अबुधाबी (वृत्तसंस्था): एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला. सुनील छेत्रीच्या दोन गोलांच्या जोरावर भारताने थायलंडचा ४-१ असा धुव्वा उडविला. मध्यंतराच्या १-१ अशा बरोबरीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन गोलांचा धडाका लावला. अनिरुध थापा आणि बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ यांनीही लक्ष्य साधले. छेत्रीने पहिल्या गोलसह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली.
येथील अल नाह्यान स्टेडियमवर स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या मार्गदर्शनाखालील भारताने अ गटात आघाडी घेतली. भारताने तीन गुण वसूल केले. या गटात बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली होती.
खाते सर्वप्रथम उघडण्यात भारताला यश आले. २६व्या मिनिटाला थ्रो-इन झाल्यावर आशिक कुरुनीयन याने बॉक्समध्ये मुसंडी मारली. त्याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक चातचाई बुदप्रोम याच्या दिशेने चेंडू मारला होता, पण मध्येच चेंडू थीराथोन बुनमाथन याच्या हाताला लागून उडाला. पेनल्टी क्षेत्रात हे घडल्यामुळे भारताला पेनल्टी बहाल करण्यात आली. पुढील मिनिटाला ही पेनल्टी छेत्रीने घेतली आणि नेटमध्ये मैदानालगत चेंडू अचूक मारताना बुदप्रोमला संधी अशी दिलीच नही.
थायलंडने सहा मिनिटांनी बरोबरी साधली. यात बुनमाथन याने योगदान देत आधीच्या दुर्दैवी चुकीची काहीशी भरपाई केली. हालीचरण नर्झारी याने चानाथीप सोंगक्रासीन याला ढकलले. त्यामुळे थायलंडला फ्री किक देण्यात आली. बुनमाथन याने डाव्या पायाने मारलेला फटका नेटसमोर गेला आणि त्यावर तिरासील डांग्डा याने अचूक हेडींग करीत भारतीय गोलरक्षक व कर्णधार गुरप्रीतसिंग संधू याला चकविले.
भारताने दुसऱ्या सत्राची सुरवात सनसनाटी केली. पहिल्याच आणि एकूण ४६व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली. त्याने बॉक्समध्ये आशिकला पास दिला. आशिकने छेत्रीच्या दिशेने चेंडूला मार्ग दिला. मग छेत्रीने पहिल्याच टचमध्ये लक्ष्य साधले.
संघाच्या तिसऱ्या गोलची चाल छेत्रीने रचली. मध्य क्षेत्रातून त्याने उदांताच्या दिशेने चेंडू मारला. उदांताने दोन प्रतिस्पर्ध्यांना चकविले, पण त्याने स्वतःहून प्रयत्न केला नाही. त्याऐवजी त्याने थापाला पास दिला आणि मग थापाने चेंडू नेटमध्ये मारला.
चौथा गोल बदली खेळाडू जेजे लालपेखलुआ याने केला. दहा मिनिटे बाकी असताना त्याने हालीचरण नर्झारीच्या चालीवर फिनीशिंग केले. ७८व्या मिनिटाला आशिकऐवजी बदली खेळाडू म्हणून उतरला होता.
सुनील छेत्रीची कमाल
सुनील छेत्रीचा खाते उघडणारा गोल माईलस्टोन ठरला. त्याने सध्या सक्रीय असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले. त्याचा हा ६६वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी (६५ गोल) याला मागे टाकले. पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो सर्वाधिक ८५ गोलांसह आघाडीवर आहे.
]]>