पुणे: कसोटी मालिकेत ४-० ने पराभवाची चव चाखणाऱ्या इंग्लंड संघाने आता एकदिवसीय मालिकेतही भारताला हरविणे एक मोठे आव्हान असल्याचे कबूल केले. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उद्यापासून सुरु होणार्या एकदिवसीय मालिकेपूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार इयान मोर्गन याने येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की भारतीय संघ हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतामध्ये उत्तम कामगिरी करतो आणि अश्या संघाला सामोरे जाणे नक्कीच एक आव्हान असेल. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांना संबोधताना सांगितले की भारताचा मागचा कसोटीतला फॉर्म पाहता संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल. “धोनीच्या अचानक निर्णयामुळे नक्कीच माझ्यावरील जबाबदारीत आणखी भर पडली आहे. परंतु धोनीचे मार्गदर्शन नक्कीच घेत राहीन व त्याचा अनुभव, नवख्या खेळाडूंना घेऊन संघाची आखणी व आखलेले डावपेच प्रत्यक्षात उतरविणे अश्या गोष्ठी नक्कीच आमलात आणीन. त्याच्या कर्णधारपदाचा अनुभवाचा विचार केला तर मी नक्कीच संघात योग्य तो ताळमेळ, योग्य व आवश्यक ती आक्रमकता संघासाठी घेईन.” युवराज विषयी विचारले असता कोहली म्हणाला, “धोनीसारख्या अनुभवी खेळाडूला मधल्या फळीत अनुभवी साथ देण्यासाठी संघाने युवराजचा विचार केला. नक्कीच त्याची प्रथम श्रेणीतील कामगिरीही त्याच्या संघातील सामावेशासाठी पूरक ठरली. रायडू बराच काळ जखमी असल्याने युवराजच्या नावाचा विचार करण्यात आला. धोनीला युवराजची मधल्या फळीसाठी नक्कीच मदत होईल आणि संघाला वरच्या खेळाडुंची साथ मिळाली नाही तर धोनी-युवराज आपला अनुभव कमी आणतील.” याच वर्षी इंग्लंड मध्ये होत असलेल्या चाम्पियंस ट्रॉफी स्पर्धेच्या संघ आखणी व तयारी विषयी विचारले असता कोहली म्हणाला की, आमच्यासाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना हा महत्वाचा असतो. या मालिकेतील तिन्ही सामने आमच्यासाठी नॉक आउट सारखे असतील व आम्ही तिन्ही सामन्यांत आमचा सर्वोत्तम देऊ. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडीयम मध्ये होत असलेल्या मालिकेतील या पहिल्या सामन्यात यजमान भारताचं पारड नक्कीच जड असेल. यापूर्वी २०१३ साली या मैदानावर झालेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ७२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दोन संघामध्ये २०१२ सालच्या टी २० सामन्यात भारताने इंग्लंडला हरविले आहे. यंदाच्या वर्षातील भारताचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. मागच्या वर्षी कसोटीमध्ये दबदबा राखलेल्या भारतीय संघाला या मालिकेतून २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेसाठी नवीन कर्णधाराखाली एक मजबूत संघ उभारणं हेच धेय्य असेल.]]>