कोलकता, दिनांक 23 ऑक्टोबर 2016: सामन्याच्या उत्तरार्धात उरुग्वेचा “स्टार स्ट्रायकर’ दिएगो फॉर्लान याच्या नेत्रदीपक गोलच्या बळावर मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ऍटलेटिको द कोलकता संघाची अपराजित मालिका भेदली. येथील रबींद्र सरोवर स्टेडियमवर मुंबई सिटीने 1-0 असा चमकदार विजय नोंदवित गुणतक्त्यात पहिला क्रमांकही पटकाविला. कर्णधार फॉर्लान याने यंदाच्या स्पर्धेतील आपला दुसरा गोल नोंदविताना 79व्या मिनिटाला कोलकत्याचा गोलरक्षक देबजित मजुमदार याचा बचाव भेदला. या 37 वर्षीय “स्ट्रायकर’चा वेगवान फटका गोलजाळीत घुसला. यावेळी गोलरक्षक देबजित मजुमदारचे चेंडू अडविण्याचे आटोकाट प्रयत्न फोल ठरले. सामन्यात लक्षवेधक ठरलेल्या मुंबई सिटीच्या सोनी नोर्देचा प्रयत्न कोलकत्याच्या प्रबीर दासला चाटून फॉर्लानच्या ताब्यात गेला होता. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये कोलकत्यास फ्रीकिक मिळाली होती. गोलरक्षक आल्बिनो गोम्सने हावियर लारा याचा ताकदवान थेट फटका अप्रतिमपणे अडवत संघाची आघाडी अबाधित राखली. मुंबई सिटीचा हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यांचे सात सामन्यांतून 11 गुण झाले आहेत. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला एका गुणाने मागे टाकले आहे. कोलकत्यास यंदाच्या मोसमातील पहिलाच पराभव पत्करावा लागला. घरच्या मैदानावर गुण गमावल्यामुळे त्यांचे सहा सामन्यानंतर 9 गुण कायम राहिले आहेत. ते तिसऱ्या स्थानी आले आहेत. मुंबई सिटीने सामन्याची सुरवात आक्रमक केली होती, मात्र विश्रांतीला खेळ थांबला तेव्हा त्यांना गमावलेल्या संधी सलत होत्या. ऍटलेटिको द कोलकताचा गोलरक्षक देबजित मजुमदार याचा बचाव भेदणे मुंबईच्या खेळाडूंना शक्य झाले नाही. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात मुंबईने गोलपोस्टच्या दिशेने सहा फटके मारले, तर कोलकत्यास एकाच फटक्यावर समाधान मानावे लागले. मुंबईचे आक्रमक खेळाडू प्रतिस्पर्धी गोलरक्षक मजुमदारची वारंवार परीक्षा पाहत होते, दुसरीकडे मुंबईचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला जास्त धडपड करावी लागली नाही. उत्तरार्धाच्या सुरवातीस कोलकत्याने युवा खेळाडू बिद्यानंद सिंग याला मैदानात उतरविले. मुंबईच्या सोनी नोर्दे याचा खेळ उल्लेखनीय होता. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला त्याचा फटका दिशाहीन ठरला. नंतर बाराव्या मिनिटाला जेर्सन व्हिएरा प्रयत्न थोडक्यात हुकला. 25व्या मिनिटाला कोलकत्यास एक संधी मिळाली होती, परंतु यावेळी हावियर लारा ग्रांडे याचा रिबाऊंड फटका लक्ष्य साधू शकला नाही. 33व्या मिनिटाला मुंबईच्या नोर्दे याने पुन्हा कोलकत्याच्या गोलरिंगणात जोरदार मुसंडी मारली, परंतु तो मजुमदारला चकवू शकला नाही. विश्रांतीनंतरही नोर्देचा धडाकेबाज खेळ कायम राहिला. 54व्या मिनिटाला सोनीने चेंडूवर ताबा मिळवत प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवून त्याने आक्रमक फटका मारला, परंतु चेंडूचा नेम चुकला. सामन्याच्या 61व्या मिनिटाला मुंबई सिटीला गोलरक्षक गोम्सची चुकी नडली असती, मात्र बचावपटू लुसियान गोईयान याने वेळीच रोखल्यामुळे सामीग दौती गोल करण्यापासून दूर राहिला. त्यानंतर सात मिनिटांनी दौतीचा फटका पुन्हा चुकल्यामुळे गोलफलकावरील गोलशून्य बरोबरी कायम राहिली. 71व्या मिनिटास कोलकत्याच्या इयान ह्यूम याचा प्रयत्न गोलरक्षक गोम्सने डावीकडे झेपावत अडविल्यामुळे मुंबईचे नुकसान झाले नाही. सामन्याच्या 85व्या मिनिटास लाराच्या क्रॉसपावर इयान ह्यूमचा प्रयत्न विफल ठरवत गोलरक्षक गोम्सने मुंबईची आघाडी कायम राखली होती.]]>