मेलबर्न: चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी रडवले. पाचव्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने ऑस्ट्रेलियाला चौथ्याच दिवशी बाद करून मालिकेत आघाडी घेण्याचं विराट कोहलीचे स्वप्न लांबवलं आणि केवळ दोन गडी बाद करण्यासाठी भारताला पाचव्या दिवसाची वाट पाहावी लागली.
वरून राजाने पाचव्या दिवशी अगदी सकाळपासूनच दर्शन दिल्याने हातातोंडाशी आलेला विजय जातो कि काय असेच वाटू लागले होते. अगदी पहिल्या सत्रापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने भारतीय चमूत चिंतेचं वातावरण दिसू लागलं. पण काही वेळेतच वरून राजाने भारतावर मेहेरबानी दाखवीत सामना सुरु केला. केवळ पाच षटकांच्या खेळीतच उरलेल्या दोन फलंदाजांना जसप्रीत बुमरा व इशांत शर्मा यांनी माघारी पाठवले आणि भारताला १३७ धावांनी सामना जिंकून देत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिल्यांदाच २-१ अशी आघाडी मिळवून दिली. जरी चौथा सामना भारताने गमावला तरी बॉर्डर-गावस्कर करंडक भारताकडे राहणार आहे. त्यामुळे भारत ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचण्यास केवळ एक सामना दूर आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
भारताने जिंकण्यासाठी दिलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था चौथ्या दिवसा अखेरीस आठ बाद २५८ अशी झाली होती. पॅट कमिन्सच्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इथपर्यंत मजल मारली होती. अन्यथा सामना चौथ्याच दिवशी संपला असता. पाचव्या दिवसाचा पहिला सत्र पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी जास्त वेळ न लावता कामगिरी फत्ते केली. दिवसाच्या चौथ्या षटकात बुमराच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू कमिन्सच्या बॅटचा कडा घेत थेट पुजाराच्या हातात गेला आणि भारतीय खेळाडूंनी सुटकेचा निश्वास सोडला. पुढच्याच षटकात इशांत शर्माने नॅथन लायनला रिषभ पंत करवी झेलबाद करीत सामना जिंकला. बुमराला पहिल्या डावातील सहा व दुसऱ्या डावातील तीन असे एकूण नऊ गडी बाद करण्याच्या कामगिरीस सामानावीराचा किताब देण्यात आला.
तत्पूर्वी, विराट कोहलीने ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत नाणेफेक जिंकण्याची किमया करीत आपला नाणेफेक व सामन्यात विजय हे समीकरण आणखी मजबूत केले. आपल्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीत आतापर्यंत २१ वेळेस नाणेफेक जिंकलेल्या विराट कोहलीने तब्बल १८ वेळेस विजय मिळवला आहे तर उरलेल्या तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात सात बाद ४४३ धावा उभारल्या. यात पदार्पण करणारा मयांक अगरवाल (७६), चेतेश्वर पुजारा (१०६), कोहली (८२) व रोहित शर्मा (६३) यांनी चांगला हातभार लावला. ऑस्ट्रेलियासाठी कमिन्सने सर्वाधिक तीन गडी बाद केले. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १५१ धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. जसप्रीत बुमराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करीत ३३ धावांत ऑस्ट्रेलियाच्या सहा खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. कोहलीने आपल्या गोलंदाजांना आराम देण्यासाठी २९२ धावांची आघाडी असतानाही फॉलो-ऑन न देता आपल्या सलामीवीरांना पुन्हा फलंदाजीस उतरवले. कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर अगरवाल (४२) वगळता आघाडीच्या एकही फलंदाजाला तग धरता आला नाही. यात कोहली व पुजारा यांनतर खातंही खोलता आलं नाही. शेवटी कोहलीने आठ बाद १०६ वर दुसरा डाव घोषित करीत ऑस्ट्रेलियाला ३९९ धावांचं आव्हान दिलं. जे पेलताना त्यांना केवळ २६१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मालिकेतील चौथा व शेवटचा सामना ३ जानेवारीला सिडनी येथे होईल.
]]>