रांची: भारतीय क्रिकेटच्या गणवेशात कदाचित आपल्या लाडक्या धोनीला पाहण्यासाठी केवळ रांचीच नव्हे तर देशभरातून तमाम क्रिकेटरसिक आज रांचीत दाखल झाले होते. पण या क्रिकेटरसिकांच्या पदरात निराशा पडली. पहिले दोन सामने जिंकलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या सामन्यात ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. धोनीला आपल्या घराच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट पराभवानेच करावा लागला असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
नाणेफेक जिंकत कोहलीने वेगवान आऊटफिल्ड असलेल्या रांचीच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीयांसाठी लकी असलेल्या या मैदानावर यापूर्वी खेळल्या गेलेल्या चारही सामन्यांत एकदाही ३०० धावांचा पल्ला गाठला गेला नव्हता. अश्या परिस्थितीतही ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी आपले कौशल्य व आपली इज्जत पणाला लावत दमदार सुरुवात करून दिली. कर्णधार ऍरॉन फिंच (९३) आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येत भारतीय गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली. जोडीला दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजानेही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावत पाहुण्यांना चांगल्या स्थितीत आणले. ख्वाजाने ११३ चेंडूंचा सामना करीत ११ चौकार व एका षटकारासह १०४ धावांचा योगदान दिलं. ग्लेन मॅक्सवेल (४७), मार्क्स स्टोयनीस (नाबाद ३१) व अलेक्स कॅरी (नाबाद २१) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१३ धावांचा डोंगर उभारला. भारताचा पार्ट टायमर फिरकी गोलंदाज केदार जाधवला दोन शतकांत ३२ धावा कुटल्यानंतर कोहलीने विजय शंकरकरवी उरलेले आठ षटक टाकून घेतले. भारतासाठी कुलदीप यादवला सर्वाधिक ३ गडी टिपता आले तर मोहम्मद शमीने ख्वाजाला बाद करीत एक सफलता मिळवली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनशेच्या वर धावांचा पाठलाग करण्यास माहीर असलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच जबरदस्त हादरे बसले. शिखर धवन (१), रोहित शर्मा (१४), अंबाती रायडू (२) हे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने भारताची अवस्था सातव्या षटकात तीन बाद २७ अशी झाली. भारत १०० धावांचा पल्लाही पार करेल कि नाही असे वाटत असताना पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहली संघासाठी धावून आला. मागच्या सामन्यात शतक झळकलेल्या कोहलीने याही सामन्यात शतक लगावत एकदिवसीय सामन्यांत आपल्या शतकांची संख्या ४१ वर नेली. महेंद्र सिंग धोनी (२६), केदार जाधव (२६), विजय शंकर (३२) यांच्यासोबत छोट्या-छोट्या भागीदारीच्या जोरावर भारत पुन्हा एकदा सामन्यात आला कि काय असे दिसत होते. शेवटच्या २० शतकांत भारताला जिंकण्यासाठी १५४ धावांची आवश्यकता होती आणि मैदानात कोहली-जाधव ही जोडी सेट झालेली दिसत होती. त्यामुळे भारत सामना नक्कीच जवळपास घेऊन जाईल असे वाटत होते. पण नियतीने भारतीयांच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. कोहली बाद झाल्यांनतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करीत ऑस्ट्रेलियाने सामना ३२ धावांनी जिंकलाव पाच सामन्यांच्या मालिकेचे समीकरण २-१ असे आणले.
]]>