठरणार नाही. धर्मशालाच्या वनडेत सपाटून पराभव झाल्यानंतर रोहित शर्माने आज आपल्या संघात एक छोटासा बदल केला. तामिळनाडूचा युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याला कुलदीप यादवच्या जागी संधी दिली. थिसारा परेराने नाणेफेक जिंकत भारताला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची भरवश्याची सलामी जोडी शिखर धवन व रोहित शर्माने आज संयमी पण काहीशी आक्रमक फलंदाजीचा नमुना पेश करत मोहालीच्या थंडीत आलेल्या प्रेक्षकांना जणू ताजेतवानेच केले. या जोडीने १२७ चेंडूंत पहिल्या गड्यासाठी ११५ धावांचा योगदान देत भारताच्या मागच्या सामन्यात थांबलेल्या गाडीला चांगली किक मारून दिली. धवनने ६७ चेंडूंचा सामना करीत नऊ चौकारांसह ६८ धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर कोहलीच्या जागी वर्णी लागलेल्या मुंबईचा डॅशिंग फलंदाज युवा श्रेयस अय्यरनेही आपले हात साफ करीत श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. सावधरित्या सुरुवात करीत श्रेयसने त्याचाच मुंबईकर साथीदार रोहित शर्माच्या साथीने ५०, १००, १५० व नंतर २०० ची भागीदारी रचित भारताला मोठ्या धावसंख्येकडे आणले. आपला दुसराच सामना खेळात असलेल्या श्रेयसने ९ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने केवळ ७० चेंडूंत ८८ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीचे विशेष म्हणजे त्याच्या फटाक्यांवर असलेला त्याचा ताबा. अगदी सहजतेने एक-एक फटका खेळत त्याने आपले पहिले अर्धशतक झळकावले. ४६ व्या षटकात परेराच्या एका स्लोवर चेंडूचा अंदाज चुकला आणि मिड-विकेटला उभ्या असलेल्या दी सिल्वाकडे झेल देत तो बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने आज कमाल करीत आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. आज त्याच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आणि आपल्या बायकोसमोर खेळताना तो वेगळ्याच मूडमध्ये दिसून आला. ११५ चेंडूं आपले शतक पूर्ण झाल्यानंतर आपली गाडी पाचव्या गियरच्याही पुढे ढकलली. याअगोदर मारलेल्या दोन्ही द्विशतकाच्या वेळेसही तो अश्याच स्वरूपात खेळताना दिलासा होता. सुरुवात संथ गतीने करून एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर शेवटच्या षटकांत गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करायची. आजही तो अश्याच मूडमध्ये खेळताना दिसला. ४० षटकाच्या समाप्तीनंतर तो १०१ धावसंख्येवर खेळात होता. तेच भारताच्या ५० षटकांच्या समाप्तीनंतर त्याची धावसंख्या होती ती नाबाद २०८. यावरूनच तो शेवटच्या षटकांत आपली खेळी कशी बदलतो याचा अंदाज येतो. आजच्या खेळीत त्याने तब्बल १३ चौकार व डझनभर षटकार ठोकले. एकदिवासीय क्रिकेटमध्ये एका डावात डझनभर षटकार दोनदा ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. भारताने दिलेल्या ३९३ धावांचं आव्हान पार करण्यास आलेला श्रीलंकेचा संघ आज मागच्या सामान्याप्रमाणे जोशमध्ये दिसलाच नाही. यंदाच्या वर्षी त्यांच्या पाठी लागलेली साढेसाठी आजही अनुभवायला मिळाली. आघाडीचे तीन फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूसने एकहाती किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे त्यांची गाडी २५१ धावांतच अडकली. भारतातर्फे चहलने सर्वाधिक ३ बळी टिपले तर बुमराला २ गडी बाद करण्यात यश आलं. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या व पदार्पण करणारा वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी २ गडी बाद करता आले. संक्षिप्त धावफलक: भारत ३९२/४ (रोहित शर्मा २०८*, श्रेयस अय्यर ८८, थिसारा परेरा ३-८०, सचीथ पथीराणा १-६३) श्रीलंका २५१/८ (अँजेलो मॅथ्यूस १११*, असेला गुणरत्ने ३४, चहल ३-६०, बुमरा २-४३) भारत १४१ धावांनी विजयी]]>