कोलकाता (०३ ऑक्टोबर, २०१६): भारतीय खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर १७८ धावांनी मात करीत ३ सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. भारताने आज चौथ्या दिवशी पाहुण्यांना ३७६ धावांचं लक्ष दिलं होतं. न्यूझीलंडचा संघ १९७ धावांत आटोपला. दोन्ही डावात अर्धशतक झळकावणाऱ्या सहाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताने आज २२७/८ धावांवर आपला डाव सुरु केला. नाबाद असलेल्या सहाने आपले अर्धशतक पूर्ण केले. ७७ व्या षटकात पाहुण्यांनी भारताला २६३ धावांवर बाद केले आणि सामना जिंकण्यासाठी ३७६ धावांचं लक्ष ठेवले. टॉम लॅथम आणि मार्टिन गप्टिल यांनी ५५ धावांची सलामी देऊन खेळात संघर्षाचा रंग भरला. पण अश्विननं गप्टिलला बाद करून ही जोडी फोडली आणि ठराविक अंतरानं न्यूझीलंडच्या विकेट्स पडायला लागल्या. मग अश्विननंच टॉम लॅथमची झुंजार खेळी संपुष्टात आणली. त्यामुळं भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला. या विजयाच्या जोरावर भारताने आय सी सी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. मागील महिन्यात पाकिस्तानने इंग्लंड विरुद्ध मालिका जिंकत अव्वल स्थान फटकावले होते. भारताने आज सामना जिंकत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले.]]>