शेवटी हरलोच…इंग्लंडकडून भारत पराभूत

विश्वचषक स्पर्धा २०१९: ३१ धावांनी पराजित होत भारताने चाखली पराभवाची पहिल्यांदाच चव

बर्मिंघम: ‘वन डे फॉर चिल्ड्रन’ या आयसीसी व युनिसेफच्या खास सामन्यात इंग्लंडने भारताला पराभवाची चव चाखत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. यजमानांनी भारताचा ३१ धावांनी पराभव करीत विराट कोहलीच्या भगव्या जर्सीतील संघाला मोठा हादरा दिला. ३३८ धावांचे आव्हान पेलण्यास उतरलेला ३०६ धावाच करू शकला. रोहित शर्माचे शतक व विराट कोहलीचे सलग पाचवे अर्धशतक भारताच्या कामी आले नाही.

अगोदरच वादाच्या चर्चेचं केंद्रस्थान झालेली भगवी जर्सी परिधान करून भारतीय संघ आज मैदानात उतरला. सरावादरम्यान जखमी झालेल्या विजय शंकरच्या जागी आजच्या सामन्यात युवा रिषभ पंतची वर्णी लागली.

उपांत्य फेरीचे आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला स्पर्धेत वर आणलेल्या भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांनी आज चांगलेच चोपले. जेसन रॉयच्या संघात परतल्याने मजबूत झालेली आघाडी आज भारतीय गोलंदाजांनी चांगलीच अनुभवली. रॉय व जॉनी बेएरेस्टोने डावाची सुरुवात करीत ६४ चेंडूंत पन्नाशी गाठून दिली व लगेचच १६व्या षटकात संघाला शंभरचा आकडा गाठून दिला. भारताने आपले सर्वच गोलंदाज अधूनमधून वापरले, परंतु भलत्याच मूडमध्ये असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी आपले वर्चस्व गाजवले.

पहिल्या गड्यासाठी १६० धावांची भागीदारी रचल्यांनंतर रॉय (६६) कुलदीप यादवचा शिकार बनला. परंतु एका बाजूने बेएरेस्टोने आपली तुफान फटकेबाजी चालू ठेवत दमदार शतक लगावले. त्याने १०९ चेंडूंचा सामना करीत १० चौकार व अर्धा डझन षटकार खेचत १११ धावा केल्या. जो रूटने (४४) त्याला योग्य साथ देत इंग्लंडला मोठ्या धावसंख्येकडे वळवले. इंग्लंडचे फलंदाज ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांना ठोकून काढत होते, त्यावरून हा इंग्लंड संघ ४०० चा आकडा सहज पार करेल असेच वाटत होते. पण भारताकडेही शमी-बुमरा या जोडीचा अनुभव असल्यामुळे मधल्या षटकांत काही प्रमाणात धावगतीवर अंकुश घालण्यावर यश आले.

मधल्या षटकांत धावगती संथ झाली असता पाचव्या क्रमांकावरील बेन स्टोक्सने आपला धडाका चालू ठेवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ धावांची खेळी करणाऱ्या स्टोक्सने आजही ५४ चेंडूंत तुफानी ७९ धावांची तुफानी खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता एकही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. शमीने आपल्या दहा षटकांत ६९ धावांवर इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत यजमानांना ३३७ धावांत रोखले. शमीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पराक्रमही केला. चहल दहा षटकांत ८८ धावा, कुलदीप यादव दहा षटकांत ७२ धावा या स्पिनर्सना मात्र आज चांगलेच चोपून काढले.

भारतीय गोलंदाजीचा विचार केला असता मोहम्मद शमी व जसप्रीत बुमरा या जोडीने आपल्या २० षटकांत ११३ धावा खर्च करीत सहा गडी बाद केले तर उरलेल्या तीन गोलंदाजांनी आपल्या ३० षटकांत तब्बल २२० धावा खर्च करीत केवळ एकच गडी टिपला.

तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्याच षटकात हादरा बसला. ख्रिस वोक्सने स्वतःच्याच गोलंदाजीवर के एल राहुलला शून्यावर झेलबाद करीत इंग्लंडला दणक्यात सुरुवात करून दिली. वोक्सने आपले पहिले तीन षटक निर्धाव टाकत भारतीय फलंदाजांवर चांगलंच दबाव टाकला. पहिल्या दहा षटकांत भारत  केवळ २८धावाच करू शकला होता जो या विश्वचषकातील भारताचा पहिल्या पावरप्लेमधील निच्चांक होता. कदाचित हाच फरक भारतीय पाठलागास कारणीभूत ठरला. भारतीय संघासाठी नेहमीच धावून येणारे विराट कोहली व रोहित शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकीय भागीदारी रचित भारताच्या आशा कायम ठेवल्या. परंतु करो व मरो परिस्थितीत खेळत असलेल्या इंग्लंड संघाने आपले गोलंदाज अचूकरीत्या वापरात भारताला विजयापासून वंचित ठेवले.

विराट कोहली (६६), रोहित शर्मा (१०२) हे भक्कम खेळाडू बॅड झाल्यानंतर भारताच्या आशा जवळपास संपल्या होत्या. पण हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी छोट्या खेळी करीत भारतीय समर्थकांना खुश केले. पंत (३२) व हार्दिक पांड्या (४५) माघारी परतल्यानंतर महेंद्र सिंग धोनीकडून उपस्थितांच्या आशा पल्लवित झाल्या. धोनीने (४२) शेवटपर्यंत नाबाद राहत एका बाजूने किल्ला लढवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला खरा परंतु तोवर खूप उशीर झाला होता. शेवटच्या १०-१२ षटकांत दहाच्या सरासरीने पाहिजे असलेली धावसंख्या शेवटच्या पाच षटकांत १४च्या वर जाऊन पोचली. परिणामी, भारताला स्पर्धेतील पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली. इंग्लंडकडून प्लंकेटने तीन तर वोक्सने दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड: ३३७/७ (५०) – बेएरेस्टो १११(१०९), स्टोक्स ७९(५४), शमी १०-१-६९-५

भारत: ३०६/५ (५०) – रोहित १०२(१०९), कोहली ६६(७६), प्लंकेट १०-०-५५-३

इंग्लंड ३१ धावांनी विजयी

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *