अहमदाबाद (दि. २२ ऑक्टो, २०१६): आज येथे झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने तमाम देशवासीयांची अपेक्षा पूर्ण करीत भारताला जेतेपद देत विश्वचषक स्पर्धेची हॅट्रिक साधली. पारंपरिक कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या इराणला भारताने कडवी झुंज देत सामन्याच्या उत्तरार्धात ३८-२९ अशी मात देत सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला या विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीतच कोरिया संघाकडून ३२-३४ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचे अंतिम चार संघांत स्थान निश्चित होईल कि नाही अशीही भीती वाटू लागली. परंतु कबड्डी मध्ये महासत्ता असलेल्या भारतीय संघाने उर्वरीत सामन्यांत संघाला साजेशी कामगिरी करीत अंतिम सामन्यात झेप घेतली. याआधी झालेल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यात इराणाचाच सामना करावा लागला होता. २००४ साली भारताने ५५-२७ तर २००७ साली २९-१९ अशी मात देत इराणला पराभूत केले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना जेतेपदासाठी घाम गाळावा लागला. सामान्याच्या पूर्वार्धात भारतीय संघ १३-१८ अश्या पिछाडीवर होता. अगदी २२ व्या मिनिटाला भारत १३-१९ अश्या ६ गुणांनी माघारला होता. नंतर अजय ठाकूरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारताने इराणला सामन्यात डोके वर काढू दिले नाही. भारताने इराणला दोनदा सर्वबाद करीत आपली आघाडी भक्कम केली. जबरदस्त चढाई करणारा अजय ठाकूर १२ गुण घेत सामन्याचा शिल्पकार ठरला. या सामान्यसाठी भारताचे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी विशेष उपस्थिती लावली होती. तसेच भारताच्या या जेतेपदाला क्रिकेटपट्टू वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अभिनेता शाहरुख खान, बॉक्सर विजेंद्र सिंग यांच्यासह अनेकांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.]]>
Related Posts
अखेर लगाम लागला…!!! तब्बल १२ वर्षांनी भारताने गमावली कसोटी मालिका
भारतीय फलंदाजीचं आणि पुण्याच्या पिचचं जणू वेगळंच नातं आहे. २०१७ कांगारूंनी आणि आता किवींनी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताला…