लीड्स: क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याच नेम नाही. याचीच प्रचिती इंग्लंड संघाला चांगलीच आली. स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडला ‘कमकुवत’ श्रीलंकेकडून २० धावांनी पराभवाची नामुष्की ओढावी लागली. २३३ धावांचं माफक आव्हान पेलण्यास उतरलेला इंग्लंडचा संघ ४७ षटकांत २१२ धावांवर गारद झाला. अँजेलो मॅथ्यूसच्या चिकाटी नाबाद ८५ धावा व लसिथ मलिंगाचे चार बळी यांच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करीत केवळ २३२ धावा केल्या. तिसऱ्याच षटकात धावफलकावर तीन धावा असताना दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. मात्र डगमगून न जाता श्रीलंकेच्या मधल्या फळीने समाधानकारक फलंदाजी केली. अविष्का फर्नांडो (४९), कुशल मेंडिस (४६) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५९ डावांची भागीदारी केल्यानंतर मॅथ्यूसने मेंडिससोबत ७१ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेच्या डावाला सावरलं. मॅथ्यूसने १४६ मिनिटे खेळपट्टीवर तग धरीत ११५ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह नाबाद ८५ धावा केल्या. इंग्लंडातर्फे जोफ्रा आर्चर व मार्क वूड्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंडला मलिंगाने पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. जॉनी बेएरिस्तोला शून्यावर धावचीत पकडीत डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद केले. थोड्याच वेळाने दुसरा सलामीवीर विन्सलाही तंबूत धाडीत मलिंगाने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. कर्णधार मॉर्गनला (२१) इसुरु उदानाने बाद करीत इंग्लंडला अडचणीत आणले. दरम्यानच्या काळात, इंग्लंडसाठी या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा जो रूट (५७) याने बेन स्टोक्सच्या साथीने ५४ धावांची भागीदारी रचित पाहुण्यांना खेळात आणले. परंतु या सामन्यात नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते. १२७ वर चौथा गडी बाद झाला असताना इंग्लड संघ २१२ धावांवर बाद झाला. मलिंगाने सर्वाधिक चार गडी टिपत इंग्लंडचे कंबरडे मोडले. धनंजय डी-सिल्वानेही तीन गडी बाद करीत त्याला योग्य साथ दिली.
]]>