नॉटिंगहम: अवकाळी पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे येथे चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धा २०१९ चा १८वा सामना शेवटी एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. आतापर्यंत आपले खेळले गेलेले सर्व सामने जिंकलेल्या भारत व न्यूझीलंड या संघांना प्रत्येकी एक-एक गुणावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील १८ सामन्यांत हा चौथा सामना पावसामुळे रद्द करावा लागला हे विशेष.
दोन दिवसांपूर्वी (दि. ११ जून) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी जारी केलेल्या पत्रकात पावसांमुळे होणाऱ्या रद्द होणाऱ्या सामान्यांवर आपली खंत व्यक्त केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते कि अवकाळी आलेल्या या पावसामुळे खेळाचे प्रचंड नुकसान होत आहे. जगभरातून चाहते आपल्या संघांना प्रोत्साहन देण्यास आले आहेत. परंतु या पावसामुळे त्यांची घोर निराशा होत आहे. तसेच, ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत बऱ्याच कारणांस्तव साखळी सामान्यांसाठी राखीव दिवस ठेऊ शकत नाही.
यापूर्वी पाकिस्तान वि. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, बांगलादेश वि. श्रीलंका असे तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यात आणखी एक भर आजच्या सामन्याची.
आजच्या सामन्याअंती गुणतालिकेत न्यूझीलंड चार सामन्यांत तीन विजयांसह सात गुण घेत आघाडीवर आहे तर भारत तीन सामन्यांत दोन विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला असता तर भारत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला असता. सकाळी १० वाजल्यापासून (स्थानिक वेळेनुसार) चालू झालेल्या पावसामुळे मैदान खूपच ओलं झालं होतं. मैदान सुकवण्याच्या वेळेस पॉईंट व मिड-विकेटच्या क्षेत्रात मोठे-मोठे धब्बे आले होते. शेवटी पंचांनी दोन्ही संघाच्या संघनायकांना परिस्थिती दाखवून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रविवारी (१६ जून) रोजी आहे.
]]>