पुणे, दिनांक 3 नोव्हेंबर 2016: एफसी गोवा संघाने पूर्वार्धात राफाएल कुएल्हो याने फ्रीकिकवर नोंदविलेल्या गोलमुळे हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी दुसरा विजय नोंदविला. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या स्टेडियमवर त्यांनी एफसी पुणे सिटीवर एका गोलने मात केली. पाहुण्या संघाने पहिल्या टप्प्यातील पराभवाचीही परतफेड केली. गोव्यात झालेल्या अगोदरच्या लढतीत पुणे सिटीने एफसी गोवावर 2-1 असा विजय मिळविला होता, त्याचा वचपा आज गोव्यातील संघाने काढला. पुण्यातील त्यांचा हा पहिलाच विजय ठरला. ब्राझीलियन राफाएल कुएल्हो याने 32व्या मिनिटाला केलेला गोल झिको यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी निर्णायक ठरला. पुण्यात येण्यापूर्वी घरच्या मैदानावर लागोपाठ दोन सामने गमावलेल्या एफसी गोवा संघाला आजच्या विजयाने सावरता आले. त्यांना पूर्ण तीन गुणामुळे गुणतक्त्यात प्रगती साधणेही शक्य झाले. त्यांचे आठ सामन्यांतून सात गुण झाले आहेत. ते सातव्या क्रमांकावर आले आहेत. पुणे सिटीला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यांचे सात सामन्यांतून सहा गुण कायम असून ते आठव्या क्रमांकावर घसरले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सातपैकी पाच सामने हरलेल्या एफसी गोवाने आज उल्लेखनीय खेळ केला. त्यांच्या बचावफळीने पुणे सिटीच्या आक्रमणावर पहारा ठेवला होता. तुलना करता, यजमान संघाचे खेळावर जास्त वर्चस्व होते, मात्र गमावलेल्या संधीमुळे त्यांना गोल करता आला नाही. एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने आपली निवड सार्थ ठरविली. त्यामुळे पुणे सिटीच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. यंदाच्या मोसमात आक्रमणात कमजोर ठरलेल्या एफसी गोवास ब्राझीलियन राफाएल कुएल्हो याने पूर्वार्धातील अर्ध्या तासाच्या खेळानंतर आघाडीवर नेले. राफाएलचा हा यंदाच्या स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. आपला स्पर्धेतील पहिला गोल त्याने पुणे सिटीविरुद्धच पहिल्या टप्प्यात नोंदविला होता. फ्रीकिकचा सदुपयोग करताना एफसी गोवाच्या या स्ट्रायकरने सणसणीत फटक्यावर गोलरक्षक अपौला इदेल बेटे याला बचाव भेदला. पूर्वार्धाच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये जेझूस टाटो याने पुणे सिटीला जवळपास बरोबरी साधून दिली होती, परंतु एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याच्या दक्षतेमुळे पाहुण्या संघाची आघाडी अबाधित राहिली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना राफाएल कुएल्होचा आणखी एक प्रयत्न फोल ठरण्यामुळे एफसी गोवाला दुसरा गोल नोंदविता आला नाही. राफाएलने गोलरक्षक बेटे याला चकवा दिला होता, त्याचासमोर खुली संधी होती, पण पुणे सिटीच्या राहुल भेके याने गोलरेषेवरून चेंडू रोखला आणि संघावरील संकट टाळले. त्यानंतर राफाएलने मारलेला फटका गोलपट्टीवरून गेला. त्यापूर्वी सामन्याची नऊ मिनिटे शिल्लक असताना फ्रीकिक फटक्यावर पुणे सिटीचा ब्रुनो हेरेरो खोलवर फटका मारू शकला नाही, त्यामुळे त्यांना बरोबरी साधणे शक्य झाले नाही. पूर्वार्धातील खेळात दोन्ही संघांनी वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने खेळ केला. सुरवातीच्या पंधरा मिनिटांच्या खेळात पुणे सिटीने पाहुण्या संघावर वर्चस्व राखले होते. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात राफाएल कुएल्होची अचूक फ्रीकिक हाच दोन्ही संघांतील फरक होता. पुणे सिटीलाही संधी मिळाली होती, परंतु त्याचे खेळाडू एफसी गोवाचा गोलरक्षक कट्टीमनीस गुंगारा देऊ शकले नाहीत. कट्टीमनीने प्रथम जोनाथन लुका आणि नंतर टाटो यांचे धोकादायक फटके अडवून यजमान संघाला गोल करण्यापासून दूरच राखले. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी एफसी गोवा संघाला आघाडी फुगविण्याची संधी होती. राफाएल कुएल्होच्या शानदार पासवर जोफ्रे गोन्झालेझ याचा ताकदवान फटका दिशाहीन ठरला. यावेळी जोफ्रे याला फक्त गोलरक्षकाला चकवायचे होते. त्यानंतर पाच मिनिटांनी जोफ्रे याने पुन्हा पुणे सिटीच्या रिंगणात मुसंडी मारली होती. यावेळी गोलरक्षक बेटे याने जोफ्रेचे आक्रमण थोपविले. आक्रमणात ताज्या पायांना संधी देण्याच्या उद्देशाने एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको याने जोफ्रे याला माघारी बोलावले. 69व्या मिनिटास त्याची जागा रेनाल्डो ऑलिव्हेरा याने घेतली. एफसी गोवाची आघाडी भेदण्याच्या उद्देशाने पुणे सिटीचे प्रशिक्षक अंतोनियो हबास यांनी उत्तरार्धात लागोपाठ दोन बदल केले. अनिबाल रॉड्रिगेजच्या जागी मोमार न्दोये याला, तर लेनी रॉड्रिग्जच्या जागी संजू प्रधान याला मैदानात पाठविले. सामना संपण्यास पंधरा मिनिटे बाकी असताना जोनाथन लुका याचा भेदक ठरू पाहणारा फ्रीकिक फटका गोलरक्षक कट्टीमनी याने अचूक अंदाज बांधत अडविला. त्यामुळे यजमान संघाची बरोबरी साधण्याची आणखी एक संधी वाया गेली.]]>