सेमी फायनलमध्ये शेजारी बांगलादेशवर ९ गडी व ५९ चेंडू राखून विजय मिळवत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले जेतेपद राखण्यास सज्ज झाला आहे. अंतिम फेरीत रविवारी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर नॉक-आऊट सामन्यात भारताने पुन्हा एकदा ताकतीने बलाढ्य दक्षिण अफ्रिकेचा पराभव करीत अंतिम चार मध्ये प्रवेश केला आणि आज झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याच जोमाने खेळात सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारत आपणच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत हे सिद्ध करून दिले. बांगलादेशने दिलेल्या २६५ धावांचे आव्हान भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी अगदी सहजरित्या पेलत ९ गडी व ५९ चेंडू बाकी ठेवत आरामात पार केले. काल पाकिस्तानने तगड्या पाकिस्तानचा सहजरित्या पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली तर बांग्लादेशही यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करीत इथपर्यंत पोचला होता. एकीकडे जरी पाकिस्तानने कमाल करीत अंतिम फेरी गाठली असली तरी भारतासारख्या फॉर्मात असलेल्या संघाचे आव्हान पेलणे म्हणजे बांग्लादेशसमोर बंगालची खाडी पार करण्याइतके अवघड होते. त्यांनी त्यांच्या फलंदाजीत तास प्रयन्तही केला पण अनुभवी भारतासमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले आणि पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने सौम्या सरकारचा शून्यावरच त्रिफळा उडवीत भारताची दणक्यात सुरुवात केली. सब्बीर रेहमानने जरी चार चौकार मारून भारतीय वेगवान गोलंदाजांनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी भुवनेश्वरने सातव्या षटकात स्लोवर चेंडू टाकत सब्बीरला (१९) चकमा देत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. तिसऱ्या गड्यासाठी तमिम इकबालने मुशफिकूर रहिमसह संयमी फलंदाजी करीत बांगलादेशला पुन्हा एकदा वर आणले. दोघांनी १२७ चेंडूंचा सामना करीत १२३ धावांची भरभक्कम भागीदारी रचित बांगलादेशला एका मोठ्या धावसंख्येकडे वळविले. बराच वेळ विकेट न मिळाल्यामुळे आणि पाचवा गोलंदाज हार्दिक पांड्याचा बांगलादेशी जोडीने भरपूर समाचार घेतल्यामुळे विराट कोहलीला केदार जाधवकरवी गोलंदाजी करण्यास भाग पडले आणि जाधवने आपल्या कर्णधाराला खुश करीत तमिम इकबालला (७०) बाद करीत तिसरा धक्का दिला. मधल्या ओव्हर्समध्ये शाकिब अल हसन (१५), महमदुल्लाह (२१), मोसादक हुसेन (१५) यांच्या खराब कामगिरीचा फटका बांगलादेशला बसला. रहिमने आपली कामगिरी बजावत ६१ धावंच योगदान दिलं. शेवटी-शेवटी मोर्तझाच्या २५ चेंडूंत पाच चौकारांसह ३० धावांच्या मदतीने बांगलादेश २६४ धावांचा पल्ला गाठू शकला. जाधव, बुमरा, भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजाने एक गादी टिपला. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ एकदाही दबावात दिसला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमधली भारताची सर्वात यशस्वी सलामी जोडी शिखर धवन – रोहित शर्माने पुन्हा एकदा आपली कमल दाखवत भारताला भरभक्कम सुरुवात दिली. साखळी सामन्यांत प्रत्येक सामन्यात पन्नासहून अधिक धाव करणाऱ्या धवनला मात्र आज पन्नाशी गाठण्यात अपयश आलं. १५ व्या षटकात मोर्तझाच्या गोलंदाजीवर ऑफसाइडच्या भरपूर बाहेरचा ऑफकटर चेंडू टोलवण्याच्या नादात पॉइंटला उभ्या असलेल्या मोसाद्देककडे झेल देत तंबूत परतला. त्याने ३४ चेंडूंत सात चौकार व एका षटकारासह ४६ धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध जर कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना खेळण्यास आवडत असेल तर ते म्हणजे रोहित शर्मा व विराट कोहली. धवन बाद झाल्यानंतर दोंघांनाही आयतेच कोलीत भेटले. एकही चुकीचा फटका न मारता दोंघांनी बांग्लादेशी गोलंदाजीचा येथेच्छ समाचार घेत भारताची लीलया पार केली. रोहित शर्माने एकेरी-दुहेरी धावांबरोबर अधून-मधून चौकार खेचत आपले ११ वे शतक ठोकले. कोहलीनेही १२३ च्या स्ट्राईक रेटने ७८ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ९६ धावा केल्या. रोहीतही १५ चौकार व एका षटकारासह १२३ धावा करून नाबाद राहिला. मोर्तझा वगळता एकही गोलंदाजाला अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी करता आली नाही. इतर सर्व गोलंदाजांनी सहाहून अधिक सरासरीने धावा ओतल्या. याच विजयाबरोबर भारत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोचला असून यंदाही प्रबळ दावेदार असेल. भारताला जेतेपद राखण्यासाठी आव्हान असेल ते पाकिस्तानचे. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण प्रभाव केला असला तरी पाकिस्तानने नंतर केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे हेही तितकेच खरे.]]>