लीड्स: उपांत्य फेरीत आपले स्थान अगोदरच पक्के केलेला भारतीय संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन हात करेल. आयसीसी विश्वचषक स्पर्धा आपल्या शेवटच्या टप्प्यात आली असता अंतिम चार संघ जवळपास पक्के झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारतासह यजमान इंग्लंड या अगोदरच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. चौथा संघ न्यूझीलंडची आज औपचारिकरीत्या पात्र ठरला असून अंतिम चार संघांतील क्रमवारी उद्या होणाऱ्या सामन्यांअंती स्पष्ट होईल. भारत आपल्या काही मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन रवींद्र जडेजा, केदार जाधव यांना संधी देण्याची चिन्हे दिसत आहेत.
भारताने आतापर्यंत खेळलेल्या आठ साखळी सामन्यांत सहा विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड विरुद्ध पावसाने झालेला रद्द सामना व इंग्लंडविरुद्धच्या पराभव सोडला तर भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांचा फॉर्म व गोलंदाजीतील भरीव कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न भारत उद्याचा सामन्यातही करेल. भारताने मागील (बांगलादेश विरुद्ध) सामन्यात केदार जाधवच्या जागी दिनेश कार्तिकला संधी दिली होती तर कुलदीप यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिले होते. येथील मैदानाचा विचार करता भारत तिन्ही वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो. शिवाय या स्पर्धेत एकही सामना न खेळणाऱ्या रवींद्र जडेजाला उद्याही स्थान मिळणे कठीण दिसत आहे.
दरम्यान, स्पर्धेतून बाहेर पडलेला श्रीलंकेचा संघ विजयाने आपल्या विश्वचषक स्पर्धेचा शेवट करण्याच्या इराद्यात असेल. अफगाणिस्तान, इंग्लंड व वेस्ट इंडिज यांना पराभूत केलेल्या लंकेचे पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्याविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाले होते. उभय संघांत विश्वचषक स्पर्धांत झालेल्या आठ लढतीत श्रीलंकेचं पारडं जड आहे. लंकेने भारताला चार लढतींत पराभूत केले असून भारताने तीन सामने जिंकले आहेत. तर १९९२ ची लढत पावसामुळे रद्द झाली होती. आकडे जरी श्रीलंकेच्या बाजूने असले तर भारताचं पारडं उद्याच्या सामन्यात नक्कीच जड आहे.
कोहली, धोनी, पंत, राहुलची कसून फलंदाजी
आज झालेल्या सरावात भारताच्या फलंदाजांनी नेट्समध्ये कसून सराव केला. कोहलीने जवळपास ४० मिनिटे सराव करीत धोनीच्या मध्यमगती व फिरकी गोलंदाजीवरही सराव केला. डावखुरा फलंदाज रिषभ पंतनेही ३०-४० मिनिटे सराव केला. भारतासाठी मागच्या काही वर्षांपासून मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकाची भेसवणारी समस्या रिषभ पंत येणाऱ्या काळात भरून काढेल अशीच आशा साधय क्रीडा रसिक करीत आहेत. पंतने या विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या दोन डावांत अनुक्रमे ३२ व ४८ अश्या एकूण ८० धावा केल्या आहेत. त्याही चौथ्या क्रमांकावर. भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर रिषभ पंतवर विशेष नजर ठेऊन होते.
केदार जाधवचा टेनिस बॉलवर सराव
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवने आज चक्क टेनिस बॉलवर सराव केला. आखूड टप्प्यांच्या चेंडूवर अडकणाऱ्या केदार जाधवने कदाचित आज टेनिस चेंडूवर सराव केला असावा. केदार आपल्या सुरुवातीच्या काळात टेनिस चेंडूवर बराच क्रिकेट खेळला आहे. पुण्यातील एका व्यावसायिक संघातून त्याने आपली क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. जाधवने खेळलेल्या सहा सामन्यांत ४०च्या सरासरीने ८० धावा केल्या आहेत. भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे त्याला पाहिजे तशी संधी आतापर्यंत मिळालेली नाही. अफगाणिस्तानविरुद्ध कठीण समयी त्याने ६८ चेंडूंत ५२ धावांची संयमी खेळी होती.
]]>