दिल्ली, दिनांक 26 नोव्हेंबर 2016: दिल्ली डायनॅमोजची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होत आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिल्लीचे प्रशिक्षक जियानल्युसा झॅंब्रोट्टा यांना गोव्याच्या आव्हानाची जाणीव आहे. गुणतक्त्यात गोवा तळाला असला तरी त्यांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल हे त्यांना ठाऊक आहे. पहिल्या टप्यात दिल्लीचा संघ सर्वाधिक प्रभावी होता. आता तीन सामने बाकी असताना हा संघ चौथ्या स्थानावर आहे. 11 सामन्यांतून त्यांचे 17 गुण झाले आहेत. नेहरू स्टेडियमवर गोव्याविरुद्ध त्यांना विजयाची गरज आहे. झॅंब्रोट्टा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही हा सामना जिंकला तर आगेकूच करण्याची चांगली संधी असेल. मला आकडेवारी करायची नाही, तर केवळ या लढतीच्या तयारीवर आणि जिंकण्याच्या प्रयत्नावर लक्ष केंद्रित करायचे आहे. नेहमीप्रमाणेच आम्ही विजयासाठी खेळू. दिल्लीने यंदा घरच्या मैदानावर भक्कम खेळ केला आहे. घरच्या मैदानावर एकदाही पराभूत न झालेला हा एकमेव संघ आहे. पहिले तीन सामने त्यांना विजय मिळविता आला नव्हता, पण नंतर त्यांना फॉर्म गवसला. पुढील तीन पैकी दोन सामने त्यांनी जिंकले. आता हा त्यांचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना आहे. त्यामुळे संघाचे लक्ष खेळावर केंद्रित झालेले असलेच पाहिजे हे झॅंब्रोट्टा यांना ठाऊक आहे. त्यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला आमच्यासाठी हा सर्वाधिक खडतर सामना आहे. गोवा तळात आहे असा विचार करणे चूक ठरेल. तसा दृष्टिकोन खराब ठरेल. त्यामुळेच खेळाडूंनी दक्ष राहून निर्धाराने खेळले पाहिजे. दिल्लीचे यानंतर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्याशी सामने आहेत. आकडेवारीच्या आधारावर गोव्याला अजूनही संधी आहे, पण ती केवळ 0.001 इतकीच आहे. घरच्या मैदानावर ऍटलेटीको डी कोलकता संघाकडून हरल्यानंतर गोव्याचे प्रशिक्षक झिको यांनी आशा सोडून दिल्या आहेत, पण आपले खेळाडू चुरशीचा खेळ करण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरतील असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आम्हाला तेवढ्याच चुरशीने खेळावे लागेल. आम्ही व्यावसायिक आहोत. मैदानावर उतरल्यानंतर आम्ही क्लबच्या जर्सीचा आदर राखलाच पाहिजे. आम्ही चाहते आणि क्लबच्या मालकांच्या सन्मानासाठी खेळले पाहिजे. मी फुटबॉल खेळायला लागल्यानंतर हे शिकलो. आपण नेहमीच जर्सीचा सन्मान केला पाहिजे. आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू. गोव्याला घरच्या मैदानावर दिल्लीकडून 0-2 असे पराभूत व्हावे लागले होते. आता दिल्लीत गोव्याच्या संघाचे पारडे खाली असेल. गोव्याचा बचाव कमकुवत आहे, पण घरच्या तुलनेत प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर त्यांची कामगिरी सरस झाली आहे. 11 पैकी सात गुण त्यांनी प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर मिळविले आहेत. तीन पैकी दोन वेळा त्यांनी क्लीन शीट राखली तेव्हा ते गोव्याबाहेरच खेळले. झिको म्हणाले की, हा सामना एक वेगळी कथा आहे. गोव्यात खेळलो तेव्हा आम्हाला गुणांसाठी झुंजावे लागले आणि जास्त धोके पत्करावे लागले. आता आम्हाला धोका पत्करण्याची गरज नाही. फरक इतकाच की आम्ही केवळ शंभर टक्के तंदुरुस्त खेळाडू खेळवू. मागील सामन्यात त्यांची फार दमछाक झाली.]]>