साऊथम्पटन: एक संघ सगळे सामने जिंकलेला तर दुसरा सगळे हरलेला. प्रेक्षकांना एकतर्फी लढतीची अपेक्षा होती खरी पण घडले काहीसे उलटे. भारताला २२४ धावांवर रोखल्यानंतर अफगाणिस्तान सामना आरामात जिंकेल असे वाटत असताना मोहम्मद शमीच्या घातक माऱ्यासमोर अफगाणी फलंदाज हतबल झाले आणि भारताने आपली विजयी मालिका चालू ठेवली. शमीने शेवटच्या षटकात हॅट-ट्रिक घेत प्रतिस्पर्ध्यांना २१३ वर बाद करीत सामना भारताच्या बाजूने झुकवला. १९८७च्या विश्वचषकातील चेतन शर्मा यांच्या हॅट-ट्रिकनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.
२२५ धावांचं माफक लक्ष्य पार पाडण्यास मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानने काहीसा सावध पवित्र घेतला. पहिल्या पावरप्लेमध्ये त्यांनी केवळ ३७ धावा करीत केवळ एक गडी गमावला होता. या विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीने हझरतुल्लाह झझाइला क्लीन बोल्ड करीत भारताला पहिली सफलता मिळवून दिली. भारतासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या या सामन्यात विजय कोणत्याही परिस्थितीत आवश्यक होता. २००७ च्या विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा ‘तो’ सामना प्रेक्षकांना आठवणीत आला असावा.
भारताकडेही मजबूत तोफखाना असलेली गोलंदाजी विराट कोहलीने वेळेनुसार वापरली. हार्दिक पांड्याने गुलबदीन नाईबला (२७) बाद केल्यानंतर रेहमत शहा (३६) व हश्मतुल्लाह शहीदी (२१) यांनी ४२ धावांची भागीदारी करीत भारताच्या गोलंदाजांचा घाम काढला होता. पण जगातील नंबर वन गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराने २९व्या षटकात या दोन्ही सेट फलंदाजांना एकाच ओव्हरमध्ये माघडी धाडत एजेस बाउलच्या मैदानावरील भारतीय प्रेक्षकांना खुश केले.
मोहम्मद नबी (५२), नजीबुल्ला झारदान (२१) व रशीद खान (१४) यांनी संघर्ष केला खरा परंतु अनुभवी भारताच्या समोर त्यांचं काही चाललं नाही.
तत्पूर्वी,, जखमी भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संधी देत विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. येथील स्पिनर्सला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नाईबने आपला युवा स्पिनर मुजीब उर रहमान याच्याकरवी गोलंदाजीची सुरुवात केली. मुजीबने भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व के एल राहुल यांना चांगलेच जखडून ठेवले. एकेरी-दुहेरी धाव घेत गाडी ढकलणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. मुजीबने रोहित शर्माचा (१) ऑफ स्टॅम्प उडवीत अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. तीन डावांत दोन शतके व एक अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितला मुजीबने चांगलेच चकवले.
पहिले चाळीस षटके अफगाणिस्तानचे
स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अफगाणिस्तानने ‘मजबूत’ मानल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजांना चांगलेच रडवले. मुजीब, मोहम्मद नबी, रशीद खान, रेहमत शाह या स्पिनर्सनी आपली छाप सोडली. पहिल्या चाळीस षटकांचा विचार केला असता कोहलीचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज आपल्या शैलीत खेळताना दिसत नव्हता. के एल राहुल (३०), विजय शंकर (२९) यांनी थोडा काळ कोहलीसोबत खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना मोठी खेळी करण्यास त्यांनाही अपयश आलं. तर कोहली (६७) काहीसा सेट झालेला दिसत असताना नबीचा एक उसळता चेंडू कटवण्याच्या नादात पॉईंटच्या सर्कलवर सोपा झेल देत बाद झाला. थोडक्यात, पहिल्या ४० षटकांत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचाच बोलबाला दिसून आला. भारताने ४० षटकांअखेरीस चार गडी बाद १७५ धावा केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांनी टाकली नांगी
उरलेल्या १० षटकांत भारत फटकेबाजी करून समाधानकारक गोलंदाजी करेल अशी अपेक्षा येथील एजेस बाउल स्टेडियमवरील प्रेक्षकांना होती. परंतु काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीचा चांगला उपयोग करीत भारतीय फलंदाजांना धारेवर धरले. शेवटच्या १० षटकांत भारत केवळ ४९ धावाच करू शकला. केदार जाधवने आपले अर्धशतक झळकावत यात हातभार लावला.
मुजीब (१०-०-२६-१), नबी (९-०-३३-२), १०-०-३८-१) या तिकडीने आपल्या २९ षटकांत केवळ ३.३४ च्या सरासरीने केवळ ९७ धावा देत चार प्रमुख फलंदाजांना तंबूत धाडले. परिणामी, भारत आपल्या निर्धारित ५० षटकांत केवळ २२४ धावाच जमवू शकला. उत्तरार्धात, नाईबने दोन गडी बाद करीत मोलाचा हातभार लावला.
संक्षिप्त धावफलक
भारत: २२४/८ (५०) – कोहली ६७(६३), केदार जाधव ५२(६८), मोहम्मद नबी ९-०-३३-२
अफगाणिस्तान २१३/१० (५०) – नबी ५२(५५), रेहमत शाह ३६(६३), शमी ९.५-१-४०-४
भारत ११ धावांनी विजयी
]]>