मालिकेतील पहिल्या दोन कसोटींत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत २०३ धावांनी विजय संपादन करून मालिकेत पहिला विजय साजरा केला. नॉटिंगहॅम: चौथ्या दिवशी आदिल राशिदची चिवट फलंदाजी सामान्याच्या शेवटच्या दिवशी काही खास करू शकली नाही आणि अश्विनच्या गोलंदाजीवर जेम्स अँडरसनला रहाणेने झेलबाद करीत भारतीय खेम्यात खुशीचं वातावरण आणलं. पहिल्या कसोटीतील निसटता पराभव व लॉर्ड्स कसोटीतील दारुण पराभव पाहिल्यानंतर चौफेर झालेल्या टीकेला विराट कोहलीच्या टीम इंडियाने तितकेच सुरेख उत्तर देत मालीकेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या. इंग्लंडला पहिल्या डावात १६१ धावांवर गुंडाळत भारताने मालिकेत पहिल्यांदाच आघाडी घेत सामान्याच्या दुसऱ्याच दिवशी पकड मिळवायला सुरुवात केली. पहिल्या डावात १६८ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर भारताने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा पेश केला. पहिल्या डावात शतकापासून केवळ तीन धावांनी वंचित राहिलेल्या विराट कोहलीने यावेळेस मात्र कोणतीही घाई न करता आपले २३ वे कसोटी शतक झळकावत भारताला ५०० धावांची आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला. त्यात पुजाराच्या ७२ धावा व हार्दिक पंड्याच्या ५२ चेंडूंतील नाबाद ५२ धावाही भारताला फायदेशीर ठरल्या. ५२१ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंड संघाने सावधरीत्या सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी झालेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ९ षटकांत बिनबाद २३ धावा करीत सुरुवात केली. चौथ्या दिवशी इशांत शर्माने सलग दोन षटकांत दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडीत भारताला दणक्यात सुरुवात करून दिली. काही वेळाने बुमराने जो रूटला तर मोहम्मद शमीने पोपला बाद करीत यजमानांची अवस्था चार बाद ६२ अशी केली. पाचव्या गड्यासाठी जोस बटलर व बेन स्टोक्स यांनी चिवट फलंदाजी करीत १६९ धावांची भागीदारी करीत मधल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना अक्षरशः रडवले. बटलरने १७६ चेंडूंचा सामना करीत १०३ धावा खेचत कसोटीतील आपले पहिले शतक झळकावले. स्टोक्सने चिवट फलंदाजीचा नमुना सादर करीत तब्बल साडे चार तास खेळपट्टीवर तग धरीत १८७ चेंडूंत ६२ धावा केल्या. बुमराने इंग्लंडचे पाच गडी बाद करीत भारतीय विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीच्या दोन्ही डावातील मिळून २०० धावांनी त्याला सामानावीराचा किताब मिळवून दिला. मालिकेतील चौथा सामना ३० तारखेला साऊथमटन येथे होईल. चौथा सामना भारताने जिंकल्यास मालिका बरोबरीत निघेल आणि पाचव्या व अंतिम सामन्यात मोठी चुरस पाहावयास मिळेल.]]>