कोची (16 डिसेंबर 2016): हिरो इंडियन सुपर लिगमधील पहिल्या विजेतेपदासाठी इयन ह्यूम याला भूतकाळ विसरून वर्तमान काळात वावरावे लागेल. या चिवट स्ट्रायकरने आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल केले आहेत. पहिल्या मोसमात ह्यूम विजेतेपदाच्या अगदी नजीक आला होता. तेव्हा तो केरळा ब्लास्टर्सची जर्सी घालून खेळत होता. मुंबईतील अंतिम सामन्यात तो ऍटलेटीको डी कोलकता संघाच्या ताकदवान आव्हानाला सामोरे गेला होता. त्याच्या संघाला अंतिम टप्यातील गोलमुळे पराभूत व्हावे लागले. आता दोन वर्षांनी त्याला आणखी एक संधी मिळाली आहे. यावेळी तो केरळाविरुद्ध खेळेल. अर्थात कोचीमधील प्रेक्षक अजूनही त्याचे कौतुक करतात. तीन मोसमात 23 गोलसह ह्यूम आघाडीवर आहे. त्याने सांगितले की, मी केवळ सुदैवी आहे. पहिल्या मोसमात केरळाकडून खेळल्यानंतर गेले दोन मोसम मी एटीके संघाकडे आहे. भारतात सर्वोत्तम पाठिंबा असलेल्या दोन संघांकडून खेळायला मिळणे मोठी गोष्ट आहे. अंतिम फेरी गाठल्यामुळे मला जणू काही चंद्रावर गेल्यासारखे वाटते. आम्ही यंदाच्या मोसमात बऱ्याच लोकांचा अंदाज चुकीचा ठरविला आहे. आम्ही जेथे मजल मारायला हवे तेथे आहोत, कारण एवढी वाटचाल करण्याची योग्यता आमच्याकडे आहे. कोचीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी ह्यूम यजमान संघाला आणि त्यांच्या भक्कम पाठीराख्यांना कसा सामोरा जातो हे पाहणे त्रयस्थ प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरेल. ह्यूमने आयएसएलमध्ये एक अपवाद वगळता प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गोल केला आहे. योगायोगाने हा अपवाद केरळाचाच आहे आणि त्यामुळे अंतिम सामन्याची उत्कंठा आणखी वाढली आहे. ह्यूमने सांगितले की, आम्ही अंतिम सामन्याचे भाकीत वर्तवू शकत नाही. सामन्याच्या दिवशी कोण सर्वोत्तम प्रदर्शन करतो याला महत्त्व असेल. दोन्ही संघ सरस खेळाच्या निर्धाराने मैदानावर उतरतील. कोणाची सरशी होते हे आपल्याला कळून येईल. एटीकेचे प्रशिक्षक होजे मॉलीना यांनी मुंबई सिटी एफसीविरुद्ध उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्याच्या सामन्यात ह्यूमला सुरवातीला खेळविले नाही. अंतिम सामन्यासाठी त्याला ताजेतवाने ठेवण्याचा त्यांचा उद्देश असावा. ह्यूम दोन्ही मोसमांत त्याच्या संघांसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. 2014 मध्ये केरळा, तर गेल्या वर्षी एटीकेसाठी त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. आता यावर तो पहिल्या विजेतेपदाचा कळस चढविण्यासाठी आतुर आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यात फॉर्म मिळतो असे ह्यूमचे रेकॉर्ड आहे, जे एटीकेसाठी उत्साहवर्धक आहे. गेल्या दोन मोसमांत ह्यूमने सर्वोत्तम कामगिरी दुसऱ्या टप्यासाठी राखून ठेवली आहे. गेल्या मोसमात पहिल्या सात सामन्यांत त्याला केवळ तीन गोल करता आले., नंतर मात्र नऊ सामन्यांत त्याने आठ गोलांचा धडाका लावला. या मोसमातही त्याची सुरवात संथ होती. पहिल्या सात सामन्यांत त्याला केवळ दोन गोल करता आले. त्यानंतर त्याने नऊ सामन्यांत पाच गोल केले आहेत. बाद फेरीच्या सहा सामन्यांत त्याची कामगिरी प्रभावी आहे. यात त्याने चार गोल केले आहेत. तो गोल करतो तेव्हा त्याचा संघ कधीच हरलेला नाही. त्यामुळे तीन मोसमांत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठताना एटीकेच्या आशा बऱ्याच उंचावलेल्या असतील.]]>