दिल्ली, दिनांक 4 नोव्हेंबर 2016: दिल्ली डायनॅमोजने उत्तरार्धातील खेळात केरळा ब्लास्टर्सच्या बचावास मोठे भगदाड पाडत हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत चमकदार विजय मिळविला. त्यांनी बुधवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 2-0 असा विजय नोंदवून अग्रस्थानी झेप घेतली. दिल्ली डायनॅमोजचा पहिला गोल 56व्या मिनिटाला केन लुईस याने नोंदविला, तर 60व्या मिनिटास ब्राझीलियन मार्सेलो लैते परेरा (मार्सेलिन्हो) याने दुसरा गोल केला. दिल्लीचा हा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आठ सामन्यांतून 13 गुण झाले आहेत. त्यांनी ऍटलेटिको द कोलकता आणि मुंबई सिटी एफसीवर एका गुणाची आघाडी मिळविली आहे. स्पर्धेत पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाच सामने अपराजित राहिलेल्या केरळा ब्लास्टर्सला आज अखेर पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेतील त्यांची ही तिसरी हार ठरली. आठ सामन्यानंतर त्यांचे नऊ गुण कायम राहिले आहेत. ते सहाव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या टप्प्यात या दोन्ही संघांतील कोची येथील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर लगेच केरळाचा बचाव भेदला गेला. चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल झाल्यामुळे दिल्लीचे पारडे वरचढ ठरले. केन लुईसने स्पर्धेतील आपला दुसरा गोल नोंदविताना केरळाचा गोलरक्षक संदीप नंदीला त्याच्या चुकीची भरपाई करण्यास भाग पाडले. रिचर्ड गादझे याचा फटका रोखण्यासाठी नंदीने जागा सोडली होती. गादझे याने गोलरिंगणात लुईसला चेंडू दिला. लुईसने आपल्या “मार्कर’ला चकवत गोल नोंदविण्यासाठी जागा बनविली आणि चेंडूला गोलजाळीत मारले. त्यानंतर मार्सेलिन्हो याने स्पर्धेतील आपला पाचवा गोल केला. कर्णधार फ्लॉरेंट मलुडा याने डाव्या बगलेतून उंचावरून दिलेल्या पासवर मार्सेलिन्हो याने भेदक हेडरवर गोलरक्षक नंदीला असाह्य ठरविले.सामन्याच्या 68व्या मिनिटाला दिल्लीच्या खाती तिसऱ्या गोलची भर पडली असती, परंतु मार्सेलो परेराच्या फटक्यावर गोलरक्षक नंदीने चेंडू थोपविला, त्याचवेळी गोलरिंगणात धावत आलेल्या रिचर्ड गादझे रिबाऊंडवर चेंडूला अचूक दिशा दाखविण्यात असफल ठरला. पूर्वार्धातील खेळात दोन्ही संघाने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नव्हती. पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना लक्ष्य साधण्यात अपयश आले. दिल्लीच्या रिचर्ड गादझे याने संधी साधली असती, तर यजमान संघाने आघाडी घेतली असती. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना केरळाच्या दिदियर कादियो याने सोपी संधी गमावल्यामुळे पाहुण्या संघाचे नुकसान झाले. त्याने झेपावत घेतलेला हेडर चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. उत्तरार्धाच्या सुरवातीस दोन गोलांची आघाडी घेतल्यानंतर दिल्लीने केरळा ब्लास्टर्सला रोखण्यावरच जास्त भर दिला. पराभवामुळे केरळा ब्लास्टर्सला गुणतक्त्यात झेप घेणे शक्य झाले नाही.]]>