जत्रांमध्ये रंगणाऱ्या कुस्तीमध्ये सहभाग ते राष्ट्रकुल स्पर्धेच्या सुवर्णपदकापर्यंत झेप घेणाऱ्या राहुल आवारेने गाजवले महाराष्ट्राचे नाव. ५७ किलो वजनी गटात जिंकले भारतासाठी सुवर्णपदक. सिडनी: २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी महाराष्ट्राचा सुपुत्र राहुल आवारे याने पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करीत भारताला स्पर्धेतील १३ वे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या सुवर्ण कामगिरीचे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जातंय. २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकसाठी चांगली कामगिरी करूनही संधी न मिळाल्याने निराश न होता राहुलने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आणि आज त्याचं फलित त्याला मिळालं. बीडच्या या पैलवानाने केलेल्या या कामगिरीने देशभरात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. अंतिम सामन्यात ०-२ ने पिछाडीवर असतानाही प्रतिस्पर्धी स्टीव्हनवर १५-७ अश्या मोठ्या फरकाने मात देत इतिहासाच्या पानात नाव कोरलं. सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला झालेल्या दुखापतीनंतही राहुलने आपली जिद्द दाखवली व भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राहुलने कुस्तीचा कौटुंबिक वारसा जपत ठेवत ऐतिहासिक कामगिरी केली. लहानपणापासूनच राहुलला कुस्तीचं बाळकडू मिळालं. वडील बाळासाहेब आवारे हे बीडमधील एक प्रसिद्ध मल्ल होते. राहुलने अगदी लहानपणापासूनच आपल्या वडिलांकडून कुस्तीचे धडे घेतले. बालवयातच तो जत्रेमध्ये रंगणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये सहभाग घ्यायचा. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे, शेती आणि कुस्ती जिंकून मिळणाऱ्या पैशांमध्ये आवारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. अश्या बिकट परिस्थितीतही राहुलच्या कुटुंबीयांनी त्याच्या या आवडीला पाठिंबा दिला. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. पण खचून न जात त्याने या स्पर्धेसाठी तयारी केली आणि भारताला सुवर्णपदक जिंकून दिल.]]>