पुणे, दिनांक 17 ऑक्टोबर 2016: कर्णधार महंमद सिसोको याने उत्तरार्धात नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी पुणे सिटीने हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी झालेल्या या लढतीतून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यंदाच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील ही सलग तिसरी बरोबरी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला सेड्रिक हेन्गबर्ट याने केरळा ब्लास्टर्सला आघाडीवर नेले. पाहुण्या संघाने पूर्वार्धातील 45 मिनिटांच्या खेळात ही आघाडी टिकविली. सामन्याच्या 68व्या मिनिटाला सिसोको याने केलेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सची आघाडी भेदली गेली. बदली खेळाडू फारुख चौधरीने 72व्या मिनिटाला अचूक नेमबाजी केली असती, तर कदाचित केरळा ब्लास्टर्सने हा सामना जिंकलाही असता. पुणे सिटीची ही स्पर्धेतील पहिलीच बरोबरी ठरली. मागील सामन्यात याच मैदानावर नॉर्थईस्ट युनायटेडकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. पुणे सिटीचे चार सामन्यांतून चार गुण झाले आहेत. कोचीत मुंबईला एका गोलने नमवून पुण्यात आलेल्या केरळा ब्लास्टर्सची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. त्यांचे पाच सामन्यांतून पाच गुण झाले आहेत. पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीनंतर पुणे सिटीने उत्तरार्धात बरोबरीच्या गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. ड्रॅमेन ट्रॅओरे वारंवार केरळा ब्लास्टर्सच्या रिंगणात धडाका मारत होता. अखेरीस त्यांचे प्रयत्न सफल ठरले. उत्तरार्धातील पहिल्या तेरा मिनिटांच्या खेळात त्याचे दोन प्रयत्न वाया गेले. 68व्या मिनिटास कर्णधार महंमद सिसोकोने यजमान संघाला वेगवान फटक्यावर बरोबरी साधून दिली. लिव्हरपूल व युव्हेंट्सच्या या माजी खेळाडूने “आयएसएल’मधील आपला पहिला गोल नोंदविला. सिसोकाचा “व्हॉली’ फटका अडविण्याचा केरळा ब्लास्टर्सच्या ऍरोन ह्यूज याने प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याला चाटूनच गोलजाळीत गेला. सामन्याच्या सुरवातीसच पुणे सिटीला जबरदस्त हादरा बसला. यजमानांची बचावफळी बेसावध असल्याची संधी सेड्रिक हेन्गबर्ट याने पुरेपूर साधली. यावेळी सामना सुरू होऊन तीनच मिनिटे झाली होती. जोसू कुरैस याच्या कॉर्नर किकवर पुणे सिटीच्या खेळाडूने चेंडू परतावून लावला. परंतु चेंडू अझराक महमत याच्याकडे गेला. त्याने 25 यार्डावरून डाव्या पायाने सणसणीत फटका मारला, जो प्रतिस्पर्धी बचावपटूने रोखला. मात्र त्याचवेळी हेन्गबर्टने चेंडू नियंत्रित करत सणसणीत फटक्यावर गोलरक्षक अपौला बेटे याला सावरण्यास वेळ दिला नाही. एका गोलच्या पिछाडीनंतर 24व्या मिनिटाला पुणे सिटीला बरोबरीची चांगली संधी होती. यजमान संघाच्या ड्रॅमेन ट्रॅओरे याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याच्यापाशी फटका मारण्यासाठी पुरेसा वेळही होता, परंतु फटका दिशाहीन ठरला. दुसरीकडे केरळा ब्लास्टर्सचा नियोजनबद्ध खेळ कायम होता. 36व्या मिनिटास मायकेल चोप्राने महंमद रफीकला सुरेख पासवर चेंडू पुरविला. रफीकने चेंडू महंमद रफीला दिला, रफीच्या पासवर मेहताब हुसेनचा नेम किंचित हुकला. पुणे सिटीने बरोबरी साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, परंतु केरळा ब्लास्टर्सचा बचाव भक्कम राहिला. त्यामुळे विश्रांतीला दोन्ही संघ ड्रेसिंग रूममध्ये परतताना केरळा ब्लास्टर्सपाशी एका गोलची महत्त्वपूर्ण आघाडी कायम राहिली. सामन्याच्या 55व्या मिनिटाला पुणे सिटीच्या ट्रॅओरे याने जवळपास गोल केला होता. मात्र केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक संदीप नंदी याने वेळीच फटका रोखून संघाची पूर्वार्धातील आघाडी कायम राखली. त्यानंतर 58व्या मिनिटाला ट्रॅओरे याला आणखी एक संधी होती, परंतु यावेळी तो “ऑफ साईड’ ठरल्यामुळे केरळाची आघाडी अबाधित राहिली. केरळा ब्लास्टर्सला 72व्या मिनिटाला पुन्हा आघाडी घेण्याची सुरेख संधी प्राप्त झाली होती. मात्र बदली खेळाडू फारुख चौधरीची धोकादायक फटका पुणे सिटीचा गोलरक्षक अपौला बेटे याने रोखल्यामुळे 1-1 अशी बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात पुणे सिटीने आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या 87व्या मिनिटास पुणे सिटीच्या नारायण दास याच्या दक्ष कामगिरीमुळे केरळाच्या फारुख चौधरीची संधी वाया गेली.]]>