मेलबर्न: टी-२० मालिकेतील बरोबरी, कसोटी मालिकेतील २-१ असा विजय मिळवल्यानंतर भारताने आज येथे झालेले मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात गडी व चार चेंडू राखत पराभव करीत एकदिवसीय मालिकाही जिंकली. युझवेन्द्र चहल याची सर्वोत्तम गोलंदाजी व भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने केलेल्या नाबाद ८७ धावांच्या जोरावर भारताने हि कामगिरी फत्ते केली.
२०१८ मध्ये २० सामन्यांत २५ च्या सरासरीने केवळ २७५ धावा (एकही अर्धशतक नाही) जमवलेल्या धोनीला पहिल्या सामन्यातील संथ खेळीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. दुसऱ्या सामन्यात त्याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने मालिकेत बरोबरी साधली होती. आणि पुन्हा एकदा आपल्या नाबाद खेळीच्या जोरावर धोनीने भारतासाठी विजय मिळवून देत एक नव्या विक्रमाची नोंद केली. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही एकदिवसीय मालिका (दोन संघांदरम्यान) जिंकली नव्हती. आणि अश्या परिस्थितीत सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून संघात असलेल्या धोनीने भारतीय संघासाठी मानाचा शिरपेच रोवला.
मेलबर्नच्या ढगाळ वातावरणात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत ऍरॉन फिंच व कंपनीला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. भारताने या सामन्यात अंबाती रायडूला विश्रांती देत केदार जाधवला, कुलदीप यादवच्या जागी युझवेन्द्र चहलला तर मोहम्मद सिराजच्या जागी विजय शंकरला संधी दिली. डावातील पहिले दोन चेंडू पडल्यानंतर पावसाने काही काळ व्यत्यय आणला. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ पुन्हा चालू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने सलामीची जोडी अलेक्स करी (५) व फिंच (१४) यांना तंबूत धाडले. सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर शॉन मार्श (३९) व उस्मान ख्वाजा (३४) यांनी तिसऱ्या गद्यासाठी ७३ धावांची भागीदारी रचित डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. चहलने ही सेट झालेली जोडी एकाच षटकात माघारी धाडीत ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा दिला. एकीकडे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हजेरी लावून तंबूत परतत होते तर दुसऱ्या बाजूने युवा पीटर हॅन्ड्सकम्बने अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला समाधानकारक २३० धावसंख्या उभारण्यास मदत केली. हॅन्ड्सकम्बने ६३ चेंडूंचा सामना करीत ५८ धावा केल्या. भारतासाठी चहलने ४२ धावांत सहा तर भुवनेश्वर, मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पावसामुळे काहीशी संथ झालेल्या खेळपट्टीवर २३१ धावांचा पाठलाग करणे तितके सोपे नव्हते. याचाच विचार करून भारताची सलामी जोडी रोहित शर्मा व शिखर धवन यांनी सावध सुरुवात केली. रोहित शर्मा (९) स्वस्तात परतल्यानंतर कोहलीने धवनसह खेळपट्टीचा ताबा घेतला. धवन (२३) बाद होण्यापूर्वी या जोडीने दुसऱ्या गद्यासाठी ६२ चेंडूंत ४४ धावांची भागीदारी रचली. अंबाती रायदुच्या अनुपस्थित धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. धोनीने या बढतीच्या पुरेपूर फायदा घेत पहिल्यांदा कोहलीसह तिसऱ्या गद्यासाठी ५३ धावांची व नंतर केदार जाधवसह चौथ्या गद्यासाठी नाबाद शतकीय भागीदारी रचित भारताला विजयश्री खेचून आणले.
धोनीने ११४ चेंडूंचा सामना करीत सहा चौकारांसह नाबाद ८७ तर केदार जाधवने ५७ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद ६१ धावांचं मौल्यवान योगदान दिलं. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही संघातील एकाही खेळाडूला चेंडू सीमारेषेपलीकडे पोचवता आला नाही. कदाचित खेळपट्टीचा स्वरूपामुळे कोणत्याही खेळाडूने तितका प्रयत्न केला नसावा.
चहलच्या मॅच-विनिंग गोलंदाजीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर धोनीच्या तीन सामन्यांतील तीन अर्धशतकाच्या जोरावर केलेल्या १९३ धावांच्या कामगिरीसाठी मालिकावीराचा खिताब देण्यात आला.
]]>