३-१ अश्या फरकाने मालीला पराभूत करीत स्पेनने गाठली अंतिम फेरी. खराब खेळ व पंचांचा चुकीचा निर्णय ठरलं मालीच्या पराभवाचं कारण. रंगणार युरोपियन चॅम्पियनशिप (१७ वर्षांखालील) पुनरावृत्ती. नवी मुंबई: भारतातील आतापर्यंतच्या फुटबॉलच्या सर्वात मोठ्या महाकुंभाच्या शेवटच्या टप्प्यात येथे एक चांगला सामना रंगला आणि तीन वेळेस जेतेपदाला हुलकावणी देणाऱ्या युरोपियन ‘दादा’ स्पेनने चौथ्यांदा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. माली मागच्या विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता माली संघ मात्र आज आपल्या कामगिरीवर आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयावर नाखूष झाला. अंतिम सामन्यात स्पेनचा सामना होईल तो पहिल्या उपांत्य फेरीतील विजेता संघ इंग्लंड बरोबर. पहिला हाफ स्पेनचा साखळी सामन्यातील चमकदार कामगिरीनंतर नॉक आउट मध्ये त्यापेक्षाही अप्रतिम कामगिरी करणाऱ्या मालीला आज युरोपियन संघातील ‘दादा’ असलेल्या स्पेनने चांगलेच रडवले. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर याअगोदर सामने खेळलेल्या मालीकडून उपस्थित प्रेक्षकांना चांगल्या खेळीची अपेक्षा होती. त्यांनी बलाढ्य स्पेनवर तसे आक्रमणही केले. परंतु दांडगा अनुभव असलेल्या स्पेनने आपली ताकद दाखवत मालीच्या आक्रमणाचा धुव्वा पाडला. स्पेनने अगदी पहिल्याच मिनिटापासून आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यास सुरुवात केली. कर्णधार अबेल रुईझच्या पासवर जुआन मिरांडाला गोल करण्याची संधी मिळाली खरी परंतु टीसील्स गोल करण्यात यश मिळालं नाही. स्पेनने आपल्या आक्रमणावर अधिक भर देत मालीला अडचणीत टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु मालीनेही तितक्याच ताकतीने स्पेनच्या आक्रमणाला प्रतिउत्तर दिले. मालीच्या लसाना यालाही गोलची संधी मिळाली परंतु त्याचा वेध योग्य ठरला नाही. गॅलरी: स्पेन वि. माली उपांत्य फेरी सामन्याच्या १९ व्या मिनिटाला मालीच्या खेळाडूंनी पेनल्टीच्या कक्षेत एक चूक केली आणि पंचांनी स्पेनला पेनल्टी दिली. स्पेनने या पेनल्टीचा पुपेंपूर फायदा घेत कर्णधार अबेल रुईझने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडत संघाचं खात उघडून दिलं. पुढच्या काही मिनिटांतच माली संघानेही स्पेनला चांगलीच टक्कर दिली. ३८ व्या मिनिटाला तर चिक ओमरने गोलपोस्टकडे अगदी अचूक निशाणा धाडला, परंतु स्पेनच्या गोलकिपरने तितक्याच सावधरीत्या गोल वाचवला. पूर्वार्धातील काहीच मिनिटे शिल्लक असताना सेजार गेलबर्टच्या पासवर कर्णधार अबेल रुईझने आणखी एकदा अचूक निशाणा धाडत स्पेनची आघाडी २-० अशी वाढवली. या वेळेस मात्र मालीचा संघ पूर्णपणे हतबल झालेला दिसत होता. आणि याचाच परिणाम म्हणजे सलाम जिद्दो याला मिळालेलं यलो कार्ड. पहिल्या हाफनंतर स्पेनने आपली आघाडी २-० अशी कायम ठेवत सामान्यवरांचा आपला दबदबा कायम ठेवला होता. पंचांनी केली ‘मोठी’ चूक? एकीकडे स्पेनने आपला सर्वोत्तम खेळ दाखवत पूर्वार्ध गाजवले तर दुसरीकडे मालीला अगदी हातातोंडाशी आलेल्या गोलपासूनही वंचित राहावं लागलं. आणि त्यात भर टाकली ती पंचांनी. ६१ व्या मिनिटाला चिक ओमरने धाडलेला गोल पंचांनी वैध ठरवलं नाही. त्याने केलेला शूट स्पष्टपणे गोलपोस्टमध्ये जाऊन बाहेर आला. परंतु पंचांनी तो नीटसा पहिला नाही आणि परिणामी मालीला हक्काच्या गोलपासून वंचित राहावं लागलं. मालीची कडवी झुंज पहिल्या हाफमधला खराब खेळ, त्यात पंचानी केलेली मोठी चूक यातून सावरण्याचा माली संघाने पपुरेपूर प्रयत्न केला. ७१ व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टोरेसने गोल करीत स्पेनची आघाडी ३-० अशी वाढवली. मालीने पुढच्या तीन मिनिटांतच गोल करून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. या वेळेस लसाना डीएच्या प्रयत्नांना यश आलं. परिणामी रिप्ले मधील दृश्यांनंतर मालीच्या संघाने पंचांच्या गोल न देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि पंच व सामना अधिकाऱ्यांशी थेट हुज्जत घातली. पंचांनी जास्तच हुज्जत घातल्यामुळे सपोर्ट स्टाफमधील एकाला यलो कार्ड देत मालीच्या आशांवर पाणी फेरण्याचं काम केलं. अधूनमधून मिळणाऱ्या संधीचा मालीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला. सामना संपायला शेवटची अगदी काहीच मिनिटे शिल्लक असताना माली संघाने आपल्या आक्रमणतेवर अधिक भर दिला. तर दुसरीकडे ३-१ अश्या आघाडीत असणाऱ्या स्पेनने बचावात्मक पवित्रा घेतला. ८३ व्या मिनिटाला लसाना डीएने जवळपास गोलच केला होता परंतु स्पेनचं नशीब बलवत्तर कि काय, या वेळेसही त्याला आपल्या दुसऱ्या गोलपासून वंचित राहावं लागलं.]]>