मडगाव, दिनांक 16 नोव्हेंबर 2016: गोल करण्याच्या संधी वाया घालविलेल्या एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी संघांना हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार लढतीत अखेर गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना चुकीची फटकेबाजी भोवली. गोलशून्य बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे मुंबई सिटीचे 11 सामन्यानंतर 16 गुण झाले. मुंबईने विजय मिळविला असता, तर 17 गुण असलेल्या अव्वल स्थानावरील दिल्ली डायनॅमोजला मागे टाकणे शक्य झाले असते. बरोबरीमुळे मुंबई सिटीला दुसरा क्रमांक प्राप्त झाला. एफसी गोवाचे 11 सामन्यानंतर 11 गुण झाले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडला एका गुणाने मागे टाकून सातवा क्रमांक मिळविल्याचेच तात्पुरते समाधान यजमान संघाला लाभले. नॉर्थईस्टच्या तुलनेत एफसी गोवा संघ दोन सामने जास्त खेळला आहे. सामन्याच्या “स्टॉपेज टाईम’मध्ये एफसी गोवाचा बदली खेळाडू ज्युलिओ सीझर याने हातची संधी वाया घालविली, त्यामुळे यजमान संघाला पूर्ण तीन गुणांना मुकावे लागले. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी इच्छुक असलेल्या एफसी गोवा संघाची वाटचाल खूपच बिकट झाली आहे. गोलरक्षक अमरिंदर सिंगच्या दक्षतेमुळे मुंबईचा संभाव्य पराभव टळला. त्रिनदाद गोन्साल्विसच्या पासवर ज्युलिओने प्रतिस्पर्धी बचावपटूस चकविले खरे, पण अमरिंदरची चपळाई त्याला भारी ठरली. त्यापूर्वी सामन्याच्या शेवटच्या मिनिटास गोव्याच्या रॉबिन सिंगला पाडल्याबद्दल मळालेला फ्रीकिक फटक्यावर ज्युलिओ चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. सामना संपण्यास बारा मिनिटे बाकी असताना यजमानांना आघाडीवर नेण्याची चांगली संधी रॉबिन सिंगने वाया घालविली. मंदार राव देसाईने रचलेल्या चालीवर चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविणे रॉबिनला जमले नाही. त्याची नेमबाजी अगदीच सदोष ठरली. सामना संपण्यास फक्त सात मिनिटे बाकी असताना सुनील छेत्रीचा अतिशय धोकादायक फटका गोलरक्षक कट्टीमनी याने अप्रतिमरीत्या अडविला. सामन्याच्या पूर्वार्धाच्या सुरवातीस एफसी गोवाने संधी प्राप्त करण्याच्या उद्देशाने खेळ केला, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. यजमानांचा मध्यरक्षक राफाएल कुएल्हो याचा आजचा खेळ लाजवाब होता, परंतु त्याचे सहकारी लाभ उठवू शकले नाहीत. सोळाव्या मिनिटास रोमियो फर्नांडिसला मुंबई सिटीच्या खेळाडूने पाडल्यानंतर मिळालेल्या फ्रीकिक फटक्यावर रिचार्लीसन फेलिस्बिनो याने कमजोर फटका मारल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान झाले नाही. नंतर 22व्या मिनिटाला राफाएलने रोमिओ फर्नांडिसला अप्रतिम क्रॉसपास दिला होता, मात्र रोमियोला भेदक फटका मारणे शक्य होते, तरीही त्याची नेमबाजी दिशाहीन ठरली. लगेच तीन मिनिटांनी राफाएलने पुन्हा मुंबई सिटीच्या रिंगणात मुसंडी मारली होती. यावेळीही रोमिओ राफाएलच्या पासवर चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही. मुंबई सिटीनेही आक्रमण रचले, परंतु त्यांचे आक्रमक चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवू शकले नाहीत. 27व्या मिनिटास दिएगो फॉर्लानने फटका मारताना चूक केली. नंतर दहा मिनिटांनी मातियस डिफेडेरिको याने सोनी नोर्दे याला संधी प्राप्त करून दिली होती, मात्र त्याचा फटका गोलपट्टीवरून गेला. 38व्या मिनिटाला एफसी गोवाचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या दक्षतेमुळे फॉर्लानचा प्रयत्न असफल ठरला. उत्तरार्धाच्या सुरवातीला मुंबईने आक्रमणाच्या उद्देशानेच खेळ केला. सुरवातीच्या तीन मिनिटांत फॉर्लान आणि नोर्दे यांनी एफसी गोवाच्या बचावफळीची परीक्षा घेतली. विश्रांतीनंतरच्या सहाव्या मिनिटाला रिचार्लीसनच्या कॉर्नर फटक्यावर रोमिओचा हेडर प्रतिस्पर्धी बचावपटूस भेदू शकला नाही, त्यामुळे यजमानांची आणखी एक संधी वाया गेली. खेळ सुरू झाल्यानंतर तासाभराच्या झिको यांनी संघात लागोपाठ दोन बदल केले. देबब्रत रॉय आणि कीनन आल्मेदा यांच्या जागी अनुक्रमे जोफ्रे गोन्झालेझ आणि त्रिनदाद गोन्साल्विस यांना मैदानात पाठविण्यात आले. त्यानंतर संघात तिसरा बदल करताना झिको यांनी संजय बालमुचू याच्या जागी ज्युलिओ सीझर याला पसंती दिली. सामन्याच्या 62व्या मिनिटाला मुंबईचा हुकमी एक्का सुनील छेत्री गोल करण्यात अयशस्वी ठरला. यावेळी फॉर्लानने एफसी गोवाचा बचावपटू ग्रेगरी अर्नोलिन याला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. गोलरक्षक कट्टीमनी याने जागा सोडल्याचे हेरून त्याने छेत्रीला चेंडू पास केला, मात्र भारतीय स्ट्रायकरला त्याचा लाभ उठवता आला नाही. नंतर तीन मिनिटांनी अर्नोलिनच्या भक्कम बचावामुळे फॉर्लानच्या प्रयत्न यशस्वी ठरला नाही.]]>