जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने आपण चॅम्पियन का आहोत हे शनिवारच्या (दि. १५ जून) सामन्यातून सिद्ध करून दिले. मागील वर्षी याच स्टेडियमवर पार पडलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत काहीशी खराब कामगिरी केलेल्या भारतीय संघाकडून यावेळेस चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. आपल्या चाहत्यांना तितक्याच दर्जाचा खेळ दाखवीत भारताने हे जेतेपद फटकावले. महत्वाचं म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता हि स्पर्धा जिंकली.
ड्रॅगफ्लिकर वरून कुमार (दुसरे व ४१ वे मिनिट) व हरमनप्रीत सिंग (११ वे व २५ वे मिनिट) यांनी दोन-दोन तर सागर प्रसाद याने ३५ व्या मिनिटाला गोल नोंदवत भारताचा विजय निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव गोल शेवटच्या सत्रात ५३व्या मिनिटाला रिचर्ड पॉट्झने केला. याआधी भारताने उपांत्य फेरीत तगड्या जपानचा पराभव केला होता.
तत्पूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत जपानने अमेरिकेचा ४-२ ने पराभव केला. या स्पर्धेतील अव्वल दोन संघांना पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार होता. त्या अनुषंगाने स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे भारताचे लक्ष होते. भारताने तश्याच प्रकारे खेळाचा नमुना पेश करीत ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले.
]]>