पुणे: पहिला डाव, ४० षटके, १०५ धावा. दुसरा डाव, ३४ षटके आणि १०७ धावा. नेहमीच आपल्या घराच्या मैदानांवर फलंदाजीत ‘दादा’ असलेल्या भारतीय संघाला आज पूर्ण तयारीनिशी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने येथेच्छ समाचार घेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत ३३३ धावांनी दारूण पराभूत करीत १९ सामन्यांची अपराजित मालिका खंडित केली. याच विजयाबरोबर ऑस्ट्रेलियाने भारताला भारतात तब्बल १२ वर्षांनी हरविण्याची किमयाही केली. ऑस्ट्रेलियाचं कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक आणि स्टीव्ह ओ’किफीचे १२ बळी ही आजच्या सामन्याची वैशिष्ठे ठरली. कालच्या २९८ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाचं कर्णधार स्टीव्हन स्मिथने साथीदार मिचेल मार्श सोबत आज तिसर्या दिवशी आक्रमक सुरुवात करीत मोठ्या आघाडीकडे झेप घेण्यास सुरुवात केली. येथील सपाट व कोरड्या खेळपट्टीवर जिकडे भारतीय संघ धावा करण्यास सपशेल फेल ठरला तिकडे पाहुण्यांनी यजमानांना पुरतेच धारेवर धरले. स्मिथ आणि त्याच्या टीमने भारतीय ‘टॉप’ गोलंदाजीचा कोणताही दबाव न घेता जवळजवळ साडे तीनच्या रनरेटने धावा जमवत पहिल्या सत्रात भारताला चांगलेच दमवले. भारताच्या रवींद्र जडेजाने डावाच्या ५४ व्या षटकात कालचा नाबाद असलेला मिचेल मार्शला यष्टीरक्षक साहाकडे झेल देण्यास भाग पाडले आणि आजच्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. काल ३७ व्या षटकातच दोन्ही रिव्हू गमावून बसलेल्या विराट कोहलीला आज पंचांकडे अपील करून केवळ बघण्यावाचून पर्याय नव्हता. आज जडेजाच्या गोलंदाजीवर डावातील ५६ व्या षटकात स्मिथला एल. बी. डब्ल्यू. पकडण्यासाठी एक जोरदार केलेले अपील पंचांनी फेटाळले आणि रिप्ले मध्ये बाद असे दाखवण्यात आले. स्मिथ तेव्हा ७३ धावांवर खेळत होता. पुढे ६६ व्या षटकातही अशीच दुविधा भारताची झाली आणि स्मिथने आपले कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावले. स्मिथच्या या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आघाडी ४०० च्या वर लांबवली. सकाळच्या सत्रातील शेवटच्या षटकात उमेश यादवने नॅथन लयोनला बाद करीत सत्राचा खेळ ३० मिनिटांनी वाढवला. मिळालेल्या ३० मिनिटांत भारताने शेवटचा फलंदाज ओ’किफीला बाद करीत ऑस्ट्रेलियाचं डाव २८५ धावांत गारद केला आणि सकाळचे सत्र १५ मिनिटानंतर समाप्त केले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४४१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवत पुण्याच्या सपाट व कोरड्या खेळपट्टीवर काहीशे अशक्य आव्हान दिले. धावांचा मोठा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाने याही सत्रात आपल्या पहिल्या डावातील कामगिरीची पुनरावृत्ती केली. पहिल्या डावात केवळ १०५ धावांवर गारद झालेल्या भारतीय संघाने विजय-राहुल या सलामी जोडीसह सुरुवात केली. मागच्या २-३ वर्षांपासून सलामीच्या जोडीची समस्या भासवत असणाऱ्या भारतीय संघाला आजही काही योगदान मिळाले नाही. चेंडूवर ताबा मिळवण्यास धडपड करणाऱ्या विजयला ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सनी चांगलेच खेळवले. पाचव्या षटकात ओ’किफीच्या एका चेंडूला मारण्याच्या नादात पंचांनी पायचीत पकडले आणि भारताचा डाव गडगडायला सुरुवात झाली. पुढच्याच षटकात लायोनने राहुलला पायचीत करीत भारताला दुसरा धक्का देत दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. या दोन्ही वेळेस भारताने रिव्हू वापरले आणि डी=दोन्ही वेळेस फेल ठरले. पहिल्या डावात शून्यावर बाद होणार्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजारासह सामन्याची सूत्रे हाती घेतली. काही काल दोघांनी मैदानावर टिकण्याचा प्रयत्न केला परंतु ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्ससमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही. पुजारा-कोहलीने जवळपास ११ षटके फलंदाजी करीत ३१ धावांची भागीदारी रचली. ओ’किफीच्या ऑफ साईडच्या चेंडूवर कोहली पूर्णपणे बीट होईन त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या रहाणेने पटापट धावा जमवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु तोही किफीच्या फिरकीसमोर हतबल झाला. सहाव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अश्विननेही केवळ ८ धावांचं योगदान देत तंबूत परतला. चहापानापूर्वी साहाही ओ’किफीचा शिकार होऊन भारताला अजून अडचणीत आणले. चहापानापर्यंत भारत ९९ धावा करून ६ गडी गमावून बसला होता. केवळ औपचारिकता म्हणून भारताने शेवटच्या सत्रात फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याची सुरुवात की काय तीन क्रमांकावर आलेल्या पुजाराने आपली विकेट टाकली. जडेजाही केवळ ३ धावा करून बाद झाला आणि भारत १०२ वर ८ गडी बाद अश्या अवस्थेत झाला. दरम्यान ओ’किफीने सामन्यात दुसर्यांदा ५ बळी घेत भारताच्या डावाला खिंडार पाडलं. ९९-६ ते १०२-८ अशी काहीशी अवस्था २-३ षटकांत भारताची झाली. उरलेले दोन गडी लायोनने टिपत भारताला १०७ धावांत बाद करीत ३३३ अश्या मोठ्या फरकाने नमविले. मागील दोन वर्षांपासून एकदाही पराभवाची चव न चाखणाऱ्या भारतीय संघाची आज ऑस्ट्रेलियाने मस्ती उरावली. सामना चालू होण्याच्या आधी संपूर्ण क्रिकेट जगतात पुणे येथील खेळपट्टीची चर्चा होती. येथील खेळपट्टी ही सपाट व कोरडी असल्याने सामना ३ ते ४ दिवसात संपेल व फिरकी गोलंदाज आपले वर्चस्व दाखवतील. असेच चित्र या सामन्यात झाले. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी १४ तर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी तब्बल १७ गडी बाद केले. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दोन्ही डावात २५० हून अधिक धावा केल्या तर भारताच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून केवळ २१२ धावा करता आल्या. भारत एकीकडे एक-एक धावेसाठी धडपडत होता तर पाहुण्यांनी मात्र निर्धास्त फलंदाजीचा नमुना पेश केला. थोडक्यात भारत या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी व काही सोपे झेल या तिन्ही विभागात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी पडला आणि परिणाम भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील पुढील सामना ४ मार्चला बंगळूरू येथे होईल. संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया २६०/१० व २८५/१० भारत १०५/१० व १०७/१० भारत ३३३ धावांनी पराभूत]]>