१२७ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ऍरॉन फिंचच्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच दोन मोठे हादरे दिले. दुसऱ्या षटकात स्टोयनीसला धावबाद करीत पहिला धक्का दिला तर बुमराने कर्णधार फिंचचा त्रिफळा उडवीत पाहुण्यांची अवस्थ दोन बाद पाच अशी केली. दुसरा सलामीवीर शॉर्टने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने ऑस्ट्रेलियाची नय्या पार करण्याचा विडा उचलला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी रचित सामना भारताच्या हातातून खेचला. पण भारताच्या स्पिनर्सनी मधल्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करीत पुन्हा एकदा दबाव ऑस्ट्रेलियावर टाकला. कृणाल पंड्या (१-१७), युझवेन्द्र चहल (१-२८) व टीम इंडियात पदार्पण करणारा मयांक मार्कंडेय ४ षटकांत ३१ धावा यांनी भारतासाठी चांगलीच गोलंदाजी केली. पण उमेश यादवच्या शेवटच्या षटकातील ठिसाळ गोलंदाजीने भारताला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने शिखर धवनला विश्रांती देत के. एल. राहुलला संघात स्थान दिले. मागील सामन्यांतील खराब फॉर्म व चॅट शोवरील वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राहुलला या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखवणं अत्यंत गरजेचं होतं. राहुलने आज आपला संयमी खेळ दाखवीत उपस्थित प्रेक्षकांसोबतच टीम इंडियातील खेळाडूंनीही माने जिंकली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने आपला खेळ चालू ठेवत टी-२० कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. त्याला कर्णधार विराट कोहली (२४ धावा) ने काही काळ साथ दिली. पण इतर खेळाडूंची पाहिजे तशी साथ न मिळाल्यामुळे एक वेळेस १५०-१६० धावा धावफलकावर दिसत असताना भारताला केवळ १२६ धावांवरच समाधान मानावे लागले. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने काहीसा संघर्ष करीत या समाधानकारक धावसंख्येवर पोचवले. धोनीने ३७ चेंडूंचा सामना करीत एक चौकारासह २९ धावांचं योगदान दिलं. परिमाणी भारताला हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला.
]]>