पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा डी. एल. एस. नियमानुसार २६ धावांनी पराभव करीत पाच सामान्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई: आय. सी. सीच्या क्रमवारीत संयुंक्त दुसऱ्या स्थानी असलेल्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आज झालेल्या पहिल्या एकदिवासिय सामन्यात भारताने सरशी करीत यजमानांचा २६ धावांनी पराभव केला आणि तब्बल ३० वर्षांनी उभय संघात येथील चेपॉक स्टेडियममध्ये होत असलेल्या सामन्यात उपस्थित प्रेक्षकांना खुश केले. आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो भारताचा ऑल राउंडर हार्दिक पांड्या. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची जी तारांबळ उडवली त्यावरून कोहलीचा हा निर्णय अंगलट आला कि काय असेच वाटू लागले. चेपॉकच्या कोरड्या खेळपट्टीवर जिथे ३५० धावा उभारणे सहज शक्य होते, तिथे भारताची अवस्था तीन बाद ११ अशी झाली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत वर्णी लागलेला अजिंक्य राहणे (५) धावा करून बाद झाला तर कर्णधार कोहली व मनीष पांडे यांना भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्माने केदार जाधवच्या साथीने काहीसा प्रयत्न केला खरा परंत्तू तोही ४४ चेंडूंत २८ धावा करून बाद झाला. केदारही लगेच ४० धावा करून बाद झाला आणि भारताचा निम्मा संघ केवळ ८७ धावांत तंबूत परतला. अश्या दयनीय परिस्थिती भारताच्या वाट्याला धावून आले ते हार्दिक पांड्या व चेन्नई सुपर किंग्सचा लोकल बॉय महेंद्र सिंग धोनी. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ११६ चेंडूंत ११८ धावा जमवत भारताच्या डावाला आकार दिला. पांड्याने ६६ चेंडूंत पाच चौकार व तितकेच षटकार खेचत ८३ धावा केल्या. झम्पाच्या एका षटकामधे तर त्याने एक चौकार व सलग तीन षटकार खेचत भारताला तब्बल २४ धावा ठोकून दिल्या. धोनीनेही सुरुवातीला संयमी फलंदाजी करीत आपले ६६ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले व शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी ८८ चेंडूंत ७९ धावा केल्या. भारताने ५० षटकांच्या अखेरीस २८१ धावा धावफलकावर लगावल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन कुल्टर-नाईलला सर्वाधिक तीन तर मार्कस स्टोयनीसला दोन व फॉकनर, झम्पा यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. भारताच्या डावानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आणि सामना सुरु होईल कि नाही अशी साशंका निर्माण केली. बऱ्याच वेळानंतर वरून राजाने विश्रांती घेतली आणि सामना सुरु झाला. दरम्यानच्या काळात बराच वेळ वाया गेल्याने ऑस्टेलियाला लक्ष्य २१ षटकांत १६४ धावा असे दिले. ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० प्रमाणे खेळायला सुरुवात केली परंतु त्यांना ठराविक अंतराने पडत चाललेल्या बळींमुळे पडलेला दबाव शेवटपर्यंत सावरू दिला नाही. बुमराने सलामीवीर हिल्टन कार्टराईटला (१) चौथ्याच षटकात त्रिफळाचित केले आणि ऑस्टेलियाच्या डावाची पडझड चालू झाली. भारताने आजच्या सामन्यात दोन-दोन मनगटी स्पिनर्स खेळवले आणि या दोघांनीही कोहलीला निराश केले नाही. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत अगदी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या भक्कम फलंदाजीवर दबाव टाकला. ऑस्ट्रेलियाने २१ षटकांत नऊ गडी गमावत १३७ धावा केल्या. मॅक्सवेलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. यात त्याच्या चार षटकारांचाही समावेश होता. भारतातर्फे चाहलला तीन, हार्दिक पंड्या, कुलदीप यादवला प्रत्येकी दोन व भुवनेश्वर कुमार, बुमराह यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.]]>