कोची, दिनांक 8 नोव्हेंबर 2016: उत्तरार्धात नऊ खेळाडूंसह खेळलेल्या एफसी गोवा संघाला केरळा ब्लास्टर्स संघाने पिछाडीवरून हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत 2-1 असे हरविले. सामना मंगळवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. हा सामना चांगलाच तणावपूर्ण ठरला. सुपर सब खेळाडू सी. के. विनीत याने नऊ मिनिटांच्या स्टॉपेज टाईममध्ये नोंदविलेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सने विजयाचे पूर्ण तीन प्राप्त करता आले. हा गोल झाला तेव्हा फक्त एकच मिनिट बाकी होते. सामन्याच्या 46व्या मिनिटाला एफसी गोवाचा कर्णधार ग्रेगरी अर्नोलिन याला थेट रेड कार्ड मिळाले, तर नंतर 81व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रिचार्लीसन याला मैदान सोडावे लागले. सामन्याच्या नवव्या मिनिटाला राफाएल कुएल्हो याने एफसी गोवास आघाडीवर नेले, तर 48व्या मिनिटाला केर्व्हन्स बेलफोर्ट याने पेनल्टी फटक्यावर केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. विजयाच्या तीन गुणांमुळे केरळाचे नऊ सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. त्यांचा हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. पहिल्या टप्प्यात गोव्यातही केरळाने 2-1 अशा फरकाने मात केली होती. त्यांनी गुणतक्यात चौथ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. एफसी गोवा संघाला सहावा पराभव पत्करावा लागला. त्यांचे नऊ सामन्यानंतर सात गुण व तळाचा आठवा क्रमांक कायम राहिला आहे. एफसी गोवा संघ पूर्वार्धातील खेळात एका गोलने आघाडीवर होता. सामन्याच्या नवव्या मिनिटास ब्राझीलियन आघाडीपटू राफाएल कुएल्होच्या भेदक हेडरमुळे पाहुण्या संघाने आघाडी घेतली. मात्र उत्तरार्धाच्या सुरवातीसच एफसी गोवा संघाला जबर धक्का बसला. त्यांचा कर्णधार ग्रेगरी अर्नोलिन याला गोलरिंगणात चेंडू हाताळल्याप्रकरणी रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे संपूर्ण उत्तरार्धात एफसी गोवा संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर केर्व्हन्स बेलफोर्ट याने केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. रिचार्लीसन फेलिस्बिनो याने घेतलेल्या थेट फ्रीकिकवर राफाएलने चेंडू नियंत्रित केला. हेडर चेंडूला अगदी जवळून गोलजाळीची दिशा दाखविताना त्याने गोलरक्षक ग्रॅहॅम स्टॅक याच्या पायामधून जागा शोधली. विश्रांतीनंतर पहिल्याच मिनिटाला महंमद रफीकने गोलरिंगणातून मारलेला फटका गोलपोस्टसमोर असलेल्या ग्रेगरी अर्नोलिनच्या हाताला आपटला. यावेळी चेंडू चुकून ग्रेगरीच्या हाताला लागल्याचे जाणवत होते, मात्र त्याने चेंडू जाणूनबुजून हाताळल्याचे रेफरींचे मत बनले. रेफरींनी एफसी गोवाच्या कर्णधारास रेड कार्ड दाखविले आणि केरळासह पेनल्टी फटका दिला. यावेळी बेलफोर्ट याने चेंडूला अचूक दिशा दाखविताना गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीनीचा बचाव भेदला. या गोलनंतर स्टेडियमवरील केरळा ब्लास्टर्सच्या मोठ्या संख्येतील पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना एफसी गोवाचा आणखी एक खेळाडू कमी झाला. नव्यानेच मैदानात उतरलेल्या केरळाच्या सी. के. विनीत याला रिचार्लीसनने धोकादायकरीत्या अडथळा आणल्याबद्दल रेफरींनी एफसी गोवाच्या खेळाडूस सामन्यातील दुसरे यलो कार्ड दाखविले. त्याला पहिले यलो कार्ड 34व्या मिनिटाला मिळाले होते. रेफरींचा हा निर्णय पचविणे रिचार्लीसन, तसेच एफसी गोवा संघाला पचविणे खूपच जड गेले. रिचार्लीसनने रागानेच चेंडू रेफरींच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने वेळीच स्वतःवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.]]>