पुणे, दिनांक 2 नोव्हेंबर 2016: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या स्टेडियमवर गुरुवारी एफसी गोवा आणि एफसी पुणे सिटी यांच्यात सामना होत आहे. गोव्याचे मुख्य प्रशिक्षक झिको संघाला तळाच्या स्थानातून वर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याविरुद्धचे वैयक्तिक रेकॉर्ड पुण्याचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांच्यासाठी उत्साहवर्धक आहे. यंदाच्या स्पर्धेत झिको आणि हबास या दोन्ही प्रशिक्षकांना प्रथमच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. या लढतीसाठी मात्र हबास यांचे मनोधैर्य उंचावलेले असेल. आतापर्यंत या दोन्ही प्रशिक्षकांच्या संघांमध्ये सात वेळा मुकाबला झाला आहे. यात झिको यांचा संघ एकदाही विजय मिळवू शकलेला नाही. याशिवाय झिको यांचा संघ हबास यांच्या अॅटलेटीको डी कोलकता संघाविरुद्ध केवळ चार गोल करू शकला आहे. पुणे सहा सामन्यांतून सहा गुणांसह गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना घरच्या मैदानावर एकही विजय मिळविता आला नसून कमाल 12 पैकी केवळ दोन गुण घेता आले आहेत. जमेची बाजू म्हणजे पुण्याचा घरच्या मैदानावर गोव्याविरुद्ध एकही पराभव झालेला नाही. एक विजय आणि एक बरोबरी अशा कामगिरीमुळे ही अपराजित मालिका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुण्याला चार सामन्यांत एकही विजय मिळविता आलेला नाही आणि यंदाच्या स्पर्धेतील ही अशी सर्वांत दिर्घ मालिका आहे. सहा सामन्यांत सहा गुण ही सुद्धा पुण्याची सर्वांत खराब सुरवात आहे. यानंतरही हबास खचून गेलेले नाहीत. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी चेन्नईयीनने सुरवातीला बरेच सामने गमावले होते. आमचा मार्की खेळाडू ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाला. 90 टक्के संघ नवा आहे, पण आमची तयारी सुरु आहे. गोव्याची सुरवातही आतापर्यंतची सर्वांत खराब आहे. हा संघ तळात आहे. पहिल्या स्पर्धेत पहिल्या टप्यात गोव्याने केवळ पाच गुण मिळविले होते. यानंतरही हा संघ उपांत्य फेरीला पात्र ठरला होता. त्यानंतर त्यांचा एटीकेकडून पराभव झाला होता. तेव्हा हबास एटीकेचे प्रशिक्षक होते. यावेळी झिको यांना आशा वाटते, पण आव्हान खडतर असल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले की, आमच्या संघाची स्थिती गुंतागुंतीची आणि खडतर आहे. सात सामन्यांतून किमान पाच विजय मिळविण्याची आम्हाला गरज आहे, पण अजूनही आमच्या आशा कायम आहेत आणि तोपर्यंत आम्ही प्रयत्नशील राहू. गोव्याची मुख्य समस्या गोलची संधी निर्माण करण्याची नाही. संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यातच ते कमी पडत आहेत. गतउपविजेत्या संघाने तब्बल 67 वेळा नेटच्यादिशेने चेंडू मारला आहे. एटीके आणि दिल्ली यांनाच यापेक्षा जास्त प्रयत्न नोंदविता आले आहेत. मुख्य म्हणजे यातील 50 टक्यापेक्षा जास्त प्रयत्न गोलरक्षकाची कसोटी पाहणारे होते. संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्याचे प्रमाण मात्र केवळ 5.67 आहे. जे सहभागी संघांमध्ये सर्वांत कमी आहे. यामुळेच झिको यांना पाच सामने जिंकायचे असतील तर गोव्याच्या स्ट्रायकरना धडाका दाखवावा लागेल.]]>